Drought In Maharashtra: कर्नाटक दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत; महाराष्ट्र थंडच!

Weather news: महाराष्ट्राच्या शेजारचं कर्नाटक राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता आहे. १ जून ते ३० ऑगस्टच्या दरम्यान कर्नाटकमध्ये २६ टक्के पावसाची तूट आहे. कर्नाटकमध्ये ३० ऑगस्टपर्यंत ४८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Karnatka news
Karnatka newsAgrowon

Monsoon : महाराष्ट्राच्या शेजारचं कर्नाटक राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता आहे. १ जून ते ३० ऑगस्टच्या दरम्यान कर्नाटकमध्ये २६ टक्के पावसाची तूट आहे. कर्नाटकमध्ये ३० ऑगस्टपर्यंत ४८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारनं १० दिवसात पीक नुकसानीची माहिती जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानीची माहिती जमा झाल्यावर पुढील आठवड्यात दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत कर्नाटकचे कृषिमंत्री एम चेलुवरायस्वामी यांनी गुरुवारी दिले आहे. महाराष्ट्रातही मॉन्सूनच्या पावसानं दडी दिली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु राज्य सरकार मात्र अजूनही दुष्काळाबाबत गंभीर असल्याचं दिसत नाही. 

राज्यात १ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान ११ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जलशयातील पाणीसाठयात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी राज्यातील अनेक भागात टँकरची तजवीज केली जात आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मराठवाड्यात तर केवळ ८५ दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. 

Karnatka news
Maharashtra Drought : दुष्काळी स्थितीमुळे नवी केळी लागवड खोळंबली

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोकण आणि विदर्भात पावसानं सरासरी गाठली आहे. परंतु त्यामध्ये कमी वेळात पडलेल्या जास्त पावसाचा मोठा वाटा आहे. ऑगस्ट सरला तरीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसानं सरासरी इतकी हजेरी लावलेली नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी पाऊसमान राहील असा अंदाज हवामान विभागानं जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. परंतु राज्य सरकार मात्र राजकीय सभा घेण्यात धुंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या राजकीय हमरातुमरीत दुष्काळाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार वारंवार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असल्याचं सांगत असतात. तर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकरी पुत्र असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असल्याचं बोलून दाखवतात. परंतु राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागली आहे. खरीपातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांसह ऊस आणि फळबागा पावसा अभावी सुकून गेल्याचं शेतकरी सांगत आहेत.

खरीप हातचा गेला आहे. पुढील काळातील मॉन्सूनचा पाऊस कसा राहील यावर रबी अवलंबून असेल परंतु हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता राज्यात दुष्काळाचे स्पष्ट संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार दुष्काळ जाहीर कधी करणार? असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच कर्नाटक सरकारला जे जमतं ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत. 

कर्नाटकमधील ३१ पैकी २९ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात ७० टक्क्यांची तूट आहे. त्यामुळे कर्नाटकमधील १२० हून अधिक तालूके कोरडे पडल्याची स्थिती आहे. पावसाच्या अभावी पीकांना पाण्याचा ताण पडत असल्याचं कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री चेलुवरायस्वामी यांनी सांगितलं. तर हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाची तूट ३० टक्के आहे, तर किनारपट्टीच्या भागात १७ टक्के आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात ११ टक्के पावसांची तूट आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती घेऊन कर्नाटक राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत आहे. 

Karnatka news
Maharashtra Rain Update : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

दरम्यान राज्यातही जून महिन्यात ५४ टक्के पावसाची तूट होती. जुलैमध्ये पावसानं सरासरी गाठली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात १५ दिवस उघडीप होती. त्यामुळे खरीप पिकं सुकू लागली आहेत. अशातच सरकारनं दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com