Organic Farming : सेंद्रिय स्लरी, अर्क निर्मिती अन् पुरवठाही

Organic slurry Making : पुणे जिल्ह्यातील वडज येथील कुलदीप चव्हाण यांनी नोकरी सोडून सेंद्रिय पद्धतीवर भर देत ऊस, टोमॅटो, अन्य भाजीपाला, शेवंती, घेवडा आदींची शेती सुरू केली आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Organic Farm : पुणे जिल्ह्यातील वडज येथील कुलदीप चव्हाण यांनी नोकरी सोडून सेंद्रिय पद्धतीवर भर देत ऊस, टोमॅटो, अन्य भाजीपाला, शेवंती, घेवडा आदींची शेती सुरू केली आहे. सुमारे पाच प्रकारच्या सेंद्रिय स्लरी व चार प्रकारचे जैविक अर्क यांचे नियमित उत्पादन ते घेतात. स्वतःच्या शेतीत वापर करण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही मागणीनुसार त्यांचा पुरवठा करून त्यातून अतिरिक्त उत्पन्न स्रोत ते मिळवू लागले आहेत.

पुणे जिल्ह्यातील वडज (ता. जुन्नर) येथील कुलदीप चव्हाण यांची चार एकर शेती आहे.
पदवीनंतर ‘एमएसडब्ल्यू’ चे शिक्षण त्यांनी घेतले. ‘बाएफ’ या संस्थेत त्यांनी पाच वर्षे शिरूर व अन्य भागांत नोकरी केली. नोकरीत असताना शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि रासायनिक अवशेष मुक्त शेतीचे प्रशिक्षण ते द्यायचे. घरची शेती आई-वडील पाहायचे. वेळ मिळेल तसे कुलदीपही त्यात लक्ष घालायचे. सन २०२२ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शेतीचाच विकास करण्याचे ठरविले. आपल्या शेतीत ते टोमॅटो, कांदा, मिरची आदी भाजीपाला, ऊस, घेवडा, शेवंती आदी पिके घेतात. याशिवाय साडेचार एकर शेती भाडेतत्वावर घेतली असून, एकूण साडेआठ एकरांचे व्यवस्थापन ते सांभाळतात.

सेंद्रिय स्लरी व अर्कांची निर्मिती

सन २०१९ पासून आपली शेती टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा प्रयत्न कुलदीप करीत
आहेत. त्यसाठी रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर कमी करून घरच्याघरीच
सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली आहे. नोकरीत असतेवेळी शेतकऱ्यांना विविध अर्क आणि स्लरी बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा अनुभव त्यांना होता. आज ते सुमारे पाच प्रकारच्या स्लरी तयार करतात. यात जिवामृत, शेळी- मेंढी लेंडी, गांडूळ खत, ‘किचन वेस्ट’, कोंबडी खत आदींचा समावेश आहे. तर चार प्रकारचे अर्क तयार केले जातात. यात निंबोळी व कडुनिंब पाला, दशपर्णी अर्क,
ठेचा अर्क आदींचा समावेश आहे. दशपर्णी अर्क निर्मितीत कडुनिंब, करंज, सीताफळ, जांभूळ, घाणेरी,
टणटणी, धोतरा, निर्गुडी आदी वनस्पतीं व काही प्रमाणात गोमूत्राचा वापर होतो.

Organic Farming
Organic Fertilizer : निर्माल्यातून करणार सेंद्रिय खताची निर्मिती

निर्मिती पद्धत व वापर

मुख्य स्लरी प्लॅस्टिक ड्रम्समधून तयार होते. त्यासाठी एकदल व द्विदल धान्ये, दही, गूळ, अंडी, गोमूत्र, शेण आदींचा वापर होतो. वाटाणा, राजमा, हरभरा आणि सोयाबीन पीठ वापरण्यात येते.
ड्रममध्ये ढवळण्यासाठी मोटर बसविण्यात आली असून त्याद्वारे ऑक्सिजन निर्माण होतो. त्या योगे द्रावण चांगल्या प्रकारे ढवळून सुमारे ३० ते ४० दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचा अर्क निर्माण होतो.
त्यानंतर स्लरीचे पुढील द्रावण याच कल्चरच्या आधारे पुढील आठ दिवसांत तयार करण्यात येते.
स्लरीचा वापर पिकांसाठी वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत २० लिटर व पुढे तो वाढवत नेला जातो. अर्काचा वापरही १०, २० मिलि प्रति लिटर व गरजेनुसार त्यापुढे केला जातो. स्लरी किंवा अर्कासाठी आवश्‍यक कच्चा माल परिसरातील शेतकऱ्यांकडून घेण्यात येतो. कुलदीप यांना पत्नी गायत्री यांची मोठी मदत उत्पादन निर्मितीत होते.

Organic Farming
Organic Farming : जिवाणू स्लरी, दशपर्णी अर्कावर संशोधन होणार

शेतीत दिसतोय फायदा

कुलदीप सांगतात, की तीन वर्षांपासून सेंद्रिय निविष्ठांचा वापर सुरू केल्यापासून शेतीमाल उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा दिसू लागली आहे. माती परीक्षण आता करणार आहे. मात्र जमीन भुसभुसीत होऊ लागली आहे. मागील वर्षी टोमॅटोचे २० गुंठ्यांत ७०० क्रेट एवढे उत्पादन मिळाले. शेवतींची सुंमारे २० गुंठ्यांत पाच हजार रोपे आहेत. पूर्वी त्यातून २१०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले होते. यंदाच्या मेअखेरीस लागवड केलेल्या शेवंतीस आतापर्यंत ५२०० किलो फुलांचे उत्पादन मिळाले आहे. उसाचे उत्पादन एकरी ७० ते ७५ टनांवरून ८० ते ९० टनांपर्यंत पोहोचले आहे. अर्थात, सेंद्रिय निविष्ठांच्या वापराला व्यवस्थापनाची जोड दिल्यानेच सकारात्मक परिणाम मिळत आहेत. तसेच सेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्च व रासायनिक निविष्ठांवरील वापर १० ते ३० टक्‍क्यांनी कमी झाल्याचे कुलदीप यांनी संगितले.

निविष्ठांचा पुरवठा

अलीकडील काळात अनेक शेतकऱ्यांना घरच्याघरी स्लरी व अर्क तयार करणे वेळ, मनुष्यबळ आदी कारणांमुळे शक्य नसते. ही शेतकऱ्यांची गरज व संधी कुलदीप यांनी ओळखली. त्यांना या निविष्ठांचा पुरवठा करण्याचे ठरविले. त्या दृष्टीने ड्रम किंवा अन्य साहित्य उपलब्धता व गुंतवणूक केली. प्रति दिन सुमारे ३०० लिटर द्रावण तयार केले जाते. शेतकऱ्यांना स्लरींचे दोन ते पाच गुंठ्यांत प्रात्यक्षिक दिले आहे. आज परिसरातील सुमारे ५० पर्यंत शेतकरी नियमित स्वरूपात स्लरी व अर्क कुलदीप यांच्याकडून घेतात. आगाऊ मागणीनुसार उत्पादन तयार केले जाते. कुलदीप यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात स्टॉल उभारला होता. त्याद्वारेही त्यांनी आपल्या उत्पादनांचे ‘प्रमोशन’ केले. वीस लिटर व ३५ लिटरच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये स्लरी उपलब्ध असून, ती व अर्क प्रति लिटर २० रुपये असा दर आहे. शंभर लिटरपेक्षा अधिक मागणी असेल किंवा चार- पाच शेतकऱ्यांची एकत्रित मागणी असेल, तर थेट घरी पोहोच करण्याचीही सेवा दिली जाते. या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधनही तयार झाले आहे. प्रत्येक घरामध्ये भाजीपाल्याचे अवशेष, ‘किचन वेस्ट’ उपलब्ध होत असते. प्रत्येक शेतकरीदेखील आपल्या परसबागेसाठी ड्रममध्ये ‘किचन वेस्ट स्लरी’ तयार करू शकतो असे कुलदीप म्हणतात.


कुलदीप चव्हाण, ९९७०८९८८१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com