
Kolhapur News : राज्यात पाण्याची कमतरता असल्याने याचा फटका नव्या केळी लागवडीला बसला आहे. पावसाअभावी मागणी नसल्याने नव्या लागवडी रखडल्या आहेत. शेतकऱ्यांकडून मागणीच नसल्याने राज्यातील विविध टिश्यूकल्चर लॅब मधील सुमारे अडीच कोटी रोपे लागवडीविना पडून आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही राज्यातील केळी लागवडच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षापासून पावसात सातत्य नसल्याने राज्यातील शेतकरी केळी लागवडीला पसंती देत नसल्याचे चित्र आहे. खानदेश वगळता राज्यातील अन्य भागांत तर केळीचे प्लॉट शोधण्याची वेळ आली आहे.
सध्याही केळीचे उत्पादन गरजेइतके होत नसल्याने दरात तेजीचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा केळीची लागवड चांगली होईल अशी अपेक्षा होती. रोपे वेळेत उपलब्ध होण्यासाठी अनेक शेतकरी काही दिवस अगोदर रोपांची मागणी नोंदवतात. यंदा जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने रोपवाटिकांमधून आवश्यक इतकी मागणी आली नाही.
जुलैच्या उत्तरार्धात पाऊस झाल्याने ज्या भागात धरणसाठा मुबलक झाला आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी काहीशी मागणी नोंदवली. पण त्यानंतर पाऊस न झाल्याने केळी रोपांची मागणी पूर्णपणे थंडावली. नोंदणी केलेली रोपांची मागणीही रद्द केली. अगदी वर्षभर पाणी असणाऱ्या भागामध्येही दुष्काळाची छाया दिसत असल्याने पश्चिम महाराष्ट्रासारख्या पाणीदार पट्ट्यातील शेतकऱ्यांनीही केळी लागवडीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
विहिरी, कूपनलिका या स्थानिक स्त्रोतांमधूनही पाण्याची पातळी कमी झाल्याने केळीला पाणी पुरेसे होणार नाही. यामुळे लागवडीचा लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता गृहीत धरुन शेतकऱ्यांनी केळी लागवड लांबणीवर टाकली, परिणामी नव्या लागवडीच खोळंबल्या. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर भागही केळीचा नवा पट्टा म्हणून विकसित झाला आहे. यंदा त्या भागातही पाऊस व धरणांत पाणीसाठा समाधानकारक नसल्याने केळी लागवड अतिशय कमी प्रमाणात होत आहे.
सणासुदीमुळे मागणीत वाढच
सध्या श्रावणाच्या पार्श्वभूमीवर केळीचे दर टनास १८००० रुपयांपर्यंत आहेत. आवश्यक इतकी केळी उपलब्ध होत नसल्याने दरातही वाढ झाली आहे. सणासुदीमुळे मागणीत वाढच होण्याची शक्यता असल्याने केळीच्या किमती आणखी वाढू शकतात. सध्या पावसाअभावी नव्या लागवडी झाल्या नाही तर पुढील वर्षीही राज्यात केळीची चणचण कायम राहील, अशी शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.