Khandeshi Banana : ‘खानदेशी केळी’चा निर्यातक्षम ब्रॅण्ड

Agricultural Branding : केळीने खानदेशचे नाव जगात पुढे नेले आहे. या केळीने दिल्ली, पंजाब, काश्मीरच्या बाजारात डंका वाजविला. आता आखातातही खानदेशी केळीला गिऱ्हाइकी, बाजार आहे. निर्यातक्षम केळी उत्पादनाचे नवे पल्ले केळीने गाठले असून, सातत्यही कायम आहे.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

चंद्रकांत जाधव

Banana Farming : केळी पिकाचे खानदेश किंवा जळगाव हे समीकरणच आहे. खानदेशातील केळीचा मोठा रंजक इतिहास आहे. शिवकाळात कोकणातून जामनेरातील शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मंडळींनी हे वाण आणले. तेथून हे वाण रावेरातील कोचूर व लगत पोहोचले. पहिलं बेणं ‘राजेंचं देणं’ असेही खानदेशात म्हटले जाते. खानदेशातील जिद्दी, कष्टकरी शेतकऱ्यांनी केळीचा प्रसार, संवर्धन केले. प्रतिकूल स्थितीतही केळी पीक यशस्वी केले.

शेतकरी समूह आले एकत्र

नैसर्गिक आपत्तीतही नवा बाजार आणि त्याच्या मापदंडानुसार केळी उत्पादनाचे नवे आव्हान निर्माण झाले होते. अशात खासगी कंपन्या, कृषी यंत्रणा, केळी खरेदीदार आदींनी निर्यातक्षम, दर्जेदार केळी उत्पादनाचे प्रयत्न सुरू केले. पारंपरिक पद्धतींपासून दूर होऊन फ्रूट केअर व नवे खत, पाणी व्यवस्थापन यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व नंदुरबारात त्यासाठी प्रयोग सुरू झाले, याकरिता शेतकरी समूह एकत्र आले.

Banana
Banana Farming : निर्यातक्षम केळी उत्पादनात तयार झाली ओळख

निर्यातक्षम केळी उत्पादनाला गती

करपा रोगासह अन्य समस्यांवर मात करून निर्यातक्षम केळी उत्पादनाला गती आली. उतिसंवर्धित रोपे, ग्रॅण्ड नैन वाणाचा अधिकचा प्रसार झाला. रावेरातील तांदलवाडी, निंबोल, कुंभारखेडा, केऱ्हाळे, वाघोदा बुद्रुक, मस्कावद, मुक्ताईनगरातील अंतुर्ली, नायगाव, धाबे, पिंप्री नांदू, यावलमधील न्हावी, फैजपूर, जामनेरातील गारखेडा, हिवरखेडा, पळासखेडा, लोंढ्री, सोनाळे, भडगावातील पिचर्डे, चोपड्यातील वढोदा, मोहिदे, माचले, गोरगावले, धुळ्यात शिरपुरातील तरडी, निमझरी, नंदुरबारात शहाद्यातील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, जवखेडा आदी अनेक गावांत निर्यातक्षम केळी उत्पादक गट तयार झाले.

आखातात डंका

२०१६ मध्ये दोन कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) बहरीन व इराण येथे प्रथमच जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी (ता. रावेर) येथून पाठविण्यात आले. तेव्हापासून खानदेशी केळीचा डंका आखातातही वाजत आहे. बहरीन, मस्कत, इराण, इराक, दुबई, सौदी अरेबिया आदी देशांत केळीची पाठवणूक केली जात आहे. शहाद्यातील ब्राह्मणपुरी, जळगावात रावेरातील तांदलवाडी, वाघोदा, यावलमधील फैजपूर, मुक्ताईनगरातील अंतुर्ली आदी भागांत केळी निर्यात सुविधा केंद्र उभे राहीले आहेत.

Banana
Banana Price : केळी दरात घसरण कायम! उत्तरेकडील मागणी घटल्याने शेतकऱ्यांवर संकट

शेतकऱ्यांनी हे केंद्र उभारले आहेत. ममुराबाद (ता. जळगाव) व पाल (ता. रावे) येथील कृषी विज्ञान केंद्राने निर्यातक्षम केळी उत्पादनासंबंधी क्लस्टर तयार केले आहेत. अलीकडेच भडगाव तालुक्यात त्यासंबंधी ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राने मोठे काम केले आहे. आखातातच नव्हे तर युरोपातही एका कंपनीने तरडी (ता. शिरपूर) येथून केळीची पाठवणूक केली आहे. हा युरोपात केळी पाठवणुकीचा पहिलाच प्रयत्न होता.

तसेच रशिया, ब्रिटन येथे केळी पाठवणुकीसंबंधी सातत्य कसे राहील यावरही निर्यातदार व शेतकरी समूह काम करीत आहेत. यातून कोट्यवधींची उलाढाल खानदेशात होऊ लागली आहे.

यामुळे दरही चांगले मिळू लागले आहेत. स्थानिक बाजारात पोकळी तयार होऊन दर्जेदार केळीला बारमाही उठावही असतो.

निर्यातीला मिळाले बळ

आजघडीला खानदेशात उतिसंवर्धित केळी रोपांखालील क्षेत्र ४० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. खानदेशात केळीची लागवड ८३ ते ८५ हजार हेक्टरवर केली जाते. त्यात जळगावातील लागवड ६५ ते ६८ हजार हेक्टरपर्यंत असते. यातील कमाल क्षेत्रात फळांचे निर्यातीच्या दृष्टीने व्यवस्थापन केले जात असून, यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादनाला बळ मिळाले आहे. देशातील नामांकित केळी निर्यातदार खानदेशातून बारमाही केळी खरेदी व तिची निर्यात करू लागले आहेत.

खानदेशातील केळी निर्यात

(निर्यात कंटेनरमध्ये, एक कंटेनर २० टन क्षमता)

२०१७ ... ५०

२०१८ ... १२०

२०१९ ... १२००

२०२० ... १५००

२०२१ १२००

२०२२ २५००

२०२३ २९००

२०२४ ३०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com