Village Story : मातीची तृप्तता...

Rural Story : एरवी त्याची चाहूल लागली की ताडकन उठून उभी राहणारी, मोठ्यानं हंबरडा फोडणारी कृष्णा आज काहीच प्रतिसाद देत नव्हती. दुरून कुठून तरी वीज पडल्यानं झाडाच्या जळण्याचा वास ओलेत्या आसमंतात धुमसत होता. नारायण आता पुरता कावराबावरा झाला होता.
Village Story
Village StoryAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Village Story Article : भल्या सकाळीच शेतातली सगळी आवराआवर करून आलेला नारायण आज त्याच्या मेव्हण्याकडे म्हणजेच श्रीधरकडे साठ कोस दूर आला होता. नारायणची बायको कौशल्या आणि श्रीधरची पत्नी गिरिजाबाई यांचं कधी पटलं नव्हतं. कौशल्या ही श्रीधरची मोठी बहीण. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यात अबोला होता. नारायण आणि श्रीधर एकमेकांशी बोलत, मात्र आपल्या बायकांमध्ये संवाद होत नाही याचे त्यांना वाईट वाटे. आपला नवरा नणंदेच्या नवऱ्यापुढे लाळ गाळतो असं गिरिजा शंभर बायकांत म्हणून दाखवे याचा कौशल्याला अतिशय संताप असे. दोघींच्या भांडणात अशा कैक गोष्टी होत्या. याच रागापायी कौशल्याने आता गिरिजाच्या बहिणीच्या लग्नाला जायचं टाळत नारायणला पुढं केलेलं. त्यानं तिला समजावून पाहिलं पण ती बधली नाही.

गेले कित्येक महिने उन्हात होरपळल्यानंतर आज पावसाची चिन्हे दिसत होती, पण लग्नाला जाणं भाग होतं. घाईगडबडीत वस्तीवरून निघताना त्याच्याकडून एक चूक झाली, नाही म्हणायला ती काही खूप मोठी गोष्ट नव्हती. त्याची लाडकी कृष्णा गाय त्याच्याच हातून रानाच्या मधोमध असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बांधून ठेवली गेली. दिवस डोईवर येताच तिला गोठ्यात आणून दावणीला बांधण्याचा कौशल्यासाठीचा निरोपही त्याच्याकडून राहून गेला. भल्या पहाटे उठून रानातली सगळी कामं आटोपून सकाळच्या पहिल्या एसटीने तो श्रीधरकडे गेला होता. एक तर बायको नाराज अन् त्यात कामाचा खोळंबा, यामुळे तो आधीच वैतागला होता. लग्नघरी येऊनही त्याचं चित्त मांडवात नव्हतंच. कारण तिथं आभाळ गच्च दाटून आलं होतं.

तिथं सुरू असलेल्या लगीनघाईत त्याची भूमिका केवळ बघ्याची झाली होती. केव्हा एकदा सगळे सोपस्कार आटोपतील असं त्याला झालं होतं. जेवणावळी सुरू झाल्या तेव्हा त्याची इच्छा नसूनही इतरांसोबत चार घास खावे लागले होते. काही तरी निमित्त करून तिथून निसटून जावं असा विचारही त्याच्या मनात तरळू लागला, पण नवरी वाटेला लावल्याबिगर आपण पोबारा केला, तर पाहुण्यांना वाईट वाटेल, शिवाय कौशल्येला ही गोष्ट कळली तर ती मनाला लावून घेईल याची आशंकाही होती. पाव्हण्यांची लगबग, कुरवल्यांची दंगामस्ती, पोराठोरांचा कालवा, वाजंत्र्यांची पीरपीर, नवरा-नवरीची तगमग, वरमाईचा तोरा, जेवणाचा ठसका, मांडववाऱ्याचा जोर, हौशागवशांच्या गप्पा, रुखवताचा रुबाब, वरबापाचा मान, आत्याबाईचा रुसवाफुगवा हे सारं एकेक करत शिगेला पोहोचत गेलं.

तिथून निघण्यास नारायण आता पुरता आतुर झाला होता. त्याचं सगळं लक्ष आभाळाकडं होतं आणि त्याची शंका खरी ठरली. दुपार सरायच्या बेतात असताना रुखवताची आवराआवरी सुरू व्हायला आणि पावसाची पहिली सर यायला एकच गाठ पडली. हळूहळू पावसाचा जोर वाढत चालला. लग्न सुखरूप लागल्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर तृप्तता झळकू लागली. कारण या पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अगदी नारायणास देखील, मात्र तो एकटाच तिथं चिंतातूर वाटत होता.

Village Story
Village Story : पावसाळी सूर्यफुलं...

आता आणखी काही वेळ तिथं थांबणं नारायणसाठी खूपच अवघड झालं होतं. आता निघायलाच हवं असं मनाशी ठरवत त्यानं आसपास नजर फिरवली. तो निघणार इतक्यात गिरिधर आणि गिरिजाबाई त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. त्याचे हात हातात घेत श्रीधर म्हणाला, ‘‘दाजी कुठं निघालाव? वाईच थांबा की! कौशल्येचं आणि तुमचं बी मानपान द्यायाचं राहिलंय. तेव्हढं नेलंच पाहिजे, नाहीतर आमच्यावर वझं व्हईल!’’ नारायणला आता थांबणं भाग पडलं. थोड्याच वेळात त्याला आहेर करून झाला. नवरी वाटं लावण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर मात्र नारायणला राहवलं नाही. त्यानं मनाचा हिय्या करून श्रीधरला कृष्णेची अडचण सांगितली. गिरिजाच्या आईवडिलांना भेटून तो तडक मांडवाबाहेर निघाला. “दाजी, पाऊस थांबेपर्यंत तरी थांबा” असं श्रीधर त्याला विनवत होता, पण त्यानं ऐकलं नाही! भर पावसात तो एसटी स्टॅण्डच्या दिशेने निघाला. मिळेल त्या वाहनानं गावाकडं गेलंच पाहिजे हा एकच ध्यास त्याच्या मनात होता.

एव्हाना दाट भरून आलेलं आभाळ आणखीच गडद झालं होतं. बराच वेळ थांबूनही एकही एसटी आली नाही की कुठलं जीपडं देखील आलं नाही. शेवटी तो तिथून बाहेर पडला. गावाकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं चालू लागला. आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता, गावातही असाच पाऊस असंल आणि कृष्णेला झाडाखालून काढलं नसंल तर काय अनर्थ ओढवेल याची त्याला भीती वाटत होती. अखेर बऱ्याच पायपिटीनंतर एकदाचा तो रायाच्या तिकटीपाशी येऊन थांबला. त्याचं गाऱ्हाणं नियंत्यानं ऐकलं, फटफट आवाज करणारी एक टमटम आली. त्यात बसून तो निघाला. गाडी मिळाल्याचं समाधान फार वेळ टिकलं नाही. कारण ती टमटम गलांडेवाडीपर्यंतच जाणार होती. अर्ध्या तासात तो तिथं पोहोचला. पुन्हा दुसऱ्या टमटमनं तो सारूळ्यापर्यंत आला. तिथून त्याला थेट गावापर्यंत येणारी जीप भेटली, मग मात्र तो आश्‍वस्त झाला. पण चिंता काही कमी झाली नव्हती, कारण सगळ्या रस्त्यानं इथून तिथून जोराचा पाऊस होता.

Village Story
Village Story : उरूस...

गावात पोहोचेपर्यंत अंधारानं वेशीवर माथा टेकला होता. गावातही मुसळधार पाऊस सुरूच होता, आता घरी जाण्यापेक्षा थेट शेतात गेलेलं बरं असा विचार करून त्यानं थेट शेताचा रस्ता धरला. इतका पाऊस पडूनही वाटंनं म्हणावा तसा चिखल ऱ्याडरबडी झाला नव्हता, कारण मातीच तितकी धगाटली होती. चालताना पाय मात्र घसरत होते. अधूनमधून चमकणाऱ्या विजा, सूं सूं आवाज करत वाहणारा सोसाट्याचा वारा आणि त्याच्या तालावर हलणारी झाडं, मधूनच येणारा गुरांच्या हंबरण्याचा आवाज यामुळे वातावरण गूढ होत चाललं होतं.

नारायणला कशाचीच तमा नव्हती. त्याचं सगळं लक्ष कृष्णेकडं लागून होतं. शेताच्या मधोमध असलेल्या झाडावर वीज पडण्याचा धोका अधिक होता, जो कृष्णेच्या जिवावर बेतला असता. भर पावसात पायपीट करून थकवा येऊनही नारायणची पावलं वेगानं पडत होती. शेत जसजसं जवळ येऊ लागलं तसतसे त्याचे श्‍वास वाढू लागले. वाटेत जाधवाच्या वस्तीवर रंगू जाधवांनी त्याला हाळी दिली होती, पण तो थांबला नाही, सदाशिव मान्यांच्या पोरानं घराबाहेर येत त्याला अडवून पाहिलं, पण नारायणानं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. तो आपला झपाझप ढांगा टाकत राहिला. त्याला कधी एकदा कोरक्याचा बांध लागतो असं झालेलं. कारण तो बांध ओलांडला की शेत नजरंस पडायचं.

अखेर कोरक्याचा बांध लागला. मग मात्र त्याला हायसं वाटलं. परंतु त्याचा आनंद फार टिकला नाही. आभाळातून कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि काळजात कळ यावी तशी प्रचंड ताकदीने आकाशात वीज कडाडली. भयंकर आवाजापाठोपाठ डोळे दिपवणारा प्रकाश पडला. नारायणच्या शेताच्या दिशेने आगीचा लोळ झेपावला. वीज पडल्याचा वज्राघात कानी पडताच दिग्मूढ झालेला नारायण एकटक पाहतच राहिला. जणू त्याच्या अंगातलं बळ एकाएकी नाहीसं झालं. मात्र पुढच्याच क्षणी तो भानावर आला. सगळं बळ एकवटून धावत निघाला. धावताना धोंड्यात पाय अडखळून खाली कोसळला.

अंग चिखलात बरबटून गेलं. उठून पुन्हा धावू लागताच पावसाचा जोर एकाएकी प्रचंड वाढला. समोरचं दिसेनासं झालं. रोजच्या सवयीची वाट असल्यानं तो अंदाजानं पावलं टाकत निघाला. वस्ती जवळ आली तसा त्याचा हुरूप वाढला. धावतच त्यानं कृष्णेला हाळी दिली. पण प्रतिसाद आला नाही, भीतीने त्याच्या अंगावर शहारे आले. भरपावसातही कानामागून घामाचा थेंब ओघळला. क्षणाचाही विलंब न लावता ढेकळांचा चिखल तुडवत तो कृष्णेच्या दिशेनं दौडत निघाला. त्याचा तोल जात असला तरी लक्ष टप्प्यात होतं.

आता जेमतेम काही फर्लांग अंतर उरलं होतं. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. कृष्णेचा आवाज कसला म्हणून कानी पडत नव्हता. एरवी त्याची चाहूल लागली की ताडकन उठून उभी राहणारी, मोठ्यांनं हंबरडा फोडणारी कृष्णा आज काहीच प्रतिसाद देत नव्हती. दुरून कुठून तरी वीज पडल्यानं झाडाच्या जळण्याचा वास ओलेत्या आसमंतात धुमसत होता. नारायण आता पुरता कावराबावरा झाला होता. काही ढांगात आता तो कृष्णेजवळ पोहोचणार होता. त्याचं सगळं ध्यान कृष्णेच्या चाहुलीकडं होतं. तेवढ्यात कृष्णेच्या हंबरण्याचा आवाज आला, त्याच्या जिवात जीव आला.

काही क्षणात तो तिच्यापाशी पोहोचला. तिनं अंग थरथरवलं. तिच्या अंगावर आंब्याची मोठी फांदी पडली होती, सगळी ताकद एकवटून त्यानं ती बाजूला केली आणि एका दमात कृष्णा ताडकन उभी राहिली. नारायण तिच्यावर अक्षरशः झेपावलाच. तिच्या पाठीवरून आता त्याचा हात फिरत होता. मान वेळावून आपल्या काटेरी जिभेनं ती त्याचं अंग चाटत होती. दोघांच्या डोळ्यातल्या पावसाला आता वाट मिळाली होती. त्यांचं रडणं पाहून पावसानं हात आखडता घेतला. पाऊस थांबला. काही वेळ ते दोघं तसेच निःशब्द होत एकमेकाला अनुभवत होते. आकाश निरभ्र होत गेलं, काळवंडल्या ढगात लुकलुकत्या चांदण्या दिसू लागल्या. त्यांचं हसू पानाफुलावर पाझरू लागलं. तटतटलेल्या कृष्णेला पान्हा फुटला. तिच्या दुग्धधारा मातीवर कोसळू लागल्या, मातीला पांढरा मुलामा चढू लागला. मातीच्या कुशीतला अंकुर खऱ्या अर्थानं तृप्त झाला.

समीर गायकवाड ८३८०९७३९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com