
Pune News: मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर राज्यात कायम आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने खरीप पेरणीची तयारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, फळबागांसह, बाजरी, भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळी पिके काढता येत नसल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पंचनामे सुरू झाले असून, नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली यांसह मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांत गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सातारा शहरासह जिल्हाभरात सलग पाचव्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. या मॉन्सूनपूर्व पावसाच्या सततच्या संततधारेमुळे शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आले, हळद लागणीसह इतर पिकांच्या लावणीसाठी शेतजमिनींची मशागती पूर्णतः खोळंबलेल्या आहेत. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ४३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीच्या नुकसानीबरोबरच जनजीवन विस्कळित केले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात बहुतांश सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. बारामती, सासवड, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (ता.२३) पहाटे जोरदार पाऊस झाला.
कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागती खोळंबल्या आहेत. यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या पावसामुळे अनेक भागांत पूर्वमशागती करण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (ता. २१) ३४.३ मिलिमीटर, तर गुरुवारी (ता. २२) २९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पूर्वमशागतीही खोळंबल्या आहेत. अनेक ठिकाणी शेताच्या ताली भरून फुटल्या आहेत. शेतशिवार वाहून गेले आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. उन्हाळी पिके काढता येत नसल्याने ती शेतात कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. पावसामुळे घरे, गोठ्यांची मोठी पडझड झाली आहे. नेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून महावितरणचे ७० हून अधिक गावांत वीजवाहिन्या, वीजखांब कोसळून २१ लाखांचे नुकसान झाले आहे. काही भागांतील पर्यायी मार्गच वाहून गेल्याचे प्रकार झाले आहेत.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावतीत १२ हजार हेक्टरचे नुकसान
अमरावतीमध्ये १ ते २० मे या कालावधीत जिल्ह्यात ५४.५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील १२ हजार २२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तीन जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. दहा मोठ्या व २२ लहान जनावरे दगावले असल्याचे महसूलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतीचे या पावसाने नुकसान झाले असून संत्रा, केळी, कांदा, तीळ व भाजीपाल्यासह १२ हजार २२६ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. ही पिके या पावसाने पूर्णतः खराब झाली असून जिल्हा महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे आदेश जारी झाले आहेत. तथापि, कृषी सहायकांचा संप सुरू असल्याने पंचनामे रखडले आहेत.
- कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू. करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू
- पुणे शहर परिसर, जिल्ह्यात पहाटे संततधार, दिवसा उघडीप
- लातूर-धाराशिव रात्रभर संततधार पाऊस. सकाळी ढगाळ वातावरण
- छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर आभाळ
- परभणी, हिंगोलीत ढगाळ वातावरण
- खानदेशात ढगाळ वातावरण
- अकोल्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही
- अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी पावसाची रिपरिप.
- नाशिकमध्ये पावसाची काहीशी उघडीप
- सोलापुरात काही भागांत पावसाची हजेरी
नुकसान
- खरिपातील मशागतीची कामे रखडली आहेत.
- उन्हाळी भुईमूग व कांदा पिकांचे काढणी न करता आल्याने नुकसान.
- सततच्या पावसामुळे आले, हळद लागवड होत नसल्यामुळे लागवड लांबणार
- पाऊस, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेतील सूक्ष्म घडनिर्मितीवर परिणाम होणार आहे.
- पावसामुळे फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- संत्रा, केळी, कांदा, तीळ व भाजीपाल्याला फटका
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिलिमीटरमध्ये)
सातारा ६५.५, जावळी १०७.३, पाटण ४४.५, कऱ्हाड १८.८, कोरेगाव ४३.९, खटाव १३.१, माण १०.२, फलटण २०, खंडाळा ४३.३०, वाई ७८, महाबळेश्वर १०३.३.
सिंधुदुर्गातील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
देवगड - १०६, मालवण - ५८, सावंतवाडी - १०२, वेंगुर्ला - १६७, कणकवली - ११२, कुडाळ - ११४, वैभववाडी - ९२, दोडामार्ग - ४५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.