Sweet Corn Processing : हवेली तालुक्यातील नितीन कामठे यांचा स्वीट कॉर्न प्रक्रियेसह पल्पनिर्मिती भाजीपाला ‘कटिंग’ उद्योग

Success Story : पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील नितीन कामठे यांनी स्वीट कॉर्न, अर्थात मधुमक्याचे दाणे वेगळे करून त्यांचा कंपन्यांना पुरवठा करण्याचा उद्योग यशस्वी करून समाधानकारक उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.
Sweet Corn Processing
Sweet Corn ProcessingAgrowon

Agriculture processing industry : अलीकडील काळात अनेक तरुण धाडसाने शेतीमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळून त्यात यशस्वी किंवा स्थिर झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी (ता. हवेली) येथील नितीन तुकाराम कामठे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित एक एकर शेती आली.

मात्र अर्थकारण सशक्त करण्यासाठी तेवढे पुरेसे नव्हते. त्यामुळे मॉलवर्गातील एका प्रसिद्ध कंपनीत पळे- भाजीपाला विभागात त्यांनी दोन वर्षे नोकरी केली.

त्या दरम्यान ग्राहक, त्यांची मागणी, बाजारपेठेतील कल. शेतीमालाचे व्यवस्थापन आदी सर्व बाबींचा अनुभव घेतला. त्यातून मग स्वतःचाच उद्योग सुरू करावे, असे वाटून त्यादृष्टीने आखणी सुरू केली.

प्रशिक्षणातून सुरुवात

अन्नप्रक्रिया उद्योगातच कार्यरत व्हायचे नक्की केल्यानंतर नितीन व पत्नी आश्‍विनी या दोघांनी पुणे येथील एका खासगी संस्थेत, तसेच ‘सकाळ उद्योग समूहा’च्या ‘एसआयआयएलसी’ येथे या विषयातील लघू अभ्यासक्रम पूर्ण केले. सन २०१० मध्ये त्यांनी दुर्गा महिला गृह उद्योग या नावाने युनिट सुरू केले.

शोध व अभ्यासातून त्यांना प्रक्रिया व निर्यातक्षेत्रातील चार कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून या कंपन्यांना मागणीनुसार पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट होते.

Sweet Corn Processing
Agriculture Processing Industry : कृषी प्रक्रिया उद्योगांच्या ‘एक खिडकी’साठी प्रयत्नशील

उद्योगाची वाटचाल

उद्योगासाठी गावात स्वमालकीच्या जागेत दोन हजार चौरस फूट आकाराचे शेड उभारले. तर वाहनांचे पार्किंग व अन्य कामांसाठी एक हजार चौरस फूट जागेची सुविधाही उभारली. पुणे- गुलटेकडी मार्केटमधून ५०० किलो मक्याची कणसे आणून युनिटमधील महिलांकडून ती सोलून दाणे वेगळे करून संबंधित निर्यातदार कंपन्यांना देण्यास सुरुवात केली.

टप्प्याटप्प्याने कामांत आणि आत्मविश्‍वासात वाढ होत गेली. आज सुमारे १२ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून कामठे दांपत्याने या कंपन्यांसोबत काम करण्यात सातत्य व उद्योगात यश व स्थैर्य मिळवले आहे.

...अशी होत मक्यावर प्रकिया

आज शेतकऱ्यांकडून थेट मका खरेदी होते. यात बाजार समितीला मका देण्यापेक्षा कामठे यांच्याकडे तो पाठवणे शेतकऱ्यांनाही सुलभ होते. हमाली, तोलाई, गोणीचे पैसे वाचतात. शिवाय बाजारातीलच दर त्यांना मिळतो. काही प्रसंगी कामठे यांना बाजार समितीतूनही माल घ्यावा लागतो.

युनिटमध्ये स्वीट कॉर्नची कणसे आल्यानंतर ग्रेडिंग होते. महिला कामगारांकडून कणीस सोलून दाणे वेगळे केले जातात. क्रेटच्या माध्यमातून ते संबंधित कंपन्यांकडे रवाना केले जातात. हाताळणी व पॅकिंग चांगल्या प्रकारे केले जाते. त्यामुळे दर्जा चांगला राखण्यास मदत होते.

कामठे यांच्या उद्योगातील महत्त्वाच्या बाबी

-सुमारे चार कंपन्यांना प्रत्येकाला अंदाजे एक टन याप्रमाणे दररोज तीन ते चार टन स्वीट कॉर्न दाण्यांचा पुरवठा. त्यासाठी दररोज होते सात ते आठ टन कणसांवर प्रक्रिया.

-उन्हाळ्यात दाण्यांची प्रतवारी थोडी कमी मिळते. त्यामुळे या हंगामात प्रक्रियेची आकडेवारी काहीशी कमी.

-प्रति किलो दाण्यांमागे २० ते २५ रुपये दर मिळतो.

पल्प निर्मिती व भाजीपाला ‘कटिंग’

-केवळ ‘स्वीट कॉर्न’पुरतेच काम मर्यादित न ठेवता आंबा, सीताफळ, जांभूळ, स्ट्रॉबेरी आदी फळांपासून पल्पनिर्मितीही सुरू केली आहे. सोबतच भेंडी, मेथी, पालक, गाजर, घेवडा, फ्लॉवर, आले यांच्यावर प्राथमिक प्रक्रिया म्हणजे संबंधित कंपन्यांच्या मागणीनुसार त्यांचे कटिंग करून दिले जाते. फ्रोझन वाटाणेही तयार केले जातात. अशा प्रकारे आजमितीस १४ ते १५ शेतीमालांवर प्रक्रिया करून उद्योगाचा विस्तार केला आहे. दोनशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत पॅकिंग करून पुरवठा होतो.

-पल्पसारखी उत्पादने विशिष्ट काळासाठी ‘कोल्ड स्टोअरेज ला ठेवण्यात येतात. जाते. केंद्रावरील सर्व कामे आश्‍विनी पाहतात. त्यांनी महिलांना एकत्र करून बचत गटाच्या स्थापनेतून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मक्याची खरेदी, विक्री ही जबाबदारी नितीन पार पाडतात.

- या उद्योगातून वर्षाला ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत कामठे दांपत्याने मजल मारली आहे. लॉकडाउन काळात त्यांना आर्थिक फटका बसला. मात्र हळूहळू त्यातून ते सावरू लागले आहेत.

- दाणे वेगळे केल्यानंतर दररोज मोठ्या प्रमाणात मक्याचा पाला उपलब्ध होतो. परिसरातील शेतकरी तो जनावरांसाठी प्रति किलो अडीच रुपये दराने घेऊन जातात. त्यातून वाहतूक खर्च निघत असून, शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे.

Sweet Corn Processing
Fruit Processing Industry : पुरंदरच्या तिघा उच्चशिक्षित मित्रांचा पल्प, स्लाइस निर्मिती उद्योग

महिलांना मिळाला रोजगार

आपल्या उद्योगातून कामठे यांनी परिसरातील ५० ते १०० महिलांना रोजगार दिला आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला चांगलाच हातभार लागला आहे. मक्याचे दाणे सोलून घेण्यासाठी महिलांना प्रति किलो तीन रुपये याप्रमाणे मेहनताना दिला जातो.

पल्पनिर्मिती, भाजी निवडणे आदी कामेही महिला करतात. दिवसभरात एक महिला १५० ते २०० किलोपर्यंतचे काम करते.

संपर्क - नितीन कामठे- ७७४१८२८२८२, ९२०९०११४८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com