Processing Industry
Processing Industry Agrowon

Processing Industry : करवंद सरबत, लोणच्याचा तयार केला ब्रॅण्ड

Karvand Processing : शेणवडे (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील शारदा बापू जाधव यांनी गेल्या चौदा वर्षांपासून करवंद सरबत आणि लोणचे निर्मितीतून आर्थिक स्थिरता मिळविली आहे.

राजकुमार चौगुले

Sharda Jadhav Story : शेणवडे (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील शारदा बापू जाधव यांनी गेल्या चौदा वर्षांपासून करवंद सरबत आणि लोणचे निर्मितीतून आर्थिक स्थिरता मिळविली आहे. केवळ दीड महिन्याच्या करवंद संकलनातून पाच हजार लिटर सरबत, एक टन लोणचे निर्मिती करून विक्री केली जाते. प्रक्रिया व्‍यवसायाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील सुमारे शंभर महिलांना रोजगार दिला आहे.

कोल्हापूर शहरापासून सुमारे चाळीस किलोमीटरवरील शेणवडे हे छोटेसे गाव. गगनबावडा हा जिल्ह्यातील दुर्गम तालुका. साहजिकच शेणवडे गावही दुर्गम, डोंगराळ भागाचेच प्रतिनिधित्व करते. या गावशिवारात तलाव असल्याने उसासह कलिंगड, भाजीपाल्याची शेती केली जाते. याच गावात सौ. शारदा आणि बापू हे जाधव दांपत्य राहते. त्यांची चार एकर शेती आहे.

ऊस, भात, कलिंगड आदी पिके ते घेतात. मात्र या पिकांपासून अपेक्षित आर्थिक फायदा मिळत नसल्याने त्यांनी प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने विचार सुरू केला. बापू जाधव हे कोल्हापूर येथील जनभारती न्यास या संस्थेचे सदस्य आहेत. दुर्गम भागातील महिलांचे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सक्षमीकरण व्हावे यासाठी संस्थेने शारदा ताईंना प्रोत्साहन दिले. त्यातूनच शारदाताईंना प्रक्रिया उद्योगाची दिशा मिळाली.

शेणवडे हा डोंगराळ भाग असल्याने करवंदाची झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. या गावशिवारातील करवंद कोल्हापूर बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. तालुक्‍यातील अनेकांना करवंद हे फळ हक्काचा रोजगार देणारे आहे. साहजिकच करवंदांचा पुरेपूर उपयोग करण्याच्या दृष्टीने त्यांनी सरबत, लोणचे तयार करण्याची दिशा मिळाली. २००९ पासून शारदाताईंनी हा व्यवसाय नेटाने सुरू ठेवला आहे. करवंदांचा पंधरा दिवसांचा उच्च हंगाम असतो.

या कालावधीत मागणीनुसार सरबत आणि लोणचे तयार केले जाते. त्याची वर्षभर विक्री केली जाते. डोंगराळ भाग असला तरी थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर पुरेसे आर्थिक उत्पन्न मिळू शकते हे शारदाताईंनी प्रक्रिया व्यवसायातून दाखवले आहे.


साधारणपणे १५ ते ३० मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत करवंद उत्पादनाचा उच्च हंगाम असतो. तसा हंगाम दीड महिना चालतो. गारिवडे या शेजारील गावातील शेतकरी, मजुरांकडूनही करवंदांची खरेदी केली जाते. प्रत्येक व्‍यक्‍ती दिवसाला सुमारे ३० किलोपर्यंत करवंदे तोडते. करवंद काढल्‍यानंतर २५ ते ३० रुपये किलो दराने खरेदी होते. दररोज सुमारे ३०० ते ४०० किलो करवंदांची खरेदी केली जाते. शेणवडे गाव शिवारातील अनेक कुटुंबातील सदस्य डोंगरातून करवंद संकलन करून त्याच दिवशी जाधव यांना विक्री करतात.

Processing Industry
Milk Processing : ‘वाळेखिंडीचे लकडे पेढे ‘ब्रॅण्ड’ लोकप्रिय केला

...असा आहे प्रक्रिया उद्योग
शारदाताई करवंद सरबत निर्मितीसाठी कटिंग आणि प्रेस यंत्राचा वापर करतात. करवंद फळे आणल्यानंतर थंड आणि गरम पाण्याद्वारे स्वच्छता करून प्रतवारी केली जाते. स्वच्छ, चांगली करवंद फळे कटिंग यंत्रामध्ये टाकली जातात. त्यानंतर तयार लगदा प्रेस यंत्रामध्ये टाकून बिया बाजूला काढल्या जातात. प्रति किलो करवंदांपासून सुमारे ४०० ग्रॅम रस मिळतो. या रसात साखर आणि पूरक घटकांचे मिश्रण केले जाते.

मिश्रण सातत्याने ढवळून दररोज सुमारे २०० लिटर सरबत तयार केले जाते. बारा बाटल्यांचा एक बॉक्‍स याप्रमाणे पॅकिंग केले जाते. सरबत निर्मितीसाठी अन्न सुरक्षितता विषयक केंद्रीय सरकारी संस्थेचे त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे.
एका हंगामात पाच हजार लिटर सरबताची निर्मिती होते. दोनशे मिलिपासून ते एक लिटरपर्यंत सरबताचे बाटलीमध्ये पॅकिंग केले जाते. याची विक्री विशेष करून विविध महोत्सवामध्ये होते.

वर्षभर शासकीय तसेच विविध संस्थांमार्फत महोत्सव आयोजित केले जातात. या शिवाय शेणवडे येथे कायम स्वरूपी विक्री केंद्र आहे. यातून वर्षभर सरबताची विक्री होते. सरबत विक्रीतून चाळीस टक्क्यांपर्यंत नफा राहत असल्‍याचे शारदाताई सांगतात. सरबत तयार करण्यापासून ते विक्री करेपर्यंत त्यांना मीना हरगाणे, संगीता सावंत, उषा पाटील, अनुराधा कदम आदी सहकारी महिला सातत्‍याने मदत करतात.

Processing Industry
Food Processing : प्रक्रिया उद्योगातून तयार केला ब्रॅण्ड

तयार केला ब्रॅण्ड ः
सरबत आणि अन्‍य पदार्थांच्या विक्रीसाठी शारदाताईंनी ‘श्री गगनगिरी प्रॉडक्ट’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. अर्धा लिटर करवंद सरबत १८० रुपये आणि २०० ग्रॅम लोणचे ८० रुपये या दराने विक्री होते. दर हंगामात ५०० किलो लोणचे आणि पाच हजार लिटर सरबताची विक्री होते. केवळ स्‍वतःपुरता व्‍यवसाय न करता गगनगिरी बचत गटाच्या माध्यमातून शारदाताईंनी गावातील अनेक महिलांना आधार दिला आहे. बचत गटाच्‍या माध्‍यमातून महिलांना आर्थिक साह्य केले आहे.


करवंद गोळा करणे, सरबत, लोणचे निर्मिती आणि त्‍याची विक्री होईपर्यंत प्रत्येक महिलेचा सहभाग असतो. शारदाताई यांचे पती बापू यांनी पुढाकार घेऊन गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली असून ते अध्यक्ष आहेत. गाव परिसरातील बचत गटांना सभासद करून त्‍यांना करवंद लोणचे, सरबत याबरोबरच फणस, जांभूळ प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जनभारतीतर्फे प्रक्रिया उद्योगाला चालना
कोल्हापूर येथील जनभारती न्यास या संस्थेच्या वतीने गगनबावडा तालुक्‍यात बचत गटांमार्फत पापड, लोणचे निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, ॲझोला प्रकल्प आदी उपक्रम सुरू आहेत. यापैकीच शेणवडे येथील गगनगिरी महिला बचत गटाच्या शारदाताई अध्यक्षा आहेत. त्यांनी म्हैसूर येथील सीएफटीआरआय आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून सरबत, लोणचे निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे. गेल्‍या वर्षीपासून त्यांनी करवंद लोणचे, सरबताबरोबरच फणसापासून पल्प आणि वेफर्स तयार करण्‍याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्‍यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

संपर्क ः शारदा जाधव ८२७५२३३२२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com