Food Processing Business : फणसाचा पल्प, मोदक अन् भाजीही पाटणे यांचा कोकणातील प्रयोग उद्योग

Jackfruit Processing : पतीची साथ व स्वतःच्या पायावर उभे राहून कोळंबे (जि. रत्नागिरी) येथील अनुश्री पाटणे यांनी प्रक्रिया उद्योजक म्हणून स्वतःला घडवले आहे.
Food Processing Business
Food Processing Business

राजेश कळंबटे

Fanas Processing : पतीची साथ व स्वतःच्या पायावर उभे राहून कोळंबे (जि. रत्नागिरी) येथील अनुश्री पाटणे यांनी प्रक्रिया उद्योजक म्हणून स्वतःला घडवले आहे. रुचीसंगम ब्रॅण्डने आंबा पल्प, करवंद जॅम यांच्यासह फणस पल्प, मोदक, भाजी अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. त्यांच्या या उद्योगाचा परिसरातील बागायतदारांनाही फायदा झाला आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोकणमेवा असलेल्या आंबा, काजू, फणस आदींवर प्रक्रिया करून उद्योगनिर्मितीचे प्रयत्न स्थानिकांकडून होत आहेत. कोळंबे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) येथील अनुश्री पाटणे हे नाव त्यापैकीच एक नाव आहे. त्यांचे पती अमोल सरकारी कंत्राटदार आहेत. रत्नागिरीपासून काही किलोमीटरवरील कोळंबे येथे ते राहतात. राजवाडी येथील सतीश कामत यांनी महिलांसाठी सुरू केलेले छोटे उद्योग अनुश्री यांच्या पाहण्यात आले. त्यातून कोकणातील मेवा असलेल्या विविध फळांवर प्रक्रिया करावी याची दिशा त्यांना मिळाली.

उद्योगास सुरुवात

प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान प्रशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यादृष्टीने अनुश्री यांनी २०१८ मध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम रत्नागिरी येथील ‘आयटीआय’ संस्थेतून पूर्ण केला. सन २०१९ च्या दरम्यान प्रक्रिया युनिटची मुहूर्तमेढ रोवली. घराजवळच इमारत घेतली. बॉयलर, पल्पर, केटल्स, कॅन, पाऊच आदी स्वरूपातील पॅकिंग यंत्रणा घेण्यास सुरुवात केली. पंधरा लाख रुपयांचे कर्ज बँक ऑफ इंडियाकडून घेतले. यात ३५ टक्के अनुदान खादी ग्रामोद्योगकडून मिळाले. प्रस्ताव मंजूर होईपर्यंत अनेक अडचणींना सामोरेही जावे लागले. स्वतःकडील २० लाखांचे भांडवलही गोळा केले. आंबा, फणस, करवंद अशा फळांवर प्रक्रिया करायची होती. त्या दृष्टीने परिसरातील बागायतदारांकडून कच्चा माल घेण्यास सुरुवात केली. बाजारभावापेक्षा दोन पैसे अधिक त्यांना देऊ केले.

Food Processing Business
Fruit Processing Industry : पुरंदरच्या तिघा उच्चशिक्षित मित्रांचा पल्प, स्लाइस निर्मिती उद्योग

प्रकिया पदार्थ

सन २०१९ मध्ये उद्योग सुरू झाला. पण २०२० मधील लॉकडाउनने उत्पादने निर्मितीची घडी काहीशी विस्कटली. मात्र अनुश्री यांनी जिद्दीने व धडाडीने उद्योग सुरू ठेवला. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी विविध उत्पादनांना हात घातला. त्यासाठी विक्री व्यवस्था तयार केली. आज आंब्यापासून पल्प, जॅम, मोदक ही उत्पादने तयार होतातच. पण आंबापोळीप्रमाणे यंदा ‘मॅंगोरोल’ तयार केला आहे. आंबा मोदकाला चांगली मागणी असून, त्याचा प्रति किलो दर ७५० रुपये आहे. दोनशे ग्रॅमच्या काचेच्या बाटलीतून जॅम सादर कला आहे. सुरुवातीला ५ ते ६ टनांपर्यंत उत्पादन असलेला आंबा पल्प यंदा १५ टनांपर्यंत तयार केला आहे.

Food Processing Business
Sweet Corn Processing : हवेली तालुक्यातील नितीन कामठे यांचा स्वीट कॉर्न प्रक्रियेसह पल्पनिर्मिती भाजीपाला ‘कटिंग’ उद्योग

फणसाची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने

बाजारात फणसाच्या पदार्थांना मागणी वाढू लागली हे अभ्यासले. त्यातून तळलेले गरे तयार केले.
ते खुसखुशीत करण्यासाठी ताजे खोबरेल तेल वापरले जाते. फणसाच्या पिकलेल्या गरांपासून पल्प तयार केला. त्यापासून फणस मोदक हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनही सादर केले. गणशोत्सवावेळी त्यांना मागणी येत आहे. पहिल्या वर्षी ७५० रुपये प्रति किलो दराने १५
किलो, मागील वर्षी ३० किलो मोदक विक्रीला गेले. यंदा ५० किलोंची मागणी आहे. फणसाची बारीक चिरलेली भाजीही पाऊच पॅकिंगमधून तयार केली आहे. त्याची टिकवणक्षमता सहा महिने आहे.

करवंद जॅम आणि पल्प

करवंदांपासून जॅम आणि पल्प बाजारात आणण्याची तयारी केली आहे. शंभर ग्रॅम काचेच्या बॉटल्समधून त्याची विक्री सुरू केली आहे. यंदा ३०० बॉटल्स जॅमची विक्री झाली. पुढील वर्षांपासून मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करण्याचा प्रयत्न आहे. सध्या २०० ग्रॅमसाठी १५० रुपये असा दर आहे.

कोणतेही कृत्रीम घटक नाहीत

रुची संगम असा उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. उत्पादनांत ‘प्रिझर्व्हेटिव्हज, ॲडिटिव्हज किंवा कोणतेही कृत्रीम पदार्थ समाविष्ट केले जात नाहीत. त्यामुळे पदार्थांची चव, रंग, स्वाद नैसर्गिक असतो.
साखरेचे प्रमाण एकसमान असावे यासाठी रसाची ब्रिक्सद्वारे तपासणी होते. आंबा मोदकांप्रमाणेच फणस मोदकाची कृती असते. मात्र फणसाचा रस थोडा घट्ट असल्याने त्यात साखरेचे प्रमाणे कमी-अधिक असते.

विक्री व ‘मार्केटिंग’

अनुश्री यांना उद्योगात पती अमोल यांची मोठी साथ आहे. त्यातील बरीच कामे करण्यात अमोल आघाडीवर असतात. मुंबईतील नातेवाईक, मित्र परिवारांमार्फत व्हॉट्‍सॲप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीचे प्रयत्न केले. जिल्ह्यातील काही हॉटेल व्यावसायिक तसेच ‘आउटलेट्‍स’ व्यावसायिक यांच्याकडे पदार्थ विक्रीस उपलब्ध केले आहेत. मुरूड येथील बागायतदाराने दीड टन आंबा पल्पची ऑर्डर दिली. त्याचा स्वाद पाहून भविष्यात दुप्पट आंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. दिवाळीला फराळ तर गुढीपाडव्यावेळी गुढीच्या साहित्य विक्रीतूनही अनुश्री उत्पन्न मिळवतात. गेल्या वर्षी २०० गुढ्या त्यांनी विकल्या.

गावातील महिलांना रोजगार

पाटणे यांनी सुमारे ३५ स्थानिक महिला व चार पुरुषांना रोजगार दिला आहे. शिफ्टपेक्षा अधिक काळ काम करावे लागल्यास त्याचाही मोबदला दिला जातो. मे महिना मुख्य हंगामाचा असल्याने सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत काम चालते. कामावेळी महिलांना हातमोजे, अ‍ॅप्रन आणि केस बांधणी साहित्य दिले जाते. स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर भर आहे.

अनुश्री पाटणे, ९९७५९२४८०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com