Pune News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला म्हैसाळ योजनेचा मोठा आधार आहे. मात्र सध्या या योजनेवरून जत पुर्व भागातील 65 गावांचा आक्रमक पवित्रा दिसत आहे. येथील ग्रामस्थांनी सरकारला थेट इशारा देताना अनोख्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या ग्रामस्थांनी 'म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा पाण्यासाठी रक्त घ्या' असे म्हटलं आहे. तसेच याबाबत अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती तुकारामबाबा महाराज यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सांगलीच्या कुशीला कृष्णा नदी असूनही जत तालुका दुष्काळी राहीला आहे. येथे आजही पाणी आणि चाऱ्यावर लाखो रूपये खर्च केले जातात. यातूनच म्हैसाळच्या पाण्यावरून संघर्ष सुरु झाला आहे. हा संघर्ष १९८८ पासून सुरू झाला असून तो २०२४ मध्येही सुरू आहे. यामुळेच जत पुर्व भागातील 65 गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
दरम्यान श्री. संत बागडेबाबा मानव मित्र संघटना समितीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. समितीकडून २०१९ ला संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढण्यात आली होती. त्यावेळी शासनाने जतला दयाला पाणीच नाही अशी नकार घंटा दिली होती. त्यानंतर हा लढा अधिक तीव्र करण्यात आला आहे.
जत मधील १७ गावे पाण्यापासुन वंचित
यावेळी तुकारामबाबा महाराज यांनी आमचा लढा सुरू असतानाच २०१९ मध्ये जतच्या शेजारील मंगळवेढा तालुक्यात योजनेचे पाणी गेले. मात्र आम्हाला आजही पाण्यासाठी लढा द्यावा लागत असल्याचे म्हटले आहे. तसेच जत पूर्व भागातील अशा १७ गावांमध्ये पाण्यापासुन वंचित आहेत.
यामुळेच जत पुर्व भागातील 65 गावांनी 'म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा रक्त घ्या' असे अभियान राबवण्याचा निर्धार केल्याचे तुकारामबाबा महाराज यांनी सांगितले.