Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Narendra Modi : कांद्याच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावे म्हणून घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला जय श्रीराम आणि भारत माता की जय असे म्हणून गप्प करण्याचा प्रकार झाला. तो एका अर्थाने मोठा सांकेतिक, प्रतिकात्मक (सिम्बॉलिक) आहे.
Onion
OnionAgrowon

Onion Rate Issue : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवूनही भावपातळी अजूनही दबावातच आहे. सरकारने एका हाताने निर्यातबंदी उठवली आणि दुसऱ्या हाताने किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची पाचर मारून ठेवली.

त्यामुळे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था झाली. मागील पाच वर्षांत केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणांमुळे कांद्याची बाजारपेठ विस्कळित झाली आहे. यंदाचे वर्ष तर निवडणुकीचे असल्यामुळे सरकारने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. १५) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. हा परिसर म्हणजे कांद्याचे आगार. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन या पट्ट्यात होते. महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी सभा घेतली.

कांद्याचा प्रश्न ज्वलंत असताना त्या मुद्यावर पंतप्रधान काय बोलतील याची उपस्थित शेतकऱ्यांना उत्सुकता होती. परंतु भाषण सुरू झाल्यावर पंतप्रधानांची गाडी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाच्या मुद्यावरून पुढेच सरकायला तयार नाही, हे बघून शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ लागला.

अशातच सभेत एक तरुण उठला आणि कांदा प्रश्नावर बोला यासाठी घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी त्या तरुणाला प्रत्युत्तर म्हणून मोदी मोदी असा जयघोष सुरू केला. पोलिस त्या तरुणाला सभास्थळावरून बाजूला घेऊन गेले.

सभेतील या प्रकारामुळे मोदींच्या भाषणाची गाडी काही सेकंद थबकली. त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट वाचता येत होती. मोदी काही क्षण थांबले आणि त्या तरुणाची दखल न घेता त्यांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊन उपस्थितांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर त्यांच्या भाषणाची गाडी पुढे मार्गी लागली.

वास्तविक केंद्र सरकारने सहा महिने कांदा निर्यातबंदी करून आपल्या ताटात माती कालवल्याचा राग शेतकऱ्यांच्या मनात धुमसत होता. त्याची तीव्र प्रतिक्रिया मतदानात उमटेल, असे चित्र निर्माण झाले आहे. दिंडोरी मतदारसंघात तर कांद्याचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता असून तेथील उमेदवार भारती पवार त्यामुळे घायकुतीला आल्या आहेत.

दिंडोरीसह अनेक मतदारसंघात कांदा निर्यातबंदीचं प्रकरण अंगलट येईल याचा अंदाज आल्याने केंद्र सरकारने अखेर निर्यातबंदी उठण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घेतानाच ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्काची खुट्टी मारल्याने कांद्याचे दर जास्त वाढणार नाहीत, याची तजवीज करून ठेवली. त्यामुळे शेतकरी आणखीनच संतप्त झाले.

हे असे वातावरण असताना मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी (Modi) नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली. मोदींनी या सभेत कांदा प्रश्नावर बोलावे यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी मोहीम उघडली होती. पण सरकारने पोलिस बळाच्या जोरावर कांदा उत्पादक आणि शेतकरी नेत्यांची मुस्कटदाबी केली. अनेकांना ताब्यात घेतले, नजरकैदेत ठेवले.

Onion
Onion Market : पारनेला कांद्याची आवक वाढली

परंतु याच सभेत किशोर सानप या तरुणाने गनिमी काव्याने घोषणाबाजी करत थेट पंतप्रधानांना कांदा प्रश्नावर बोलण्याचे आवाहन केले. एक प्रकारे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रातिनिधिक भूमिका या घोषणाबाजीच्या माध्यमातून ठळकपणे पुढे आली.

वास्तविक यावर मोदींनी तत्काळ प्रतिसाद देत कांद्याच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली असती तर ते अधिक शोभून दिसले असते. पण त्याऐवजी मोदींनी श्रीराम आणि भारतमातेचा जयघोष

करत शेतकऱ्यांची मागणी एक प्रकारे उडवूनच लावली. खरं तर कांद्याचा आणि श्रीराम, भारतमातेचा संबंध काय? पण या घोषणांच्या आडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देणे मोदींना सोपे गेले.

या घटनेनंतर कांद्याच्या मुद्यावरून राजकारण पुन्हा तापू लागल्यावर भारती पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. घोषणा देणारा किशोर सानप हा तरुण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत विरोधकांनी स्टंट करून मुद्दाम वातावरण पेटवल्याचा आरोप भारती पवार यांनी केला.

त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या भागातले शेतकरी जागरूक आहेत. ते आपल्या प्रश्नावर पंतप्रधानांनी बोलावे अशी मागणी करत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? यापूर्वी तर सभेत कांदे फेकल्याचे प्रकारही घडले आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली.

नाशिक जिल्ह्यात २००६ साली कांदा प्रश्नावरून भडका उडाला होता. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) केंद्रीय कृषिमंत्री होते. कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी अस्वस्थ होते. याच दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या देवळा येथे डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला पवारही उपस्थित होते. पवारांच्या भाषणानंतर सभा संपणार होती. पवारांचे भाषण सुरू झाले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला म्हणत घोषणाबाजी केली.

एढेच नाही तर पवारांच्या दिशेने चार- दोन कांदेही भिरकावले. माध्यमात त्याची मोठी चर्चा झाली. पण शरद पवार यांनी त्यावेळी कांदा प्रश्नावर संसदेत ठाम भूमिका घेतली होती. त्यावेळी विरोधी बाकांवर असलेल्या भाजपच्या दबावतंत्राला बळी न पडता त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती. ग्राहकांना परवडत नसेल कांदा खाऊ नका, असेही सुनावले होते. कांदा निर्यातबंदी करणार नाही, असे त्यांनी संसदेत ठामपणे सांगितले होते.

Onion
Onion Market : शेती प्रश्नांवरही धार्मिक ध्रुवीकरणाचा मोदींचा डाव !

सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकरी कांद्याच्या प्रश्नावर जाब विचारतातच. त्यामुळे आता कांद्याच्या प्रश्नावर मोदींनी बोलावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली तर तो काही देशद्रोह ठरत नाही. खरे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू शकतो, याची जाणीव होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही उघड भूमिका घेतली.

त्यांनी सभेत मोदींशी या प्रश्नावर चर्चा केली आणि पत्रही दिले. कांदा निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी त्यांनी मोदींच्या कानावर घातली. कांदा प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

पण मोदींनी भाषणात सुरवातीचा बराच वेळ हा मुद्दाच घेतला नाही. तसेच शेतकऱ्याच्या घोषणाबाजीनंतरही अल्प विरामानंतर त्यांनी आपले भाषण तसेच सुरू ठेवले. आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्या सरकारने १० वर्षांच्या काळात अनेक निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कसे सुखी केले याचा धावता उल्लेख केला.

पण कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतरही शेतकऱ्यांची झालेली कोंडी आणि ती फोडण्यासाठी ठोस उपाययोजना यावर मात्र त्यांनी चकार शब्द काढला नाही. सत्ताधारी पक्षासाठी कांद्याचा प्रश्नच आज अस्तित्वात नाही, असाच संदेश त्यांनी दिला.

बाकी कांद्याच्या प्रश्नावर बोला म्हणून घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला जय श्रीराम आणि भारत माता की जय असे म्हणून गप्प करण्याचा हा प्रकार तसा सांकेतिक, प्रतिकात्मक (सिम्बॉलिक) मानावा लागेल. शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाला बेदखल करत धार्मिक ध्रुवीकरणाची मात्रा त्यांना चाटवायची हा जुनाच हातखंडा प्रयोग याही वेळेस नव्या जोमाने आम्ही करणार, हा संदेश त्यातून देण्यात आला. परंतु बदललेले जनमानस पाहता ध्रुवीकरणाची ही मात्रा कितपत उपयोगी पडेल याबद्दल खुद्द सत्ताधाऱ्यांनाच खात्री वाटेनाशी झाली आहे.

कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार का, हे थोड्याच दिवसांत कळेल. घोडा मैदान जवळ आहे. परंतु या निमित्ताने काही मतदारसंघांत तरी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले, हे ही नसे थोडके.

(रमेश जाधव ॲग्रोवन डिजिटलचे कन्टेन्ट चीफ, तर धनंजय सानप मल्टिमीडिया प्रोड्युसर आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com