Fruit Processing Industry : पुरंदरच्या तिघा उच्चशिक्षित मित्रांचा पल्प, स्लाइस निर्मिती उद्योग

Fruit Processing : पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील तीन उच्चशिक्षित मित्रांनी एकत्र येऊन विविध फळांपासून पल्प व स्लाइस निर्मिती उद्योग सुरू केला आहे.
Fruit Processing
Fruit ProcessingAgrowon

Success Story : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका व त्यातही सासवडचा पट्टा अंजीर, सीताफळ व अन्य फळपिकांसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील संदीप काळे (गाव सोनोरी), हेमंत म्हस्के (गुरुळी) व रवींद्र जगताप (राजेवाडी) हे तिघे मित्र एकत्र आले.

प्रत्येकाची शेती आहेच. पण तिघांपैकी दोघांच्या घरी शेतीमाल पुरवठा करण्याचा तर एका मित्राच्या घरचा मुंबई येथे अडतीचा व्यवसाय आहे. तिघांनीही संगणकीय विज्ञान क्षेत्रातील ‘मास्टर’ पदवी घेतली आहे.

प्रक्रिया उद्योगात दिसली संधी

परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागांचे क्षेत्रही आहे. आवक वाढल्यास अनेक वेळा दर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. काही वेळा बागा काढण्याची वेळ येते. अशा वेळी हाच माल शीतगृहात असता किया त्यावर प्रक्रिया केली असती, तर त्याला भविष्यात चांगला दर मिळाला असता ही संकल्पना तिघा मित्रांनी चांगली लक्षात घेतली.

तिघाही मित्रांच्या घरची शेती व्यवसायाची पार्श्‍वभूमीही होती. हे पाहता फळ प्रक्रिया उद्योगात संधी असल्याचे लक्षात आले. ही गोष्ट साधारण २०१८ ची. उद्योगासाठी भागभांडवल किती लागेल याची चाचपणी तज्ज्ञांकडून केली. त्यानुसार प्रत्येकी १५ लाखांची तजवीज करून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले.

Fruit Processing
Fruit Processing : फळ प्रक्रिया उद्योगातील अवशेषांचा उपयोग

उद्योगातील महत्त्वाचे टप्पे

सोनोरी गावात संदीप काळे यांच्या घराशेजारीच प्रकल्प उभारला आहे. कोणती उत्पादने तयार करावयाची ते निश्‍चित झाल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पल्प, वजन, सीलिंग, पॅकिंग आदी विविध यंत्रसामग्रीची खरेदी पुणे, मुंबई, गुजरात येथून केली.

त्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च आला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल केंद्रात आणल्यानंतर तो नैसर्गिकरीत्या तीन ते चार दिवसांत पिकवला जातो. त्यानंतर त्यातील फळे निवडून प्रतवारी होते. त्यानंतर हा माल प्रक्रियेसाठी पुढे जातो.

पुढील उत्पादनांची होते निर्मिती

-आंबा, चिकू, जांभूळ, अंजीर- पल्प व स्लाइस

-सीताफळ- पल्प

-फ्रोझन स्ट्रॉबेरी

-पेरू- पल्प

प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे आधुनिक यंत्रणेद्वारे ‘ब्लास्ट चिलिंग’ केले जाते. दोन हजार किलो क्षमतेची ही ब्लास्ट यंत्रणा आहे. तेथे उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात उत्पादन आठ तासांच्या कालावधीसाठी ठेवले जाते.

त्यानंतर माल शीतगृहात (कोल्ड स्टोअरेज) उणे १८ अंश सेल्सिअसला प्रत्येकी एक किलोच्या प्लॅस्टिक पाऊचमध्ये २५ व ३० किलो बॉक्सच्या रूपाने ठेवला जातो. या शीतगृहाची क्षमता कमी पडत असल्याने नव्याने १०० टन क्षमतेच्या शीतगृहाची उभारणी सुरू केली आहे.

विक्री व्यवस्था

सध्या मुंबई, पुणे, नगर, नाशिक आदी ठिकाणी प्रक्रिया उत्पादनांची विक्री केली जाते. मागणीनुसार अर्धा किलो, एक किलो, पाच किलोमध्ये पॅकिंग केले जाते. हॉटेल, डेअरी व आइस्क्रीम व्यावसायिक हे या उत्पादनांचे मुख्य ग्राहक आहेत. सुरुवातीला उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी प्रत्येक ग्राहकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी विश्‍वास संपादन करावा लागला.

या उत्पादनांचे दर प्रति किलो १४० ते १८० रुपये या दरम्यान आहेत. येत्या काळात ‘नेचर सीप फूड एलएबी’ या ब्रॅण्डनेमने विक्री केली जाणार आहे. तिघा मित्रांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार काळे हे कच्च्या मालाची खरेदी व प्रतवारी, जगताप उत्पादन- निर्मिती तर म्हस्के विपणन व विक्री हे विभाग सांभाळतात.

Fruit Processing
Fruit Crop Export : फळ पिकांची निर्यात, प्रक्रियेवर असेल विशेष लक्ष

उलाढाल

सुरुवातीच्या काळात १० टनांची विक्री व त्यातून १५ लाखांच्या दरम्यान उलाढाल झाली. त्यातून वाहतूक, मालाची खरेदी, मजुरी, अन्य खर्च मिळून सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च झाला.

पुढील वर्षानंतर टप्प्याटप्प्याने २२ टन, ४० टन अशी विक्री वाढत गेली. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट उद्‍भवले. त्याकाळात उलाढालीचा आलेख घसरला. आता मात्र एक ते दीड कोटी रुपयांच्या घरात उलाढाल पोहोचली आहे. आज उद्योगातील भांडवल गुंतवणूक दोन कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.

शेतकऱ्यांना मिळतो फायदा

तीन मित्रांपैकी संदीप काळे म्हणाले, की सासवडच्या बाजारात असंख्य शेतकरी आपला माल विकण्यासाठी घेऊन येतात. अशा शेतकऱ्यांचा माल अनेक व्यापारी दर पाडून मागतात. अशावेळी आम्ही मात्र शेतकऱ्यांना योग्य दर देऊन तो खरेदी करतो. सेकंड ग्रेडचा मालही प्रक्रियेसाठी उपयोगात आणला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाहतूक, हमाली, तोलाई आदी खर्चही वाचतात.

आमच्या उत्पादनांनी गुणवत्ता चांगली ठेवली असल्याने या क्षेत्रात स्पर्धा असली तरी आम्हाला भीती वाटत नाही. आमच्या उद्योगातून हंगामात सुमारे शंभर तर एरवी ७० जणांना स्थानिक स्तरावर रोजगार देणे आम्हाला शक्य झाले आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे.

संदीप यांची अडीच एकर शेती असून उत्पादित अंजीर, सीताफळ ते दिल्ली बाजारपेठेत पाठवतात. शेतीचा घरचा मोठा अनुभव व त्यातील बारकावे माहीत असल्याने प्रक्रिया उद्योग निभावणे शक्य होत असल्याचे संदीप म्हणाले.

संपर्क - संदीप काळे, ८६००२५२८७३, हेमंत म्हस्के, ७०३०८२९५९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com