Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Climate Change Impact: आजच्या हवामान बदलाच्या आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या काळात गवतांचे प्रदेश किंवा गवताळ माळराने टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे ही गरज बनली आहे. कारण त्यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता इतर वनस्पतींच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय ती त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक जीवांना आधार देणारी ठरतात.
Tree Plantation
Tree PlantationAgrowon
Published on
Updated on

Environmental Conservation: सरधोपट पद्धतीने कितीतरी कोटी झाडे लावण्याची घोषणा केली जाते. ती पूर्ण करण्यासाठी घाईने आणि बहुतांश ठिकाणी उद्दिष्टे देऊन कृती केली जाते. यामुळे ना नव्याने वने बहरण्याची शक्यता असते, ना प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली माळराने किंवा सडे-पठारे यांची समृद्ध परिसंस्था टिकून राहण्याची शक्यता उरते. किंबहुना, आजच्या हवामान बदलाच्या आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या काळात गवतांचे प्रदेश किंवा गवताळ माळराने टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे ही गरज बनली आहे. कारण त्यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता इतर वनस्पतींच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय ती त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक जीवांना आधार देणारी ठरतात.

पर्यावरण दिनानिमित्त राज्य सरकारकडून अनेकप्रमुख घोषणा होतात. त्यापैकी हमखास केलीजाणारी एक घोषणा म्हणजे- कोटीच्या कोटी वृक्षांची लागवड. या वर्षीसुद्धा तशी घोषणा करण्यात आली. खरे तर वृक्ष लागवड करण्याबद्दल आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही, पण ही लागवड कुठे केली जाते हा तपशील समजल्यावर मात्र त्याच्याबद्दल बोलणे गरजेचे वाटते. त्याचे कारण म्हणजे वृक्ष लागवड करण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या जागा. ज्या ठिकाणी झाडांची घनता कमी आहे, अशी ठिकाणे त्यासाठी निवडली जातात. त्यात मुख्यत: पठारे, माळराने यांचा समावेश होतो. ज्या ठिकाणच्या झाडांची तोड झाली असेल, तिथे झाडे लावली किंवा आधी घनदाट असलेली वने आता विरळ झाली असतील तर तिथे झाडे लावणे समजण्यासारखे आहे, पण गवताळ माळराने आणि पठारांवर आधीपासूनच झाडोरा कमी असतो. तिथे असे करणे योग्य ठरत नाही.

Tree Plantation
Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

गवताळ माळरानांची स्वत:ची म्हणून काही वैशिष्ठ्ये असतात. विस्तीर्ण पसरलेली राने आणि मध्येच लवणामध्ये म्हणजे सखल भागात काही झाडे अशी त्यांची रचना. ही झाडे मुख्यत: ओल कायम असलेल्या ठिकाणी किंवा एखाद्या नैसर्गिक ओढ्या-नाल्याजवळ आढळते. ही रचना निसर्गत: निर्माण झालेली असते. तिची स्वत:ची म्हणून एक परिसंस्था विकसित झालेली असते. त्यात गवते प्रमुख असतात. त्याच्या जोडीनेच विविध प्रकारच्या वनस्पती, कीटक, विशिष्ट पक्षी, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी तिथे नांदत असतात. पावसाळा, हिवाळा आणि त्यानंतर उन्हाळा या हंगामांमध्ये त्यांचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. या गवताळ रानांचे किंवा पठारांचे आजूबाजूच्या इतर परिसंस्थांशी घट्ट नाते असते. जीवांच्या विविधतेबद्दल किंवा वन्यजीवांच्या वैविध्याबद्दल बोलायचे तर अतिशय समृद्ध अशी ही परिसंस्था; या निकषांवर अगदी घनदाट वनांपेक्षाही समृद्ध म्हणता येईल अशी!

अशा ठिकाणी झाडे लावली तर ती उगवून येण्याची, उगवली तरी दीर्घकाळ टिकण्याची आणि टिकली तरी व्यवस्थित वाढण्याची शक्यता कमीच असते. कारण त्यांच्यासाठी तो प्रदेश, ते हवामान आणि तिथली परिस्थिती मुळी पूरक नसतेच. गवताळ माळरानांप्रमाणेच पावसाळ्या व्यतिरिक्त ओसाड दिसणाऱ्या सड्यांबद्दल, पठारांबद्दलही हेच पाहायला मिळते. ही सडे-पठारे एरवी बिनकामाची वाटतात, पण पावसाळ्यात त्यांचे रूप पाहिले तर दोन महिन्यांपूर्वी पाहिलेली हीच का सडे-पठारे, असा प्रश्‍न पडावा. केवळ काही आठवड्यांचे किंवा एखाद्या महिन्याचे आयुष्य लाभलेले असंख्य जीव तिथे पावसाळ्यात एखाद्या उत्सवासारखे बहरतात. पावसाळ्यानंतर ते निद्रिस्त, निष्क्रिय अवस्थेत राहतात, पण पुन्हा पुढच्या पावसाळ्यात आपला कार्यभाग पूर्ण करण्यासाठी जिवंत आणि सक्रिय होतात.

गवताळ माळराने काय किंवा सडे-पठारे काय, या दोन्ही परिसंस्था कोणत्याही इतर परिसंस्थांइतक्याच महत्त्वाच्या... घोषणा करून लावल्या जाणाऱ्या बऱ्याचशा झाडांच्या वाटेला अशाच जागा येतात. कारण कोटींच्या संख्येने झाडे लावायची तर अशी विस्तीर्ण माळराने, पठारे सोयीची ठरतात. शिवाय त्यावर केलेली लागवड जगाला दाखवणे आणि त्याची प्रसिद्धी करणेही सोपे जाते. मग स्वाभाविकपणे अशाच जागा निवडल्या जातात. आणि सरकारने, मंत्र्यांनी जाहीर केलेली उद्दिष्टे पूर्ण करायची असल्याने प्रशासन किंवा त्यातील तज्ज्ञही त्याबाबत बोलण्याच्या फंदात पडत नाहीत.

Tree Plantation
Environmental Problems : कृत्रिम फुले पर्यावरण, शेतकऱ्यांसाठी हानिकारक

अशा ठिकाणी झाडे लावली जातात किंवा तसा प्रयत्न केला जातो, तेव्हा तिथली समृद्ध नैसर्गिक व्यवस्था नष्ट होते. निसर्गातील अनेक महत्त्वाचे जीव किंवा आता दुर्मीळ होत चाललेले जीव (कीटक, उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तन प्राणी) हे या परिसंस्थांचा भाग आहेत. ते इतरत्र आढळत नाहीत आणि ते या परिसंस्थेतून नष्ट झाले तर जगातून कायमचे नष्ट होण्याचा धोका असतो. काही दशकांपूर्वी माळरानांचे वैभव असलेला बहुचर्चित माळढोक पक्षी आता जवळ जवळ नष्टच झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण तणमोर या पक्षाची अवस्थाही फारशी वेगळी नाही. माळरानांचे अस्तित्व नष्ट होण्याबरोबरच आपल्याकडील लांडग्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती सुद्धा काळाच्या पडद्याआड जाण्याच्या वाटेवर आहे. त्याची जागा बिबटे किंवा इतर प्राणी घेत आहेत. जमिनीच्या वापरात होणारा बदल आणि माळरानांच्या जागी वनांची किंवा उसासारख्या शेतीची होणारी वाढ अशा गोष्टी या बदलांच्या मागे आहेत.

हे सारे डोळ्यांदेखत घडत असतानाही केवळ प्रसिद्धी किंवा काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या निमिषाने या गोष्टी होतात, हे खचितच योग्य नाही आणि निसर्गाच्या दृष्टीने परवडणारेही नाही. पण मग झाडे लावायला नकोत का?... तर झाडे लावायलाच हवीत, पण नेमकी कुठे? हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी ती कुठून काढली गेली? याचा वेध घ्यावा लागेल. तो घेतल्यावर ती कुठे लावायला हवीत, याचे उत्तर आपोआपच मिळते. ग्रामीण भागाबद्दल बोलायचे तर गावोगावच्या पांदी (पाणंद), शेताचे बांध, अनेक पाणथळीच्या जागा, ओढ्यांचे-नद्यांचे काठ, शेतावर असलेल्या विहिरींच्या अवतीभोवती अशा अनेक ठिकाणी असलेल्या असंख्य झाडांचे समूळ उच्चाटन झाले आहे. रस्ते, महामार्गांबद्दल तर वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्वीचे रस्ते रुंद करण्याच्या नादात किती लाख झाडे नष्ट झाली आहेत आणि अजूनही होत आहेत, याची गणतीच करता येणार नाही. हे वृक्ष आजकालचे नव्हेत, तर किमान पन्नास-शंभर वर्षे जुने आहेत. ही झाडे गेलीच, पण नव्याने केलेल्या, वाढवलेल्या कोणत्या रस्त्यांवर अशी झाडे लावली आहेत आणि चांगल्या प्रकारे वाढवली आहेत हे सांगता येईल का?

शहरांची गोष्टही यापेक्षा वेगळी नाही. त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेत आणि बांधकामांच्या गर्दीत जागोजागी अनेक नैसर्गिक व्यवस्था गाडल्या गेल्या आहेतच, त्यांच्यावरील झाडेसुद्धा काढण्यात आली आहेत. हे अजूनही सुरूच आहे... या सर्वांची भरपाई कदाचित इतरत्र करण्यासाठी अशी कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीची उद्दिष्टे घ्यावी लागतात. पण ही झाडे जिथून गेली आहेत, तिथे लावली तर त्यांचा जास्त उपयोग संभवतो. त्याऐवजी जिथे झाडांऐवजी मोकळ्या माळरानांची, त्यावरील गवतांची जास्त गरज आहे, अशा ठिकाणी ती लावण्यात काय हशील? पण याबाबत शांतपणे विचार करण्याची किंवा हा विचार समजून घेण्याची उसंत नसल्यामुळे की काय, या गोष्टींची दखलच घेतली जात नाही. मग सरधोपट पद्धतीने कितीतरी कोटी झाडे लावण्याची घोषणा केली जाते. ती पूर्ण करण्यासाठी घाईने आणि बहुतांश ठिकाणी उद्दिष्टे देऊन कृती केली जाते. यामुळे ना नव्याने वने बहरण्याची शक्यता असते, ना प्रत्यक्षात अस्तित्त्वात असलेली माळराने किंवा सडे-पठारे यांची समृद्ध परिसंस्था टिकून राहण्याची शक्यता उरते.

किंबहुना, आजच्या हवामान बदलाच्या आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या काळात गवतांचे प्रदेश किंवा गवताळ माळराने टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे ही गरज बनली आहे. कारण त्यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता इतर वनस्पतींच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय ती त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक जिवांना आधार देणारी ठरतात.

ऐतिहासिक काळातील वनांबद्दल पूर्वी असणारे समज आता बदलत आहेत. आताची माळराने ही कोणे एके काळी घनदाट वने होती आणि त्यांच्यावरील वृक्षांची तोड झाल्यामुळे त्यांचे रूपांतर माळरानांमध्ये झाले आहे, हा समज आता पुराव्यांच्या निकषांवर उतरत नाही. त्याउलट ही माळराने खूप प्राचीन काळापासून तशीच आहेत, तेच त्यांचे मूळ स्वरूप आहे याचे पुरावे समोर आले आहेत, अजूनही येत आहेत. या सर्व गोष्टींचा धांडोळा घेताना आपली वृक्ष लागवडीची उद्दिष्टे मूळ व्यवस्थांच्या मुळावर तर उठणार नाहीत ना, याचा विचार होण्याची गरज आहे. अन्यथा, कोटीच्या कोटी झाडांची लागवड हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरण्याचीच जास्त शक्यता आहे.

abhighorpade@gmail.com

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com