
Sangli News: अलमट्टी धरणातील जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७.५० मीटरखाली ठेवणे, हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पूर काळात उघडे ठेवणे, बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठीचे बर्गे काढणे, रियल टाइम डाटा बेस यंत्रणेचा विस्तार नारायणपूर धरणापर्यंत कार्यान्वित करणे या बाबींवर सांगली, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक गुरुवारी (ता. २९) होणार आहे. या बैठकीत आगामी पावसाळ्यातील संयुक्त जल व्यवस्थापनाबाबत अंतिम निर्णय होणार आहेत.
या बैठकीला जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजयपूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता तसेच सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील विजयपूर, बागलकोट, बेळगाव या पूरप्रवण जिल्ह्यातील जलव्यवस्थापनाशी निगडित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सीमा भागातील जिल्ह्यांतील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, पाणीपातळीची देवाणघेवाण व अन्य उपाययोजनांच्या अनुषंगाने कर्नाटकचे प्रतिनिधी वारणा धरण, कोयना धरण व कोल्हापूर पद्धतीच्या राजापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी म्हणून नेमले जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पूरपरिस्थिती ओढवल्यास चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील. स्थानिक यंत्रणा, महसूल विभाग, पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि जलसंपदा विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ केला जाणार आहे. संभाव्य पूरस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी इशारा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.
विसर्गाची माहिती देणार
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वय या प्रमुख मुद्द्यांवरही चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे ठरवले.
अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल. दोन्ही राज्यांमधील संबंधित जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांनी परस्पर समन्वयाने पूर व्यवस्थापनासाठी ठोस नियोजन करण्याबद्दल चर्चा केली. सुसूत्र समन्वय सांघिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचा निर्णय झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.