Climate Summit : हवामान शिखर परिषदेमध्ये शाश्‍वत पशूपालनाची चर्चा

Weather Conference : अझरबैजान देशातील बाकू शहरामध्ये १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या दरम्यान २९ वी हवामान शिखर परिषद संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांसोबत ‘पशुधन आरोग्य, हवामान बदल कमी करणे व त्याला अनुसरून शाश्‍वत पशुधन विकासासाठी वित्तपुरवठा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
Livestock Farming
Livestock FarmingAgrowon
Published on
Updated on

Sustainable Livestock Farming : अझरबैजान देशातील बाकू शहरामध्ये १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या दरम्यान २९ वी हवामान शिखर परिषद संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांसोबत ‘पशुधन आरोग्य, हवामान बदल कमी करणे व त्याला अनुसरून शाश्‍वत पशुधन विकासासाठी वित्तपुरवठा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या चर्चेचा घेतलेला आढावा...

अझरबैजान देशामध्ये संपन्न झालेल्या हवामान शिखर परिषदेचा समुदाय आणि पर्यावरणीय प्रणालींवर गुणात्मक प्रभाव साधण्यासाठी नावीन्यपूर्ण कार्बन वित्तपुरवठा यंत्रणेवर विचारमंथन तसेच हवामान बदल प्रभाव कमी करण्यासाठी तांत्रिक आणि सामाजिक-आर्थिक उपायांची देवाणघेवाणीबाबत जागतिक प्रतिनिधी आणि भागधारकांसोबत चर्चा करणे हा महत्त्वाचा उद्देश होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल अधिवेशनासाठी बाएफ निरीक्षक संस्था म्हणून मान्यताप्राप्त आहे. हवामान शिखर परिषदेमध्ये बाएफ संस्थेचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. भरत काकडे, डॉ. रविराज जाधव, डॉ.विठ्ठल कौठाळे, संदीप यादव आणि स्नेहा शिंदे यांचा समावेश होता.

बाएफ संस्थेसोबत इंटरनॅशनल लाइव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूट (ILRI), युरोपियन डेअरी असोसिएशन (EDA), इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन (IDF) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर (IDRC) या संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या सोबत परिषदेमध्ये ‘पशुधन आरोग्य, हवामान बदल कमी करणे व त्याला अनुसरून शाश्‍वत पशुधन विकासासाठी वित्तपुरवठा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

जनावरांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून शेती व्यवस्थेत हवामान बदलास अनुकूल पीक पद्धती आणणे तसेच विविध पशुधन उत्पादन प्रणालींमध्ये आवश्यक विविध पद्धतींवर अभ्यास आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी वित्तीय पुरवठ्याबाबत विस्तृत चर्चा झाली.

Livestock Farming
Winter Livestock Care : थंडी काळातील जनावरांचे व्यवस्थापन

चर्चासत्रातील महत्त्वाचे मुद्दे

हवामान बदलाच्या दायित्वामध्ये पशुधनाचे महत्त्व असूनही, प्रत्येक देश त्यांच्या हवामान धोरणांत राष्ट्रीय निर्धारित असूनही या विषयास मुख्य केंद्रबिंदू मानत नाहीत, अशी नोंद विविध क्षेत्रांतील वक्त्यांनी घेतली. या वेळी मार्गदर्शन करताना विल्यम सटन म्हणाले, की संशोधनात असे दिसून आले आहे, की उपलब्ध पद्धती आणि संसाधनांचा अवलंब करून पशुधनापासून उत्सर्जन ३० टक्के कमी केले जाऊ शकते. हरितगृह वायू उत्सर्जनात या क्षेत्राचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा जास्त असूनही केवळ चार टक्के हवामान वित्तपुरवठा शेतीला केला जातो. याव्यतिरिक्त शेतीला जाणाऱ्या रकमेपैकी, फक्त दोन टक्के पशुधनासाठी उपलब्ध आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, केवळ एक टक्का हवामान वित्तपुरवठा लहान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो.

बाएफ संस्थेने ‘पशुधन उत्सर्जित मिथेन व्यवस्थापन’ आणि ‘शाश्‍वत कृषी अन्न प्रणालीतील हवामान बदलास अनुकूल उन्नत मार्ग’ या दोन विषयांवर उच्चस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. पहिल्या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पशुधन संस्थांबरोबर विचार आणि तंत्रज्ञानाची देवाण घेवाण झाली. तसेच कार्यक्षम उत्सर्जन व्यवस्थापनासाठी प्रभावी उपायांचे सक्षमीकरण या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

दुसऱ्या चर्चासत्रामध्ये कृषी आधारित अन्न प्रणालीमधील आव्हाने आणि हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती अवलंब करण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात आले. या चर्चासत्रांमध्ये बाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी शाश्‍वत शेती आणि हवामान बदल आधारित शेती पद्धतीसाठी उपयुक्त नैसर्गिक उपाय आणि संसाधनांबाबतचे अनुभव मांडले.

बाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी ‘ड्रायव्हिंग क्लायमेट ॲक्शन : उप-राष्ट्रीय उपक्रमांची भूमिका’, ‘जागतिक हवामान कृतीचे सक्षमीकरण : आव्हाने आणि संधी’, ‘जैवविविधता, उज्ज्वल भविष्यासाठी भू-पृष्ठीय आणि सागरी संसाधनांचे एकत्रित संधारण’, ‘३०० टक्के अधिक अन्न, ८० टक्के कमी पाणी आणि शून्य कार्बन डायऑक्साइड तसेच कमी मिथेन असणाऱ्या अन्न साखळी पर्यायांचा विचार करणे’ या पाच चर्चासत्रांत सहभाग घेतला. याव्यतिरिक्त तज्ज्ञांनी अविकसित राष्ट्रांमधील बदलत्या हवामान पर्यायांसाठी वित्तपुरवठा आणि ‘जागतिक विचार अन् स्थानीय समाधान या अंतर्गत अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील होणारा अन्नाचा ऱ्हास हवामान बदल आधारित पद्धतींद्वारे कमी करणे’ या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

Livestock Farming
Animal Insemination : कृत्रिम रेतनावेळी घ्यावयाची काळजी

हवामानबदल आधारित तंत्रामध्ये ‘बाएफ’चे कार्य

संस्थेने हवामान बदलास अनुकूल कृषी कार्यक्रम देशातील १४ राज्यांतील १,८९४ गावांमधील ३०,३९३८ गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. या कुटुंबांना हवामान बदलास अनुकूल शेती आणि पीक पद्धतींचा फायदा होत आहे. या कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्या या इतर विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये जाणवणाऱ्या परिस्थितींशी साधर्म्य असणाऱ्या आहेत.

संस्थेचा पशुधन व्यवस्थापन कार्यक्रम पशुधनातील आनुवंशिक सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि खाद्य व्यवस्थापन याद्वारे दरवर्षी ३.५ दशलक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. याचा जनावरांची उत्पादकता आणि अल्पभूधारकांचे उत्पन्न तसेच प्रथिने पुरवठ्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. राज्य सरकारांच्या सहयोगाने चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहिले आहे. तसेच मिथेन उत्सर्जनात घट होत आहे. जनावरांच्या शेणावर प्रक्रियाकरून जमिनीत हे घटक परत वापरले जातात. यामुळे पिकाची उत्पादकता सुधारली आहे. अशाप्रकारे पीक-पशुधन प्रणाली एकात्मिक आणि चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी पूरक ठरते, जी शाश्वत उपजीविकेसाठीही अनुकूल समजली जाते.

संस्थेचा कृषी वनीकरण कार्यक्रम ‘वाडी’ या नावाने ओळखला जातो. हा कार्यक्रम आदिवासी आणि ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यात सक्षम ठरला आहे. ज्यामुळे फळबागांच्या माध्यमातून कुटुंबांना उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत उपलब्ध होतो. जमीन आणि झाडांमध्ये कार्बन स्थिरीकरण करण्यास मदत होते, ज्यामुळे अल्पभूधारकांच्या उपजीविकेचे कार्बन स्थिरीकरणाचे दुहेरी उद्दिष्ट साध्य होते. संस्थेच्या माध्यमातून ९३,३७५ हेक्टर जमिनीवर फळबागा (वाडी) उभारून १३ राज्यांतील ७,३८१ गावांतील २३,३४३८ आदिवासी आणि गोरगरीब कुटुंबांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे.

अन्न, इंधन, खते, चारा आणि उत्पादने निर्मितीसाठी काटेविरहित निवडुंगाची कार्बन स्थिरीकरण क्षमता चांगली आहे. वाळवंटी तसेच कोरडवाहू भागात शेतकऱ्यांना शाश्‍वत उपजीविका प्रदान करणारा संस्थेचा हा नवोन्मेशी कार्यक्रम आहे.

सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्र आणि विशेषतः पशुधनावर लक्ष केंद्रित करणे आणि उच्च पातळीवरील वित्तपुरवठा आवश्यक आहे. परिषदेमधील विविध चर्चासत्रांद्वारे सहभागी बाएफ संस्थेच्या सदस्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उपजीविकेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षमता असलेल्या विविध कार्यक्रम जसे कृषी वनीकरण, पशुधन व्यवस्थापन, हवामान अनुकूल आणि बदल आधारित शेती आणि पीक पद्धती इत्यादी विषयी संस्थेचे कार्य आणि त्याचे सकारात्मक परिणाम मांडण्यात यश आले.

हवामान कृतीवर काम करणाऱ्या अराजकीय किंवा खाजगी वित्त संस्था, फाउंडेशन आणि हवामान आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांच्यासोबत सहयोगाची ही एक चांगली संधी होती. जगातील अविकसित आणि विकसनशील देशातील अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि हवामान बदलाच्या प्रभावाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेचे विविध कार्यक्रम मार्गदर्शक ठरणारे आहेत.

परिषदेतील महत्वाचे मुद्दे

नवीन हवामान वित्तपुरवठा ध्येय : विकसनशील देशांसाठी वार्षिक हवामान वित्तपुरवठा १०० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलर करण्यात आला, २०३५ पर्यंत या उद्दिष्टाची अंमलबजावणी.

विस्तारित जागतिक वित्तपुरवठा : सर्व स्त्रोतांमधून विकसनशील देशांना मिळणाऱ्या एकूण हवामान वित्तपुरवठ्याची रक्कम २०३५ पर्यंत१.३ ट्रिलियन डॉलर प्रतिवर्ष वाढवण्याचा निर्धार.

कार्बन व्यापार व्यवस्थापन : पॅरिस कराराच्या कलम सहा अंतर्गत आंतरराष्ट्रीय कार्बन व्यापारासाठी नियमावली अंतिम करण्यात आली असून, संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील कार्बन बाजारपेठेची स्थापना.

पारदर्शकतेत सुधारणा : विकसित देशांकडून हवामान कार्यक्रमांचे सविस्तर अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा. यामुळे हवामान कारवाईची पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढले.

प्रगत अनुकूलन कार्यवाही : बाकू अनुकूलन पथदर्थी प्रकल्पास सुरूवात. अल्प विकसित देशांसाठी राष्ट्रीय अनुकूलन योजनांना अधिक समर्थन.

सशक्त लिंग समानता कृती : लिंग आणि हवामान बदल निगडीत चालू कार्यक्रमाचा विस्तार. नवीन लिंग कृती आराखडा तयार करण्यासाठी सहमती.

आदिवासी, स्थानिक समुदायांचा सहभाग : हवामान कृती कार्यक्रमात आदिवासी आणि स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवण्यासाठी बाकू कार्ययोजनेचा स्वीकार.

देशांकडून पुढाकार : इंग्लंड आणि ब्राझील यांनी त्यांच्या हवामान कृती योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांचा संकल्प.

१.५ अंश सेल्सिअस तापमान नियंत्रणावर भर : औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअस मर्यादित ठेवण्याच्या गरजेवर पुन्हा जोर.

हवामान कृती कार्यवाहीवर भर : व्यवसाय, नागरी समाज, इतर गैर-पक्षीय हितधारकांनी हवामान उपाययोजनांना चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न प्रदर्शित करण्यात आले.

- डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१

(बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com