समीर गायकवाड
Story : मालन नगर जिल्ह्यातल्या पारनेरची. तिच्या घरी असलेल्या बांगड्याच्या व्यवसायाची तिला पहिल्यापासूनच स्त्रीसुलभ ओढ होती. बालवयातलं आकर्षण हळूहळू संपुष्टात आलं ते कळत्या वयात. घरात अठरा विश्वं असणारं दारिद्र्य आणि गावगाड्याच्या जिवावर चालणारी गुजराण तिच्या कुटुंबाची पुरती फरफट करणारी होती. खाणारी तोंडं भरमसाट आणि तुटपुंजं उत्पन्न यामुळं तिच्या वडिलांनी एकेक करून मुली लवकर ‘कटवल्या’.
मालनच्या वडिलांनी फारशी चौकशी न करता येतील त्या स्थळांना होकार भरला. सासरी आल्यापासून मालन घाण्याच्या बैलासारखी कामाला जुंपली होती. हाता-तोंडाची गाठही लवकर पडत नव्हती. बालवयात सदोदित किणकिणणाऱ्या फिरोजाबादी बांगड्यांच्या सहवासात राहणाऱ्या मालनला रानात रोजंदारीवर काम करावं लागत होतं. सासरीही बांगड्यांचा व्यवसाय होता, पण त्यात किती लोकांचे हात लागत होते हे तिला ठाऊक होतं.
मालनचा नवरा वासुदेव हा घरातला धाकटा मुलगा. नाकापुढं बघून चालणारा साधासुधा जीव. त्याला दोन भाऊ, दोन बहिणी. वासुदेवाची आई पारूबाई जुनाट वळणाची बाई. सगळं घर तिच्या धाकात होतं. थोरल्या पोराच्या लग्नानंतर पारूबाईचा भ्रतार सदानंद हा आजारपणात गेला, ती विधवा झाली. त्यानंतरच्या काळात एकाच वेळी शेतशिवाराचं काम सांभाळत तिनं पिढीजात कासाराचा धंदाही जिवंत ठेवला होता. गावात तिच्या भावकीतलं एक घर होतं. पारूबाईचा नवरा निवर्तल्यावर भावकीने तिच्या बांगड्यांच्या व्यवसायास हात घालण्याचा प्रयत्न केलेला;
पण तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ असणाऱ्या मेहनती पारूबाईपुढं त्यांची डाळ शिजली नाही. गावानं देखील रंडक्या बाईच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. गावाने रूढीप्रियतेचा सनातनी रंगही दाखवला. पारूबाईने कासारणीचा धंदा जरूर करावा; मात्र गावातल्या लग्नघरी वा कुणा सवाष्ण बाईच्या घरी कार्यक्रमासाठी बांगड्या चढवायला तिनं येऊ नये, तिच्याऐवजी थोरल्या सुनेनं यावं अशी अट गावानं घातली. पारूबाईने थोरल्या सुनेला जबरदस्तीनं मनवलं. तिचा व्यवसाय पुन्हा नेटाने सुरू झाला. त्यानंतर तिनं दोन्ही पोरींची लग्नं लावून दिली. पोरांचीही लग्नं केली. नव्या सुना घरात आल्या, त्यातल्या धाकटीचं नाव मालन!
सणासुदीला माहेरी जाणं व्हायचं तेव्हा मालनच्या डोळ्यात आभाळ दाटून यायचं. लग्नानंतर काळागणिक भावांच्या वागण्यात फरक पडत गेला तसं तिचं माहेर धूसर होत गेलं. तोवर इकडं तिची परवड होत राहिली. तिची कूसही उशिरा उजवली. चाळिशी पार होताना तिच्या पदरात तीन अपत्यं होती. शेतात विहिरीचं पाणी आटलं तसं घरात भांड्याला भांडं लागायला सुरुवात झालेली. शेवटी पारूबाईनं वाटण्या केल्या. थोरल्या, मधल्या मुलाला शेत दिलं. धाकट्याला धंदा दिला. वासुदेवानं याला आडकाठी घातली नाही. श्रमलेल्या पारूबाईला मालनच्या हाती धंदा देताना धाकधूक वाटत होती, पण मालननं संधीचं सोनं केलं.
खरं तर आपल्या नवऱ्याला दोन्ही दिरांनी फसवलंय हे तिला उमगलं होतं. वासुदेव आपल्या आई, भावंडांच्या विरोधात काहीच ऐकून घेत नसल्यानं तिची पंचाईत झाली होती. त्यामुळे बोलघेवड्या मालननं अधिक वादावादी न करता बांगड्यांची दुरडी नेटकी सांभाळली. पारूबाईने तिला बांगड्यांचे मोलभाव शिकवले. माहेरच्या व्यवसायानुभवामुळे मालनला धंद्याची नस तत्काळ सापडली. पुढ्यातल्या बाईचा हात हाती घेताच तिच्या मनगटाचा नेमका अंदाज येई. त्या आकाराच्या बांगड्या ती अलगद सरकवी. पाचही बोटं दुमडून अंगठ्याजवळ बांगडी नेली की ती लडिवाळ स्वरात गप्पा सुरू करे, अंगठ्याच्या वरचा मांसल चढ किंचित दाबून सर्रकन बांगडी पुढं नेई. तिचा हात फार हलका आहे, असं गावातल्या बायापोरी म्हणत.
खरं तर मालनच्या हाती हात येताच त्या स्त्रीच्या धमनीतून अंतःकरणाचा ठाव लागे. माहेरवाशीण पोरीला सोबत घेऊन येणारी थोराड आई तिच्यासाठी नक्षीदार टिकाऊ बांगड्यांसाठी सांगे. त्या पोरीबाळीही मालनला बहीण मानून मनातलं आभाळ तिच्यापाशी रितं करत. सासूरवास असलेली सून मालनपाशी खूप लवकर बोलती होई. मग बांगड्या बाजूला राहत नि मालनचं समुपदेशन सुरू होई. तिनं किती सोसलं, तिच्या नवऱ्याला किती फसवलं याची उजळणी होई.
पण आपला नवरा आपल्याला जीव लावतो ना, तो आपल्या बाजूने आहे ना, मग कशाला दुःखाला कवटाळून बसायचं, असा तिचा सल्ला ऐकून रडवेल्या झालेल्या जाईजुईंच्या ओढाळ वेलींवर नाजूक हास्यसुमने फुलत. त्या तिला गळामिठी मारत. बघता बघता पारूबाईची जागा मालननं चपखलपणं घेतली. गावात जिच्या तिच्या तोंडी तिचं नाव झालं. गात्रशिथिल पारूबाईनं एका रखरखीत उन्हाळ्यात देवाघरी प्रस्थान केलं.
काही दिवसांच्या अवकाशानंतर पंचक्रोशीतील लग्नकार्यांची कामं मालनला मिळू लागली. लग्नाच्या सुपारीत तिचा दिवस मोडायचा. ती लग्नघरात दाखल होताच उत्साहाला उधाण येई. उखाणे सुरू होत. तिच्या पुढ्यात बसण्यासाठी चढाओढ लागे. जमलेल्या बायकांच्या लयबद्ध ओव्या सुरू होत. पहिली गायची -
दागिन्यामंदी दागिना वजरटेकीचा गं कोवळा
हिरव्या चोळीवरी गोंडा लोळतो पिवळा..
मग दुसरी गायची -
पुतळ्याची माळ माझ्या पडली पाठी पोटी
सांगते बाई तुला चंद्रहारानं केली दाटी..
गाताना कुठं शब्द अडताच मालन नेमका शब्द सांगे. मग त्या लाजून चूर होत. ओवीतला दागिन्यांचा विषय लांबत जातानाचा कुण्या कष्टकरीणीचा हात हाती आला की गोड गळ्याची मालन तिच्या वतीने गाई -
काळी गळसुरी माझ्या आहेवपणाची
मग येईल संपदा मग घडवीन सोन्याची!
मग ती स्त्री मालनच्या गळ्यात पडे. सगळ्या जणी कावऱ्याबावऱ्या होत. त्या कष्टलेल्या बाईच्या डोळ्याला आपला पदर लावत. मुळात सगळ्यांचेच पदर तेव्हा फाटके होते, पण त्यांची मनं मोठी होती. एकमेकींची दुःखं जाणून घ्यायची आपलेपणाची ओढ त्यात होती. त्यांच्या विटून गेलेल्या जीर्ण पदरानं श्रीकृष्णाच्या तर्जनीस चिंधी गुंडाळली नसली, तरी तितकं पावित्र्य आणि सच्चेपणा त्यात होता.
मालनच्या पुढ्यात संसाराची ढकलगाडी होती, कसंबसं तिनं सारं रेटत नेलं. पहिल्या दोन्ही मुलींची लग्नं उरकली. धाकट्या पोरीच्या लग्नात मालनची उरली कमाईही संपली. सततच्या कामानं वासुदेव आजारी पडला आणि मालननं हाय खाल्ली. वासुदेवाच्या जिवाचं बरंवाईट झाल्यास आपल्या हातानं कुणी बांगड्या भरणार नाही ही भीतीही तिला सतावत होती.
त्याच्या उपचारासाठी तिनं दागिनं मोडले, पाटल्या-बांगड्या गहाण टाकल्या. गावाला बांगड्या भरणाऱ्या मालनचा हात बोडका झाला. नेटानं नवऱ्याचा दवाखाना केला. धाकट्या पोरीच्या लग्नापर्यंत तरी धंदा टिकला पाहिजे, यासाठी कंबर कसली. फावल्या वेळात शिलाईकामही सुरू केलं. पोरीसाठी स्थळ येताच ती हरखून गेली. ऐपतीपेक्षा चांगलं लग्न लावून दिलं. गावानं मालनचं कौतुक केलं. आता तिनं पुन्हा सगळा माल भरला. लोकांचं देणं सारण्याकडं कल ठेवला.
दरम्यान, बांगड्यांचं आकर्षणही कमी होऊ लागलं होतं. फॅशन, व्हरायटी हे शब्द वेशीपाशी येऊन पोहोचलेले. धंदा घटू लागल्यावर वाण वाढवणं मालनला अपरिहार्य झालं होतं. ते आव्हानही तिनं स्वीकारलं. काचपाणी खेळणाऱ्या पोरी दारात येताच ती त्यांना ओंजळभरून बांगड्यांचे तुकडे देई! मालननं सगळ्यांची मनं जपली आणि जिंकलीही. पोरगा हाताशी येऊपर्यंत ती काम करत राहिली. तीन पोरींच्या पाठीवर झालेल्या जगन्नाथाला ती बजावायची, की बायकोला कासारीण करू नकोस. शिकलेली बायको कर, तू सुद्धा खूप शिक, मोठा हो, चांगली चाकरी कर. बापाचं नाव कर. माझ्यानंतर हा व्यवसाय बंद पडलेला बरा असं ती म्हणे. ती घरादारासाठी जगली, पण स्वतःसाठी एक दिवसही जगली नाही. पण याची कधी खंत वाटली नाही. जगन्नाथाला नोकरी मिळाली तेव्हा तिला स्वर्ग दोन बोटं उरलेला.
मालनच्या एकुलत्या एक पोराची, जगन्नाथाची, बैठक जमली. सुपारी फुटली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिनं झोपेत अखेरचा श्वास घेतला. तिचे अथक परिश्रम संपले. एकदाची विश्रांती तिला लाभली. गावातल्या बायकांच्या हाती बांगड्या भरणाऱ्या मालनला आहेव मरण आलं होतं. तिच्या जाण्यानं गाव तळमळलं. गावातल्या जुन्याजाणत्या आयाबायांनी त्या दिवशी तिचा उंबरठा सोडला नाही. तिच्या मुलानं शोकाकुल अवस्थेत अग्नी दिला.
तिसऱ्या दिवशी माती सावडायला पंचक्रोशीतल्या बायका आल्या. सगळे विधीसोपस्कार होताच सवाष्णीचं आहेव वाण म्हणून प्रत्येक स्त्रीला कुंकू लावलेले चुडे देण्याचं काम मालनच्या थोरल्या मुलीनं केलं. मालनच्या नावाचे सौभाग्याचे चुडे घेऊन घरी परतताना गावातल्या बायकांना हुंदके आवरत नव्हते. सगळे विधी पुरे होऊन दहाव्यानंतर घरी आल्यावर जगन्नाथाने घरातले उरलेसुरले चुडे, बांगड्या गावातल्या विधवा बायकांत वाटल्या. काहींनी चुडेबांगड्या घेतल्या, काहींनी दुसऱ्यांना दिल्या.
गावानं आश्चर्ययुक्त नाराजी व्यक्त केली. मालननं जितेपणीच मुलापाशी आपल्या वेदना बोलून दाखवत हे विचार मांडले होते. स्त्रियांत भेद करणारा, सौभाग्याचं लक्षण समजलं गेलेला चुडा अशा तऱ्हेने मालनने अखेरचा चुडा ठरवला. ती गावची अखेरची कासारीण ठरली. वैधव्याच्या भीतीनं जिवाचं रान करणाऱ्या मालननं गावावर उगवलेला तो एक विलक्षण सूड होता!
समीर गायकवाड, ८३८०९७३९७७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.