Farmer Issue : शेतीतील ताणतणाव अटळ असतात?

यावर्षी तोटा होणार हे निश्चित आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार हे ही नक्की. त्याची मला चिंता नाही. नफा-तोट्याच्या पलिकडं जाऊन मी शेती करतो. गुत्तेकऱ्यांना मी आनंदाने दोन-चार हजार रूपये जादा दिले असते. पण एक वर्ष तरी आपण घरच्या घरी सोयाबीन काढू,असा किडा डोक्यात वळवळला.
(उजवीकडून अनिता,नरेश,गजानन, संगिता)
(उजवीकडून अनिता,नरेश,गजानन, संगिता)Agrowon
Published on
Updated on

आजची सकाळ काही फ्रेश नव्हती.किमान चार तास तरी गाढ झोप मला हवी असते.काल हडोळतीचे १३मजूर आल्याने,मी काम केलं नाही. नेहमीप्रमाणे लवकर झोपलो.पण सध्या आमच्या आणि परिसरातील कुत्र्यांनी वैताग आणलाय.बगिरा आणि डोडो दोघेही बाहेरच्या कुत्र्यांना गेटमध्ये येऊ देत नव्हते.पण दहा-बारा दिवसांपासून चित्र बदललयं.सगळे कुत्रे दोस्त बनलेत.बागेत सारखं चार-पाच कुत्रे दिसताहेत. बागेच्या निम्म्या भागात नुकतेच आळे केलेत.ते आळे मोडताहेत.शिवाय दुसऱ्या कुत्र्यांचा असा वावर मुड खराब करणारा आहे.

त्यांना हाकललं की,आमच्याच सोयाबीन मध्ये गोंधळ घालत पळताहेत. त्यामुळे सोयाबीन मधून दाणे गळताहेत.या कुत्र्यांचा नीट बंदोबस्त करण्याइतकं निवांतपणही नाही. यातील काही कुत्रे रात्री माझ्या झोपायच्या रूमजवळ गोंधळ घालताहेत. रात्री एक-दोन वेळा उठून त्यांना हाकलतोय.रात्रीही त्यांनी झोपमोड केलीच.सकाळी पाचचा अलार्म वाजला पण शरीर उठायला तयार नव्हतं.पावणेसहाला उठलो.काल कापलेलं एका वावरातील सोयाबीन आम्हा पाच जणांना गोळा करायचं होतं.हटवर जाऊन चहा पिऊन यावं म्हणून रूमबाहेर पडलो तर समोरच डोडो आणि दुसरे दोन कुत्रे पायाने माती उकरत होते...एकदम पारा चढला. हातात दगड घेईपर्यंत दोघे पळाले. डोडोही पळणं अपेक्षित होतं पण तो मला बघत थांबला. मी जवळ जाऊन त्याच्या गळ्याला धरलो तर,गूर्..गूर् करायला लागला.पारा अधिकच चढला.

तिरीमिरीत त्याला उचललं अन् पिंजऱ्यात ढकललं..दरवाजा लावताना अनवधानाने तो कोपराला जोरात लागला. कळ निघाली.डोडोला एक बुक्की घालून हटकडं आलो. हटवर बेसिनजवळचा नळ चालू केला तर,पाणी नाही... आधीच सरकलेलं डोकं अधिक भणाणलं...सविता बोलली,रात्री मोटार चालू केली तेव्हा मी कॉक चालू केला होता पण टाकीत पाणी भरलं गेलं नाही... मी गुरकावल्यागत बोललो,बघायला पाहिजे ना! हे माझं वाक्य सविताला दुखावू शकतं,हे लगेच माझ्या लक्षात आलं... पण शब्द बाहेर पडले होते.चहा पिण्याचा पण माझा मुड गेला.पाणी बॉटल घेऊन थेट वावरात गेलो. काम भरपूर होतं.

नरेश,गजानन ट्रँक्टर घेऊन आले होते.अनिता,संगिता सोबत मी सोयाबीन गोळा करून साड्यांवर टाकण्याच्या कामात लागलो.सविताही रानावर पडलेलं सोयाबीन वेचत होती.सकाळचा सगळा घटनाक्रम मी लगेच विसरून गेलो.सव्वा सहा वाजता सगळे वावरात आले होते.सकाळी कोणीच काही खालेल्लं नव्हतं.आठ वाजता ते चौघेजण तिथंच जेवायला बसले.मी हटकडं आलो. बेसीनजवळ मी रात्री काळा चहा केलेलं पातेलं होतं.त्यात मीच पाणी टाकलं होतं.ते पाणी बाहेर टाकलं.पातेलं धुताना थोडं पाणी खाली सांडल.मी ते पुसलं.शेगडीवर कॉफीसाठी अर्धा ग्लास पाणी ठेवून साखर टाकली.पेंडखजूर आणि चिवडा खात बसलो.

तेवढ्यात सविता किचनमध्ये आली.बेसिनकडं बघत तिनं प्रश्न केला,इथं एवढी घाण कोण केलीय? मी म्हटलं, मला माहित नाही.टापटीपपणा माझ्या स्वभावात नाही. किचनचा मी वापर केला की,तिची एखादी टिप्पणी ऐकून घ्यावी लागते.त्याची सवय झालीय. शिवाय स्वच्छता, टापटीपपणा हे चांगले गुण आहेत, असं मी मानतो.मी ते पातेलं धुण्यापुरताच त्याचा वापर केला होता.पण तिचा गैरसमज झाला की,मी मुद्दाम पसारा केलाय.खाणं संपवून मी कॉफी बनवली.घोट घोट पित बसलो.काही वेळातच ती बाहेर जाण्याचे कपडे घालून ,पर्स अडकवून तयार झाली. मला वाटलं बहुतेक ती गबरू आणि अन्वीला सोडणार असेल.रस्ता नीट नाही. गाडी घसरली तर नवीन ताप.मी म्हटलं,त्यांच्या शाळेची वेळ झालेली नाही. मी सोडतो त्यांना. ती बोलली,आज त्यांची शाळा नाही... तुमचा बोलण्याचा टोन नीट नव्हता...मी लातूरला निघालेय.

तिची ही प्रतिक्रिया योग्यच होती.माझी चुक मला मान्यच होती.कुठल्याही परिस्थितीत तिला आवाज चढवून बोलायचं नाही, हे आमचं ठरलयं.मला हे मान्यच आहे.मी ते पाळतो पण क्वचित अशी गडबड होते.मी म्हटलं, मी एकच तर वाक्य बोललो..तो टोन चुकीचा होता हे मान्य...पण मी बेसीनमध्ये मुद्दाम काही गडबड केलेली नाही....तू जायला स्वतंत्र आहेसच..जायचं तर जा...हे मी बोललो पण लगेच लक्षात आलं की, ती लगेच लातूरला गेली तर,बरेच प्रश्न तयार होतील.आम्ही सकाळी सहा वाजता कामावर गेल्यानंतर गबरू,अन्वीचा अभ्यास घेणं,त्यांना तयार करणं हे काम तिच करते.म्हणून तर अनिता,नरेश सलगपणे काम करू शकतात. सायंकाळीही ती मुलांकडं लक्ष देते..शिवाय न सांगता, काम करणाऱ्यांना ती चहा देते. माणसांसोबत ती असतेच.माझ्या खाण्याची अडचण होतीच पण ते मी कसंतरी भागवलं असतं.तिच्या गैरहजेरीत अनिता भाकरी देते! ....हे सगळं मला क्षणात आठवलं. मी रिव्हर्स गिअर टाकला... मी म्हटलं,सकाळी त्या टोनमध्ये बोलल्याबद्दल मी माफी मागतो...चूक मान्य.पण मी बेसीनमध्ये गडबड केलेली नाही... त्यामुळं तु तुझा निर्णय बदल.फार तर सोयाबीनची काढणी संपल्यानंतर तू जा...तिनं खांद्यावरची पर्स टेबलवर ठेवली...मी परत वावराकडं आलो.

(उजवीकडून अनिता,नरेश,गजानन, संगिता)
Maharudra mangnale : वेड्या बाभळीच्या शेंगांचा पायगुण!

एक एकरपेक्षा अधिक रानातील सोयाबीन गोळा करणं सुरू होतं.ऊन वाढेल तसं सोयाबीन फुटण्याचं प्रमाण वाढतयं.त्यामुळं काम वेगानं सुरू होतं.साडेनऊ च्या सुमारास त्या चौघांसाठी सविता चहा घेऊन आली. ती रानावर पडलेलं सोयाबीन वेचत होती.उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे लगेच थकवा जाणवत होता.चार ओळी झाल्या की ,पाणी पिणं सुरू होतं.साडेदहा वाजता मी सविताला पुन्हा चहा आणायला सांगीतला.ती गेल्यानंतर मी अनिताला म्हटलं, माझ्या चुकीच्या बोलण्यामुळं रागावून तुझी ताई लातुरला निघाली होती.ती गेली असती तर,एकदाही चहा मिळाला नसता...ती तसं म्हणू शकली...पण मला नाही असं म्हणता येतं...माझ्याशी कोणी रागाने बोललं तरी,मला ते शांतपणे ऐकून घ्यावं लागतं...शेतकऱ्याला असं करता येत नाही. त्याला भरपूर सहनशीलता बाळगावी लागते.

सविता चहा,बिस्कीट व माझ्यासाठी सीताफळ घेऊन आली.दहा मिनीटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू झालं. उन्ह वाढलं की,काड जास्तच टोचतं...त्याला पर्याय नसतो.अखेर साडेअकरा वाजता हे अशक्य वाटणारं काम संपलं.तब्बल पाच तास नरेश उन्हात बनमीवर उभा होता.गजाननने सगळं ओझं वाहिलं आणि आम्ही तिघांनी गाठोडे भरून,बांधून दिले.सगळ्यांनी ज्या जिद्दीने, वेगाने काम केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

काल हडोळतीहून तेराजण आले होते.जवळपास तीन एकरची कापणी व दिड एकर गोळा करण्याचं काम झालं. काल हे मजूर दुसऱ्यांदा आले म्हणून दुपारी चिकन पार्टी दिली. ते आले नसते तर आमचे आणखी बेहाल झाले असते.उद्या त्यांच्यातील पाच- सहाजण आले तरी पुढच्या दोन दिवसांत हे काम संपेल.जवळपास चार एकर सोयाबीन काढणं बाकी आहे.हे काम म्हणजे मी खाजवून आणलेलं आवदान आहे.त्यामुळं कितीही त्रास झाला तरी,मी या कामातून पळ काढणार नाही. सोयाबीनची रास झाली की,जूनपर्यंत शेती हा विषय अजेंड्यावर असणार नाही.

यावर्षी तोटा होणार हे निश्चित आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार हे ही नक्की. त्याची मला चिंता नाही. नफा-तोट्याच्या पलिकडं जाऊन मी शेती करतो. गुत्तेकऱ्यांना मी आनंदाने दोन-चार हजार रूपये जादा दिले असते. पण एक वर्ष तरी आपण घरच्या घरी सोयाबीन काढू,असा किडा डोक्यात वळवळला. नरेश,गजाननने पाठिंबा दिला. पुष्पामावशी चार बाया आणतो म्हणाल्या... वाटलं...आरामात एक नवा अनुभव मिळेल.पण पुष्पामावशी आजारी पडल्याने चार मजूर मिळाले नाहीत. आमच्या सोयाबीनची परिस्थिती बघता टप्याटप्याने एक एक वावर काढणीला येईल ,असा आमचा अंदाज होता. तीव्र उन्हामुळे तो चुकला.सगळंच सोयाबीन एकदम काढणीला आलं.ज्या केडीएस जातीच्या सोयाबीन शेंगा वाळल्या तरी फुटत नाहीत, असं सांगीतलं गेलं होतं,ते चुकीचं ठरलं.त्या शेंगाही फुटू लागल्या. सगळे अंदाज चुकल्याने, नियोजन चुकून अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला.त्यामुळं माझ्यासारख्या विचारी माणसाचीही बोलताना चूक होते. याचं कारण शेती हेच आहे.मी पुन्हा पुन्हा शेती नको फक्त निसर्गात राहण्यासाठी बाग करायची म्हणतो ते यासाठीच...कितीही विचारपूर्वक, संयमाने वागलं तरी शेतीत ताण-तणावाचे प्रसंग अटळ असतात.

मला खरचं शेती नको आहे पण तिच्यापासून सुटका करून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी,त्यातून बाहेर पडता येत नाही. मला शेती नको, निसर्ग हवाय.काळ्या मातीवरही माझं मनापासून प्रेम आहे.शारीरिक कष्टही आवडतात... असं हे विचित्र त्रांगडं आहे...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com