
Latur News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खासगी बाजारांची सरलेल्या २०२३- २०२४ आर्थिक वर्षातील कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
या क्रमवारीनुसार लातूर विभागात लातूर बाजार समिती पहिली, तर औसा बाजार समिती दुसरी आली आहे. राज्यात लातूर बाजार समितीने अकरावा, औसा बाजार समितीने पंधरावा, तर तुळजापूर बाजार समितीने १९ वा क्रमांक पटकावला आहे.
बाजार समित्यांची तसेच खासगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. बाजार समित्यांच्या निकषासाठी २०० गुण व खासगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार ही क्रमवारी काढण्यात आली आहे. यात लातूर विभागात लातूर, बीड, धाराशिव व नांदेड हे चार जिल्हे आहेत. या विभागात लातूर बाजार समिती पहिली, तर औसा बाजार समिती दुसरी आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तुळजापूर बाजार समिती आहे.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने १४२.५० गुण घेत गतवर्षाच्या तुलनेत राज्यातून ३३ व्या स्थानावरून १५ व्या स्थानी तसेच लातूर विभागातून ४८ बाजार समितीमधून तिसऱ्या स्थानावरून द्वितीय स्थानी झेप घेतलेली असून, जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक कायम ठेवला आहे.
समितीचा नावलौकिक वाढविण्यात शेतकरी, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकर राचटेृ सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, सचिव संतोष हुच्चे व सर्व कर्मचारी, व्यापारी, हमाल, मुनीम व बाजार समितीचे सर्व संलगन घटकांच्या प्रयत्नांमुळे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने हे यश संपादन केले आहे. या यशाबदल औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती सर्व संचालक सचिव व कर्मचारी अडते, व्यापारी, हमाल, मुनीम व सर्व घटकांचे अभिनंदन केले.
तुळजापूर समिती जिल्ह्यात अव्वल
कृषी उत्पन्न बाजार समिती उत्तम कामकाजामुळे जिल्ह्यात पहिली ठरली आहे. तर राज्यातील ३०६ बाजार समित्यांमध्ये १९ व्या क्रमांकावर आहे. लातूर विभागातील ४८ बाजार समित्यांत दुसरा, तर धाराशिव जिल्ह्यातील नऊ बाजार समितींमध्ये तुळजापूर बाजार समितीचा प्रथम क्रमांक आहे.
तुळजापूर बाजार समितीला दोनशेपैकी १४०.५ गुण मिळाले आहेत. पायाभूत सुविधा, इतर सेवा-सुविधा, आर्थिक, वैधानिक निकष व पारदर्शक कामकाजासह इतर निकषांमध्ये बाजार समिती उत्कृष्ट झालेली ठरली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बाजार समितीने चांगले कामकाज केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.