Water Conservation : मंत्र छोटा, तंत्र सोपे तरी त्याचे यश मोठे!

Water Management : जिथे दोनशे ते तीनशे मि.मी. पाऊस पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आपण समजू शकतो. पण ज्या ठिकाणी वर्षाला दोन ते तीन हजार मि.मी. पाऊस पडतो, तिथेही पाण्याचा प्रश्‍न असल्याचे जेव्हा आपल्याला समजते.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Water Management : जिथे दोनशे ते तीनशे मि.मी. पाऊस पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आपण समजू शकतो. पण ज्या ठिकाणी वर्षाला दोन ते तीन हजार मि.मी. पाऊस पडतो, तिथेही पाण्याचा प्रश्‍न असल्याचे जेव्हा आपल्याला समजते. तेव्हा आपण हैराण होतो. पण सह्याद्रीच्या पट्ट्यात पाण्याचा प्रश्‍न तर कायम चर्चेचा विषय आहे. पालघर, ठाण्यामधील आदिवासींना हीच समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आली आहे.

पावसाळ्यात भात शेती झाल्यावर पुढे पाण्याअभावी पडीक खाचरे किंवा शेतांकडे नुसते पाहून तर उदरनिर्वाह होत नाही. अशा स्थितीमध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानेवरी, राणशेत, निकणे या गावांतल्या आदिवासींसाठी शेत तलावांचा प्रकल्प फार उपयोगी ठरला आहे. त्यातून त्यांचे केवळ उत्पादन, उत्पन्नच वाढले असे नाही तर त्यांचे शहराकडे होणारे स्थलांतरही रोखले गेले. पावसाळा संपताच कामाच्या शोधात ओसाड पडणारी ही आदिवासी गावे आज गजबजलेली दिसतात, त्यामागे शेत तलावाचा छोटा मंत्र तारक ठरला आहे.

औषध निर्माण (फार्मसी) क्षेत्रातील लुपिन लॅबोरेटरीज ही बलाढ्य कंपनी. तिची स्थापना करणाऱ्या देशबंधू गुप्ता यांनी १९८८ मध्येच सामाजिक सेवेसाठी लुपिन फाउंडेशनचीही सुरुवात केली. औद्योगिक सामाजिक जबाबदारीसंदर्भात (सीएसआर) नियमावली तयार होण्याआधीच पंधरा ते वीस वर्षे ही सामाजिक सेवा सुरू झाली.

आज हे फाउंडेशन भारतातील ९ राज्यांतील २३ जिल्ह्यांतील सुमारे ५ हजार खेड्यांत विविध ग्रामविकासाची कामे करते. विशेषतः लुपिन लॅबोरेटरीचा प्रकल्प असलेल्या जिल्ह्यात आवर्जून सामाजिक कामे केली जातात.

कंपनीच्या ‘सीएसआर’ विभागाने २०१४ मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कामाला सुरुवात केली. सध्या पालघर व डहाणू तालुक्यातील एकूण २४ गावांमध्ये काम सुरू आहे. मुख्यतः डहाणू तालुक्यातही ९० टक्के कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली असलेल्या १६ गावांमध्ये आरोग्यापासून सुरू झालेले हे काम आता शिक्षण, शेती विकास, महिला सबलीकरण अशा प्रकारे विस्तारले आहे.

Farm Pond
Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

प्रकल्पाची वाटचाल

पूर्वी येथील लोक प्रामुख्याने खरिपात भातशेती करत. भात कापणी झाल्यानंतर डिसेंबर - जानेवारीमध्ये अन्यत्र मिठागरे, वीटभट्ट्या येथे मजुरीसाठी जात. खरेतर पालघर जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान २५६७ मि.मी आहे. पण रब्बीमध्ये पीक घेण्याइतके पाणीच उपलब्ध नसे. एखाद्याकडे थोडेबहुत पाणी असलेल्या शेतकऱ्याने शेती करण्याचे धाडस केले तर वन्य प्राणी उदा. डुकरे, ससे, कोल्हे इ. शेतीची नासधूस करीत. या शेतकऱ्यांना पाण्याची व अन्य शेती साधनांची उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने लुपिन फाउंडेशनने नाबार्डच्या सहकार्याने शेत तलावाची योजना आखली.

शेत तलावातून शाश्‍वत पाणी उपलब्ध झाल्यास शेतीचे उत्पादन वाढेल. त्याच प्रमाणे मत्स्यपालनातून उत्पन्नाला हातभार लागेल, हा उद्देश होता. नगदी पिकांसोबतच मत्स्यपालनाचा उद्देश असल्याने आदिवासी शेतकरी उत्साहाने तयार झाले. येथे कुटुंबाकडे सरासरी अडीच ते तीन एकर क्षेत्र आहे. त्यातील पाच गुंठ्यांत तीस बाय पंधरा फूट आकाराचे व तीन मीटर खोलीचे शेततळे तयार करायचे नियोजन केले. त्या प्लॅस्टिकचे आच्छादन केल्यामुळे साठणाऱ्या सुमारे नऊ लाख लिटर पाण्यावर सूक्ष्म सिंचन केल्यास किमान २० गुंठे रब्बी पीक खात्रीने करता येईल.

त्यामुळे शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक पंप, ड्रीप किंवा स्प्रिंकलरचा संचही उपलब्ध केला गेला. ही तळी केवळ पावसाच्या वाहत्या पाण्यावर भरायची, असा निर्णय झाला. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पहिल्या दोन - तीन पावसातच ही तळी भरतात. प्लॅस्टिक आच्छादनामुळे किमान चार फूट पाणी पातळी टिकून राहते. या पाण्यात मत्स्यबीज सोडले जातात. माशांच्या वाढीसाठी कृत्रिम खाद्यही दिले जाते. रब्बी हंगामासाठी या तळ्यातील पाणीही वापरले जाते. ते चार फुटापेक्षा थोडेफार कमी झाल्यास त्या प्रमाणात माशांचे प्रमाण कमी केले जाते.

या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने १५ टक्के रक्कम भरायची, तर उर्वरित अर्थसाह्य लुपिन फाउंडेशन व नाबार्ड यांच्याकडून करायची असे ठरले. लाभार्थ्यांनी मत्स्यशेती व भाजीपाला लागवड या दोन्ही विषयाशी संबंधित प्रशिक्षण घेणे सक्तीचे ठरवले. २० शेतकरी तयार झाले.

त्यांना भाजीपाला लागवड, विक्री व्यवस्थेबाबत लुपिन फाउंडेशनच्या प्रशिक्षकांनी, तर मत्स्यशेतीसाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथील श्रमजीवी स्वयंसेवी संस्थेत प्रशिक्षण दिले गेले. ही संस्था गोड्या व खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन प्रशिक्षणामध्ये कार्यरत आहे. एप्रिल, मे महिन्यांमध्ये वीस शेततळी बनवली गेली. त्या तळ्यामध्ये शेण व युरिया यांचे मिश्रण सोडण्यात आले. त्यामुळे त्यात शेवाळ निर्मिती झाली.

पहिल्या तीन पावसांतच तळी भरली. जुलैमध्ये प्रत्येक तळ्यात अडीच हजार रुपये किमतीची दोन हजार माशांची पिले सोडण्यात आली. या दोन हजार पिलांसाठी पहिल्या तीन महिन्यांचे खाद्य पुरवण्यात आले. त्याचा खर्च दोन हजार रु. झाला. पुढील पाच महिन्यांच्या खाद्याची तजवीज स्वतः लाभधारकांनी करायची होती. मार्च २०१९ मध्ये हे मासे आठ महिन्यांचे झाले. त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर माशांचे वजन करण्यात आले.

एका तळ्यात दोनशे दहा किलो ते तीनशे पंचवीस किलो मासे तयार झाले होते. या शेतकऱ्यांनी ते थोडे थोडे करून स्थानिक बाजारात विकले. त्यातून त्यांना तीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळाले. शिवाय या पाच ते सहा महिन्याच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना मासे खाण्यास मिळाले. सर्व तळ्यातील मत्स्यशेती यशस्वी झाली. सुरुवातीला पाय मागे घेणारे ४५ ते ५० शेतकरी आता संस्थेकडे अर्ज करून शेततळ्यांसाठी रांगेत आहेत.

शेतीही फुलली...

पूर्वी खरिपानंतर शेतीकडे न वळणाऱ्या या शेतकऱ्यांनी तळ्यातील पाणी वापरून वीस गुंठ्यांवर भाजीपाल्याची शेती केली. त्यात मुळा, गवार, मिरची, वांगी अशी स्थानिक बाजारातच चांगली मागणी असलेली पिके निवडली होती. प्रशिक्षणामुळे या आदिवासी शेतकऱ्यांना आत्मविश्‍वास आल्याने रब्बी हंगामातील दुसरे पीकही घेणे सुरू झाले. अर्धा एकरातून तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न हाती येत आहे.

आता तिसरे वर्ष असून, बऱ्याच जणांनी भाजीपाला लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी बाजूच्या ओढ्यातून किंवा विहिरीतून पाण्याचे आणखी नियोजन केले जात आहे. या उपक्रमाला अखिल भारतीय पातळीवरील तीन मानाचे व महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

हे प्रारूप जास्त पाऊस आणि कमी बाष्पीभवन पातळी असलेल्या भागात उत्तम कार्य करते. अन्य भागामध्येही काही बदल करून नक्कीच वापरता येईल, यात शंका नाही. कमी पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रात शेत तलावात पाणी प्रवेशासाठी एक इनलेट प्रदान करणे आवश्यक आहे.

Farm Pond
Water Conservation : ‘जीआयएस’ प्रणाली कशी चालते?

अन्य प्रकल्पातून शेतीला आधार

‘किचन न्यूट्रिशन गार्डन’ - हा पारंपरिक परसबागेसारखा उपक्रम असून, त्यात घराभोवती दीड ते दोन गुंठे जागेत काही विशिष्ट रचना करून नऊ ते दहा प्रकारचा भाजीपाला लागवड केली जाते. त्यातून पाच लोकांच्या कुटुंबाच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यातून पोषणमुल्याची खात्री मिळते. यात बियाण्यांसाठी पाचशे - सहाशे खर्च येत असला तरी त्यातून आनंदही मोठा मिळतो.

वाडी प्रकल्प ः कोकणामध्ये फळबागेला ‘वाडी’ म्हणतात. लुपिन फाउंडेशनच्या पालघर विभागाने ‘नाबार्ड’च्या सहकार्याने ४५० शेतकऱ्यांच्या शेतात वाडी प्रकल्प राबवला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एक एकर शेतात आंबा व काजूची ५० रोपे लावली आहेत. या उभ्या राहिलेल्या ४५० एकर फळबागेतून शाश्‍वत उत्पन्न सुरू झाले आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक पन्नास हजारांपासून एक ते लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे.

या भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणत ‘फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. त्यात ५२८ आदिवासी शेतकरी भागधारक आहेत. दुसऱ्याच वर्षी या कंपनीने दहा टन बियाणे विक्री, ३० टन खतांची विक्री आणि दोनशे दहा टन भाजीपाला उत्पादन व विक्री साध्य केली आहे.

यातून कंपनीला मिळालेल्या फायद्यातून मोठा हिस्सा भागधारकांना मिळाला आहे. अशा छोट्या छोट्या उपक्रमांतून आदिवासी शेतकरी कुटुंबांचे स्थलांतर आणि मजुरीचे कष्ट थांबले. आर्थिक सक्षमता वाढवी. भाज्या आणि माशांचा आहारात समावेश झाल्याने कुटुंबाचे विशेषतः मुलांचे कुपोषण थांबले. मुलांनी शाळा गजबजू लागल्या. या छोट्या वाटणाऱ्या शेत तलावाच्या मंत्राला कुटुंबाच्या उत्पन्न लाखांच्या घरात वाढवले.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com