Property Dispute : सेकंड होम का अन् कुणासाठी?

Home Story : निसर्गाच्या सान्निध्यात आपले सेकंड होम बनवा आणि आयुष्यभर निसर्गाच्या सान्निध्यात राहा, असे वर्णन वाचून तर बाळासाहेबांची सेकंड होम घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली.
Home
Home Agrowon

Second Home : लोणावळ्या जवळच्या कोणत्यातरी डोंगरावर, हिरव्यागार पसरलेल्या गवतावर चालणाऱ्या महिलेच्या फोटोच्या त्या जाहिरातीकडे बाळासाहेबांचे लक्ष गेले. आता विमानतळापासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर व निसर्गाच्या सान्निध्यात आपले सेकंड होम बनवा आणि आयुष्यभर निसर्गाच्या सान्निध्यात राहा, असे वर्णन वाचून तर बाळासाहेबांची सेकंड होम घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली. थोडे पैसे साठवल्यामुळे अनेक दिवस इतरांप्रमाणे आपण पण सेकंड होम घ्यावे असे त्यांच्या मनात होते.

पुढचे तीन, चार आठवडे दर रविवारी कुठलीतरी जाहिरात पाहून आपल्या बजेटमध्ये कोठे फार्म प्लॉट मिळतो का, याची त्यांनी चाचपणी सुरू केली. कधी आळंदी साइडला फिरायचं. कधी मुळशीला फिरायचं तर कधी पौड रोडने. असं करत करत तीन लाख रुपये गुंठा असलेला एक प्लॉट त्यांना रस्त्याच्या आतमध्ये पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर सापडला. जागेवर गेला तेव्हा दगड लावून, रस्त्या शेजारी मोठा बोर्ड लावून प्लॉट विक्री सुरू असल्याचे बाळासाहेबांनी पाहिले.

Home
Land Dispute : शहरात शेतजमीन राखणे पडले महागात

त्याने जाऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना आतापर्यंत २५ लोकांनी प्लॉट घेतल्याचे सांगितले गेले. त्यांची नावे विचारली तेव्हा ज्यांनी प्लॉट बुक केला आहे त्यांची नावे आम्हाला सांगता येणार नाहीत, असे उत्तर मिळाले. जेव्हा नकाशा मागितला तेव्हा विक्री केलेल्या प्लॉटवर पेनने फुली मारल्याचे लक्षात आले. हे प्लॉट सोडून तुम्ही कोणतेही प्लॉट घेऊ शकता असे सांगितल्यावर तर बाळासाहेबांच्या मनात इतर सगळ्यांनी प्लॉट घेतले, आपणच मागे राहिलो होतो असा विचार आल्याशिवाय राहिला नाही.

विशेष म्हणजे ले-आउटमधील रस्त्याकडेच्या बहुसंख्य प्लॉटवर फुल्या मारलेल्या होत्या. त्यामुळे आता तुम्हाला कॉर्नरचे जे दोन प्लॉट राहिले आहेत त्यांपैकी किंवा आतल्या बाजूचा प्लॉट घ्यावा लागेल हे पाहून तर बाळासाहेबांना आपण जरा उशीरच केला असे वाटायला लागले. केवळ २५ हजार रुपये भरून प्लॉटचे बुकिंग करता येते, हे लक्षात आल्यावर त्याने ताबडतोब चेक देऊन प्लॉट बुक केला.

Home
Land Dispute : बांध कोरण्यातील आनंद

एकदा बुकिंग झाल्यावर तीन महिन्यांत बाळासाहेबांनी सर्व पैसे देऊन प्लॉट खरेदी केला. बिगरशेती जमीन नसताना प्लॉट कसे विकता असे विचारले असता बिल्डरने त्याला सांगितले, की हे फार्म हाउस प्लॉट आहेत त्याला बिगर शेती करायची काही गरज नाही, आम्ही तुमचे नाव सातबाराला लावून देऊ. प्लॉट बिगर शेती केल्यावर तुम्हाला दरवर्षी बिगर शेती कर भरावा लागेल. त्यापेक्षा तीन गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये फक्त एका गुंठ्याचे बांधकाम केले व दोन गुंठे रिकामे सोडले व त्यावर बाग वगैरे बनवली किंवा लॉन्च केली तर हा फार्म हाउस प्लॉट म्हणून तुम्हाला वापरता येईल असे सांगितले.

बुकिंग केल्यापासूनच कुटुंबीयांना आणि मुलांना आपण आता सेकंड होम म्हणून एक छान बंगला बांधणार आहोत आणि दर शनिवारी, रविवारी तिथे जाऊन राहू अशी स्वप्ने त्यांनी मनात पेरली होती. एका रविवारी घरच्यांना घेऊन बाळासाहेब प्लॉट दाखवायला पण गेले. या प्लॉटपर्यंत पोहोचायला ४५ मिनिटे लागली. तोपर्यंत बाळासाहेबांची लहान मुले कंटाळून गेली होती.

बायको पण पोहोचेपर्यंत वैतागली होती एवढ्या लांब प्लॉट कोण घेतं का, असं प्लॉट पाहण्यापूर्वीच तिनं बोलायला सुरुवात केली. त्यामुळे पूर्ण बंगला बांधेपर्यंत यांना परत आणायचे नाही अशी मनातल्या मनात बाळासाहेबांनी प्रतिज्ञा केली. पुढची दोन वर्षे बांधकाम करणारे गवंडी शोधणे, विटा विकत आणणे, सिमेंट आणणे आणि आणि बांधकाम करून घेणे यामध्ये गेले. तब्बल दोन वर्षांनंतर बाळासाहेबांचे सेकंड होम साकार झाले होते. मग त्याच्यावर फर्निचर आणि इंटिरियरचा खर्च म्हणून आणखी दोन लाख रुपये खर्च झाले.

घर बांधून झाल्यावर एवढ्या लांब अंतरावर काहीच सुरक्षितता नाही हे बाळासाहेबांच्या लक्षात आले. मग तिथे राहू शकणाऱ्या कुटुंबाचा शोध सुरू झाला. बऱ्याच प्रयत्नांनंतर उत्तर प्रदेशचा एक भय्या महिना ४० हजार रुपये देऊन बाळासाहेबांनी ठेवला. आता सेकंड होमचा खरा फटका बसू लागला होता. एक दिवस दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी बाळासाहेबांच्या केअरटेकर भय्याला अटक केली. तेव्हा कसले तरी ड्रग्स तो विकत असल्याचे निदर्शनास आले आणि दुसऱ्या दिवशी बाळासाहेबाला पण अटक झाली.

जामीन मिळेपर्यंत आणि केस चालू असेपर्यंत पुढची दीड वर्ष भय्या आणि त्याचे कुटुंबीय बाळासाहेबांच्या सेकंड होममध्ये राहिले. मरेपर्यंत केवळ तीन वेळा बाळासाहेब कुटुंबीयांसह या सेकंड होममध्ये राहू शकले. असंख्य लोक आपल्या म्हातारपणी बांधलेल्या सेकंड होममध्ये दहा ते बारा वेळेपेक्षा जास्त वेळा राहिलेले नाहीत, असे दिसून येते. शिवाय प्रत्येक वेळी या सेकंड होममध्ये काय आम्हाला झाडण्यासाठी आणता का, हे बायकोचे बोलणे पण त्यांना खावे लागले ते वेगळेच. एकंदरीत सेकंड होम कोणासाठी, का आणि किती फायदेशीर याचे आयुष्यभर कोर्टातल्या केसच्या वेळी चिंतन करण्यापलीकडे बाळासाहेबांकडे काही उरले नव्हते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com