
Rashtrasant Gadgebaba : देवाच्यावर ज्यांनी स्वच्छतेला स्वतः मानले; अनेक गावांच्या देवळांपुढे ज्यांनी स्वतः दिवसा स्वच्छता करून रात्री कीर्तने केली; सामाजिक सेवांचा वसा भारतीय समाजाला दिला, पण स्वतः तो पार पाडला; महाराष्ट्रात आणि भारतात स्वच्छतेचे अभियान ज्यांच्या नावाने सुरू आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाने ज्याची दखल स्वतः होऊन घेतली; त्या अभियानाचे नाव आहे ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान.’
ज्या गाडगेबाबांना जगाने ‘राष्ट्रसंत’ मानलेले आहे; ते असे एकमेव स्वच्छताकर्मी राष्ट्रसंत आहेत. ब्रह्म आणि भ्रम दूर करून चैतन्याचे चांदणे त्यांनी तळागाळातील माणसांच्या झोपडीपर्यंत नेले. आयुष्यभर स्वतःला आणि कुटुंबाला झोपडीत ठेवले. ‘कष्ट’ हेच भांडवल आणि ‘स्वच्छता’ हीच खरी सेवा त्यांनी समाजासाठी अधोरेखित केली, त्या डेबूजी झिंगराजी जानोरकर याच ‘गाडगेबाबांच्या’ कार्याचे नित्यस्मरण व आचरण हाच खरा सामाजिक उद्धाराचा मार्ग आहे.
वडील झिंगराजींच्या मरणावेळी डेबूंचे वय आठ वर्षांचे होते. तेव्हापासून डेबू मामाच्या गावात दापूऱ्यात आईबरोबर आले. त्या ठिकाणी पहाटेच उठून ते स्वच्छता करीत असत. गुरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, जनावरांना स्वच्छ धुणे, वेळेवर चारा-पाणी करणे, रानात-वनात जाणे आणि प्रत्येकाच्या कामात सहभागी होऊन आपला देह कष्टवायचा, अशी कामे सुरुवातीलाच केल्यामुळे पुढे त्यांनी अनेक समाजोपयोगी शाश्वत कामे पार पाडून ‘लोकसेवकाचा’ आदर्श समाजासमोर उभा केला.
रोकडा धर्म कर्मातून जगणारा गोपालकृष्ण हा डेबूजीचा आदर्श होता. ‘गोपाला-गोपाला, देवकीनंदन गोपाला!’ हा मंत्र जपत, म्हणजेच गाय पाळा - गाय पाळा, देवकीच्या कृष्णासारखे आपले जीवन ‘गोकुळ’ करा, असा संदेश त्यांनी भारतीयांना दिला. कर्ज काढून सणवार करू नका. कष्टाशिवाय जगू नका. ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नका. दारू पिऊन धुंद होऊ नका. मुलाबाळांना शाळेत घातल्याशिवाय राहू नका.
म्हाताऱ्या माणसांचा कंटाळा करू नका. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी द्या. जिभेवर ताबा ठेवा. मुक्या जिवांचा बळी घेऊन पोटाचे थडगे करू नका. गाडगेबाबांचे हे विचारधन मौलिक असून ते जपणे महत्त्वाचे आहे. कारण कर्जाने दिवाळी करून दिवाळं निघणार आहे. दारू न प्यायल्यामुळे आनंदी कुटुंब आणि शांत समाज क्रियाशील राहील. सामाजिक शांतता व सुरक्षा नांदेल. कष्टाशिवाय जगल्यावर चोऱ्या व भ्रष्टाचार वाढतो. कष्टाने कमवलेले कायम टिकेल. संपत्ती नीट सांभाळली, की घरदार पुढे जाते. शिक्षणाने समृद्धी येते.
मुक्या प्राण्यांची माया करावी. संस्कृती आणि अनुभवांचा खजिना म्हाताऱ्या माणसांजवळ असतो, त्यांना सांभाळले, की लोकजीवन नटते. गरजवंताला अन्न-पाणी देणे उचित आहे. आरोग्य जपण्यासाठी, भांडणे टाळण्यासाठी जिभेवर-वाणीवर बंधने (नियंत्रण) महत्त्वाचे आहे. हेच गाडगेबाबांच्या विचारधनाचे म्हणणे होते. सामाजिक उद्धारासाठी त्यांनी सांगितले होते,
की ‘उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - आसरा, अंध-पंगू रोग्यांना - औषधोपचार, बेकारांना - रोजगार, पशुपक्ष्यांना अभय, गरीब तरुण - तरुणींचे : लग्न, दुःखी व निराशांना हिंमत’, अशा नव्या विचारांनी सामाजिक अभ्युदयाचा त्यांनी सांगितलेला मार्ग सत्य आहे. सामाजिक अभिसरणासाठी या गोष्टी जपल्या पाहिजेत.
गाडगेबाबांनी स्वतःच्या मनाने स्वतःला नियम घालून दिले आणि नियम पाळलेही. वाईट गोष्टींशी त्यांनी तडजोड केली नाही. पळवाटा, आळस, कामचुकारपणा टाळला. ‘शरीराकडून गाढवासारखे कष्ट करून घेण्याचे,’ त्यांनी सांगितलेले आहे. कर्मानंद श्रेष्ठ करणारा हा अवलिया त्यामुळे सामाजिक सेवांचा मानदंड आणि सर्वांचा सन्मानदंडक ठरलेला आहे.
शास्त्रात गाडगेबाबा कृतिवंत होते. शास्त्रामध्ये वैराग्याचे मैथुनवैराग्य, स्त्रीबाळंतवैराग्य, स्मशानवैराग्य आणि निवृत्तीवैराग्य सांगितलेले आहे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी या सर्व वैराग्याचे एकत्रीकरण असलेले संसार वैराग्य स्वीकारले आणि ते परोपकारी झाले.
माणसांचे दैनंदिन जीवन, चालीरीती, धर्मपद्धती व रूढींचा अभ्यास करून ते समाजशास्त्रज्ञ, धर्मोपदेशक आणि विज्ञानोपासक झालेले होते. शेती करताना बनाजी तिडके सावकाराला धडा शिकवलेला होता. म्हणजेच साधक आणि वेळप्रसंगी लढवय्या हे गुण त्यांच्या अंगी मुरलेले होते.
डोक्यावर आणि दाढीचे वाढलेले केस, अंगावर कपड्यांच्या चिंध्याच चिंध्या, अंथरायला-पांघरायला फाटकीतुटकी गोधडी, तळपायाला बांधलेली झाडांची पाने, गळ्यात कधी फुलांच्या माळा तर कधी पानांच्या माळा, कानात काचेच्या बांगड्या, तर कधी झाडांच्या बिया आणि डोक्यावर फुटलेल्या गाडग्याच्या खापराचे खपुरे असा त्यांचा वेश असल्यामुळे लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले.
गाडगेबाबांच्या हातात खराटा असे. ते अखंडपणे स्वच्छतेचे काम करत. महात्मा गांधीजींनी सफाईचे काम केले, पण ते काम गाडगेबाबांनी त्यांच्या अगोदर सुरू केलेले होते. नंतर अनेक लोकांनी हातात झाडू घेण्याचे काम करून सफाईचे काम केले.
अनेकदा पायी प्रवास करताना त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेतीतील कामे केलेली होती. शेतीतल्या कष्टाची शेतकऱ्यांबरोबर सहानुभूती घेतलेले एकमेव राष्ट्रसंत संत सावता यांच्यासारखे शेतकरी कर्मबंधू होते. अंधश्रद्धेवर त्यांनी कीर्तनातून जागृती केली.
शाळा, आश्रमशाळा, धर्मशाळा, गोशाळा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अनाथ बालकाश्रम, लहान मुलांसाठी पाळणाघर, वृद्धाश्रम त्यांनी बांधले. नदीवर घाट, पाण्यासाठी तलाव निर्माण केले. कुष्ठसेवा आणि ग्रामसफाई केली. ही कामे करत असताना मिळालेल्या पैशांचा हिशेब त्यांनी वह्यांमध्ये नोंद करून ठेवायला लावला.
जनतेने या कामासाठी दिलेला पैसा विश्वस्त म्हणून त्यांनी सत्कारणी लावला. या सर्व कामांची बांधणी रचनात्मक, गुणात्मक आणि संख्यात्मकही होती. गाडगेबाबांची आई सखूबाई आणि पत्नी कुंताबाई यांनी त्यांना त्यांचे कार्य करू दिले. बाबांची नवसमाज निर्माणाची कामे त्यांच्याही त्यागातून उभे राहिलेले आहेत.
बाबांना अलोकाबाई व कलावती या दोन मुली आणि मुदगल व गोविंद हे दोन मुले होती. कुंताबाईने काबाडकष्ट करून या लेकरांचे संगोपन केले. कर्माला देव मानणाऱ्या बाबांची वृत्ती पाहून कुंताबाई जगल्या, काटेकोरपणा पाळला. गाडगेबाबांनी मानवता, समभाव, सत्य, अहिंसा आणि तर्ककठोरता स्वतः अंगीकारली. सत्य जीवनाचे ते भाष्यकार आहेत, अशा या कर्मयोगी गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त पुनश्च अभिवादन!
(लेखक रानमेवा शेती - साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.