
विकास पालवे
पुस्तकाचे नाव : खोल खोल दुष्काळ डोळे
लेखक : प्रदीप कोकरे
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह
हार्डबाउंड किंमत ३००/-, पाने : १७६
या कादंबरीत मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाचं जगणं अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने चित्रित केलेलं आहे. मुंबईतल्या अस्तंगत होत असणाऱ्या चाळींपैकी एका चाळीत हा तरुण एका मित्रासोबत भाड्याने राहत असतो. घरचे सगळे गावी असतात. मुंबईत काम करून गावच्या घराला हातभार लावणाऱ्या लाखो माणसांपैकी एक असलेला हा तरुण या वर्गाचा प्रातिनिधिक आवाज आहे असं आपण म्हणू शकतो.
भाड्याने घर करून राहणं, खाणावळीत वा स्वस्त हॉटेलांत जेवणं, मित्रांसोबत खर्च वाटून घेत दिवस ढकलणं, सतत नोकऱ्या बदलत राहणं आणि या सगळ्या अस्थिर, बेभरवशी परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी संघर्ष करत राहणं हे सगळं या कादंबरीत नायकाच्या बाबतीत घडतं. आणि या गोष्टींशी अनेक जण स्वतःला जोडून घेऊ शकतील.
नायकाची भाषा या शहरातील निम्न मध्यमवर्गीयांची, विशेषतः चाळीत, झोपड्यांत राहणाऱ्यांची खुल्लमखुल्ला आणि बेधडक भाषा आहे. त्यामुळे या नायकाच्या मनात चालणाऱ्या चिंतनात शिवीगाळ, प्रक्षोभक भाषेतली चीड येत राहते. रोखठोक भाषेमुळे नायकाचं जगणं आणि त्याचा परिसर अतिशय अस्सलपणे डोळ्यांपुढे उभे राहतात. नायकाच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना मनाला भिडतात, यामागे घटनांच्या चित्रीकरणाची प्रत्ययकारी पद्धत जशी कारणीभूत आहे तसा भाषेचा खरेपणा हेही एक कारण आहे.
मुंबईतल्या काही भागांचं केलेलं चित्रण (दादर-माटुंगा, मशिद वगैरे) हे प्रसंगांच्या पार्श्वभागी असणाऱ्या नेपथ्यापुरतं मर्यादित नाहीय. तर तिथली माणसं, त्यांचं बोलणं -चालणं, त्या त्या भागांतले संमिश्र आवाज, रस्त्यावरले फेरीवाले, भिकारी, कष्टकरी, नोकरदार वर्ग यांच्या सामूहिक वर्दळीमुळे निर्माण होणारं कोलाज असं बरंच काही कादंबरीकार यशस्वीपणे चित्रित करतो.
उदाहरणादाखल कादंबरीचा नायक मशिदला उतरून बाहेर पडतो तेव्हाचं वर्णन वाचावं. त्याची मुंबईबाबतची निरीक्षणं ही कुठल्याही मोठ्या शहराला लागू होतील अशी आहेत. मोठ्या शहरांतील गर्दी, गलबला, लाखो माणसांचं रोज आपल्यासमोरून जाणं आणि त्यातला एकही ओळखीचा नसणं, पैशाला महत्त्व असल्यामुळे जवळच्या माणसांच्या वागण्यातील कोरडेपणा अनुभवाला येऊन मग परकेपणाची जाणीव होणं ही सगळी वैशिष्ट्यं नायकाच्या चिंतनतुकड्यांतून, संवादांतून समोर येतात.
कादंबरीकार या शहरात राहणाऱ्या माणसांचं - त्यातही कष्टकरी, तळातल्या लोकांचं - चित्र उभं करून या शहराचे आतले मुख्य अवयवही एक्सरे मशिनमधून निघणाऱ्या कॉपीसारखे समोर ठेवतो. उदाहरणार्थ, ‘’... हे दोघे दिवसभर हातगाडीवर कलिंगड विकतात. कलिंगड संपलं की कांदे बटाटे घेऊन फिरतात.
संध्याकाळी थोडं खाऊन दोघे एकमेकांना कवटाळून हातगाडीवरच झोपतात. सकाळी नळावर आमच्यासोबत पाणी भरणारा रामाशंकर फाइव्ह गार्डनला दिवसांतून तीनदा कमरेला काप गुंडाळून चाय विकतो’’ (पृ. ७३). तो असंच वर्णन घरकाम करणाऱ्या महिलांचंही करतो. स्वतंत्र कादंबरीचा विषय असणाऱ्या या महिलांच्या जगण्यातील छोटा तुकडा तरी या कादंबरीत येऊन जातो हे विशेष.
नायकाचं सतत संगीत ऐकणं आणि त्या संगीताचा त्याच्यावर होणार परिणाम वा त्या विशिष्ट संगीताविषयी त्याचं चिंतन हेही या कादंबरीतील एक वेगळेपण नमूद करण्यासारखं आहे. काही वेळा मात्र नायकाच्या चिंतनाची लांबड लागल्यासारखं जाणवतं. घटना चित्रित करण्याची जबरदस्त हातोटी कादंबरीकाराकडे असतानाही त्याने निवेदनात्मक चिंतनाचा भडिमार का करत राहावा? कादंबरीकार किती अस्सलपणे प्रसंग चित्रित करू शकतो हे पाहण्यासाठी अखेरच्या भागात येणारं बिस्कीट जुगार खेळवणारी गँग आणि तो खेळणाऱ्या पोरांमध्ये जो राडा होतो त्याचं चित्रण वाचावं.
एखाद्या वेगवान दृश्यचित्रण असलेल्या सिनेमातल्या प्रसंगासारखा तो चित्रित केला आहे. या सगळ्या राडेबाजीत, वावटळीत जगतानाही नायकाला वाटत राहतं, की माणसानं करुणेनं ओतप्रोत भरलेलं असावं. करुणेशिवाय माणूस काहीच नसतो. करुणा नसली की माणूस माणसात नसतो (पृ. ५५). सुधासोबतच्या त्याच्या संबंधातूनही त्याचा प्रामाणिकपणाच अग्रभागी येतो. त्याचा हा प्रामाणिकपणा, इतरांविषयीची आस्था, कळवळा त्याला ‘’पुढच्या अकरा महिन्यांची राख डोळ्यांत खुपत असतानाही’’ आपले पाय घट्ट रोवून उभं राहायला मदत करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.