
Latur News : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे. त्यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे. यात १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबत नागरिकांना जलदगतीने सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे, हा देखील या उपक्रमाचा भाग असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, माजी सैनिक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या टप्पा दोनमध्ये १२८ गावांमध्ये जलसंधारणाची १४३ कोटी ५९ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी २ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून होत असलेल्या कामांमुळे तलावांच्या साठवण क्षमतेत लाखो लिटरची भर पडली आहे.
जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
जिल्ह्यात जवळपास १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री वीज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोसले यांनी पोलिस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे यांनी परेडचे नेतृत्व केले. पोलिस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलिस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, यासह शासकीय विभागांचे १६ चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, सामाजिक वनीकरण विभागाचा आकर्षक देखावा असलेला रथ या पथसंचालनात सहभागी होता. स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
चुकीच्या गोष्टीला पाठिंबा नाही
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
नागरिकांना लाभदायक ठरणारी विकास कामे करण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. लोकप्रतिनिधींना विश्वात घेऊन काम करावे. विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमाला आपला पाठिंबा राहील. मात्र, कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही, असेही पालकमंत्री भोसले यांनी जिल्हा आढावा बैठकीत सांगितले. लातूर ते टेंभुर्णी महामार्गाचे रुंदीकरण, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.