Natural Gift: तुझे आहे तुजपाशी...

Natural Health: आपल्या शरीराच्या क्षमता, आपले आरोग्य-सौंदर्य याबद्दल आपण जागरूक झालेलो नाही, त्याबाबतचा नेमका दृष्टिकोन विकसित करण्यात कमी पडलो आहोत. म्हणून तर आपल्याला निसर्गाने काय दिले आहे, हेच आपल्याला समजले नाही; त्याचे मोल कळणे ही तर दूरचीच गोष्ट!
Color Difference
Color DifferenceAgrowon
Published on
Updated on

Natural Strengths: आपल्या शरीराच्या क्षमता, आपले आरोग्य-सौंदर्य याबद्दल आपण जागरूक झालेलो नाही, त्याबाबतचा नेमका दृष्टिकोन विकसित करण्यात कमी पडलो आहोत. म्हणून तर आपल्याला निसर्गाने काय दिले आहे, हेच आपल्याला समजले नाही; त्याचे मोल कळणे ही तर दूरचीच गोष्ट! याबाबत सारासार विचार केला तर आपल्यापाशी काय आहे, याची नेमकी कल्पना येईल. मग कोणत्याही माध्यमांना, त्यांच्या जाहिरातबाजीला बळी पडण्याचे आणि शरीर, आरोग्याबाबत कोणताही न्यूनगंड बाळगण्याचे कारणच उरणार नाही.

काळा - गोरा... त्वचेच्या रंगातील हा भेद भारतीयांसाठी नवा नाही. अर्थात, युरोपीय मानसिकतेच्या दृष्टीने आपण सर्व भारतीय काळे किंवा कलर्ड. तरीही आपल्यातही हा रंगाचा भेद पाळला जातो, ही वस्तुस्थिती. पण हा भेद का आणि कशामुळे? पूर्वी याची मांडणी विविध वंशांच्या अनुषंगाने केली जायची. आता मानवविज्ञानाने (अँथ्रोपोलॉजी) संशोधनाअंती, वंशानुसार केले जाणारे भेद नाकारले आहेत. त्यांची आधुनिक मांडणी अशी की सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले सर्व लोक एकाच प्रजातीचे आहेत.

खरं तर, माणसाच्या अनेक प्रजाती होत्या. आतापर्यंत उपलब्ध असलेले पुरावे असे सांगतात, की त्या सर्वांचा विकास आफ्रिकेमध्ये झाला. त्या विविध कालखंडात आफ्रिकेतून बाहेर पडल्या आणि जगभर पसरल्या. त्यापैकी एक अलीकडची म्हणजे- निएंडरथल. या माणसाच्या मेंदूचा आकार आता अस्तित्वात असलेल्या माणसाच्या (म्हणजे आपल्या सर्वांच्या) तुलनेत मोठा होता. पण माणसाची ही प्रजाती सर्वसाधारणपणे २५ हजार वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर अस्तित्वात होती. त्यानंतर ती नामशेष झाली. त्यामुळे आता आपली एकच प्रजाती शिल्लक आहे. जगभर पसरलेल्या माणसाच्या जनुकांच्या (डी.एन.ए.) नमुन्यांचा अभ्यास करून आता ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे जगाच्या सर्व भूभागावर असलेला माणूस- मग तो कोणत्या खंडावर असो, नाहीतर बेटांवर- जीवविज्ञानाच्या अर्थात बायोलॉजीच्या दृष्टीने एकच आहे.

Color Difference
Rural Story: मातीशी एकरूप झालेलं गाव...

आताच्या संशोधनानुसार, माणसाची ही प्रजाती (ज्यामध्ये आपल्या सर्वांचाच समावेश होतो) सर्वसाधारणपणे दोन लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात उत्क्रांत झाली. त्यानंतर हा माणूस जगाच्या विविध भागांत पसरला. हा माणूस जगभर पसरलेला असताना काही ठिकाणी निएंडरथलसारख्या आधीच्या प्रजातीचा माणूस अस्तित्वात होताच. त्यामुळे या दोन प्रजातींची माणसं एकाच वेळी एकाच प्रदेशात राहत होती. त्यांचा काही प्रमाणात एकमेकांशी संपर्कही आला. त्यांच्या काही जनुकांचे अंश आताच्या आधुनिक माणसातही आढळतात, पण त्यांचे प्रमाण अगदीच नाममात्र आहे. पुढे निएंडरथल प्रजातीचा माणूस नामशेष झाला आणि आता आपली एकच प्रजाती शिल्लक आहे.

रंग, दिसण्यात भेद का ? ही पार्श्‍वभूमी समजून घेतल्यावर स्वाभाविकपणे प्रश्‍न पडेल- आपली एकच प्रजाती असेल तर मग माणसाच्या रंगामध्ये आणि दिसण्यामध्ये भेद कसा? त्याचे मुख्य कारण आपल्या भवतालाशी संबंधित आहे. म्हणजेच तिथली भौगोलिक परिस्थिती, विशेषत: हवामान, राहण्याची पद्धती यांच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर त्या त्या भागात राहणाऱ्या माणसांचे त्याच गटाशी-समूहाशी शारीरिक संबंध येत गेले. म्हणजेच ‘इनब्रीडिंग’ होत गेले. त्याचा परिणाम म्हणून काही गुण-वैशिष्ट्ये त्या त्या गटामध्ये साचत गेली. ही क्रिया वेगवेगळ्या भूभागावर तब्बल ५० हजार ते सव्वा लाख वर्षे सुरू आहे. त्यामुळे माणसाची शारीरिक ठेवण, रंग आणि इतर ठळक वैशिष्ट्ये त्या त्या परिस्थितीत निर्माण होत गेली आणि ती पुढे त्या भागातील माणसाची ओळख बनली... हे या मागचे वैज्ञानिक वास्तव.

हे सर्व समजून घेतल्यावर आता काळ्या - गोऱ्याच्या भेदाबाबत. कोणाचा रंग काळा (गडद) असणार आणि कोणाचा गोरा (हलका) हे पेशीमध्ये असलेला ‘मेलॅनिन’ नावाचा घटक ठरवतो. त्याचे प्रमाण जास्त असेल तर त्वचेचा रंग गडद बनतो आणि त्याचे कमी प्रमाण असेल तर हलका. सर्वसाधारणपणे पाहिले तर विषुववृत्तावरील म्हणजेच उष्ण प्रदेशातील लोकांच्या त्वचेचा रंग गडद असतो. आणि तिथून ध्रुवीय प्रदेशाकडे जायला लागले की तो हलका होत जातो. यालाही हवामान हेच कारण आहे. त्यानुसार त्या त्या भागातील माणसाच्या शरीराने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.

पृथ्वीवर सर्वत्र सूर्यप्रकाश अनुभवायला मिळतो, पण त्याचे प्रमाण कमी-जास्त असते. या सूर्यप्रकाशात अति-नील किरणे सुद्धा (अल्ट्रा-व्हॉयलेट रेज) असतात. त्यांचा फायदा असतो, तसा तोटासुद्धा. फायदा असा की त्यांच्यामुळे शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व (व्हिटॅमिन-डी) निर्माण होण्यास मदत होते. पण त्यांचे प्रमाण जास्त असेल तर त्वचेचे विकारही जडतात. अगदी त्वचेच्या कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या परिस्थितीत, तुमचा रंग हा तुम्ही कोणत्या हवामानात राहत आहात, त्यानुसार शरीराने दिलेला प्रतिसाद आहे.

म्हणजे तुम्ही उष्ण प्रदेशात असाल तर तुम्हाला तीव्र सूर्यप्रकाश आणि त्यातील भरपूर प्रमाणातील अति-नील किरणे सहन करावी लागतात. त्यांच्यापासून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते खरे, पण या अति-नील किरणांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तुमची त्वचा गडद (काळी) असावी लागते. म्हणजे ती या किरणांचा शरीरातील प्रवेश रोखून त्यांचे दुष्परिणाम कमी करते. हे काम मेलॅनिन करते. याउलट तुम्ही थंड हवामानाच्या प्रदेशात असाल तर सूर्यप्रकाश तीव्र नसतो. जो काही सूर्यप्रकाश मिळतो, तो घेणे फायद्याचे. कारण त्यामुळेच तर शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होणार आहे. पण तिथे अति-नील किरणांना अडवणारी गडद त्वचा असेल तर काय कामाचे? म्हणून इथे हलकी (पांढरी) त्वचा फायद्याची ठरते. म्हणून तर युरोपात ‘सन-बाथ’ घेण्याची आणि त्याद्वारे सूर्यप्रकाश शरीरावर पाडून घेण्याची पद्धत आहे.

Color Difference
Rural Story : गाव आहे म्हणून...!

आपली शरीररचना हवामानाला किती उत्तम प्रतिसाद देते, याचे यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे असू शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना आपल्यासारख्या उष्ण प्रदेशात गोरे होण्याची धडपड असते. ती कशामुळे?... प्रश्‍न एक.

आता दुसरा मुद्दा, अलीकडेच एका कार्यक्रमात माझे पुण्यातील मित्र शरीरशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रमोद पाटील यांचे फिटनेस या विषयावरील भाषण ऐकले आणि गप्पाही झाल्या. माणूस अवतीभवतीच्या वातावरणापासून किंवा पर्यावरणापासून दूर जाईल, तितके त्याचे आरोग्य बिघडणार आहे- हे त्यांच्या बोलण्यातील सार. माणूस भटका, शिकारी अवस्थेत असताना त्याचे आरोग्य उत्तम होते. उत्क्रांतीच्या टप्प्यात जास्तीत जास्त काळ तो याच अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे शरीर याच गोष्टीसाठी विकसित झाले आहे.

पण पुढे शेतीच्या विकासानंतर माणूस स्थिर झाला, अन्न साठवू लागला, त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. माणसाने घरे बांधून स्वत:ला वातावरणापासून अलिप्त करून घेतले, मग विविध साधनांद्वारे (उदा. पंखे, कुलर, ए.सी.) वातावरणाशी येणारा संपर्क आणखी कमी केला. आपण वातावरणापासून जितके जास्त वेळ अलिप्त असू, तितके आरोग्य बिघडणार हे वास्तव आहे. अर्थात आताच्या परिस्थितीत घर नको, असे कोणी म्हणणार नाही. पण आर्थिक परिस्थिती सुधारली की नैसर्गिक वातावरणापासून दूर भौतिक सुख देणाऱ्या साधनांचा अति वापर होतो. त्यातून व्याधी जडतात हे ठाऊक असतानाही हा सोस का?... प्रश्‍न दोन.

स्वच्छता हा अलीकडचा परवलीचा शब्द. ती महत्त्वाची आहेच, पण त्याबाबतचे तारतम्यच जणू सुटले आहे. ‘कोविड-१९’ साथीनंतर तर त्याचे असे काही स्तोम माजले की आता जिवाणू-विषाणू (बॅक्टेरिया आणि व्हायरसेस) यांचा प्रचंड बागुलबुवा निर्माण झाला आहे. त्या लाटेत आपण नेमके कसे वागत आहोत, याचे काही तारतम्यच उरले नाही. ‘सॅनिटायझर’चा अति वापर हे त्याचे एक उदाहरण. आपल्या शरीरावर आणि शरीरात (अगदी पोटातसुद्धा) उपयुक्त जिवाणू असतात. त्यांच्यामुळे शरीराचे संरक्षण होते, अन्न पचते, इतरही अनेक उपयोग आहेत. पण सर्वच जीवाणूंकडे खलनायक म्हणून पाहिले जाते. पाण्याच्या बाबतीतही असेच. पाणी शुद्ध आणि स्वच्छ हवे हे खरेच, पण बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली शुद्धतेचा अतिरेक केला जात आहे. आपणही या जास्तीच्या स्वच्छतेला का बळी पडतो?... प्रश्‍न तीन.

या तीनही प्रश्‍नांची उत्तरे आपल्या मानसिकतेत आणि ती बनण्यास जबाबदार असलेल्या विविध माध्यमांमध्ये दडली आहेत. आरोग्याला हानिकारक असतानाही आपण या गोष्टी विकत घेतो आणि वापरतो. का? कारण भीती, न्यूनगंड निर्माण करून हे सारे आपल्या माथी मारले जाते. मग ती आरोग्याबाबतची भीती असो, नाहीतर आपल्या सौदर्यांबाबत निर्माण केलेला न्यूनगंड! एकदा का हे मनावर ठसवले की नागरिकांचे ग्राहकांमध्ये सहज रूपांतर करता येते.

आपण सुद्धा या सापळ्यात सहज अडकत आहोत. कारण आपल्या शरीराच्या क्षमता, आपले आरोग्य-सौंदर्य याबद्दल आपण जागरूक झालेलो नाही, त्याबाबतचा नेमका दृष्टिकोन विकसित करण्यात कमी पडलो आहोत. म्हणून तर आपल्याला निसर्गाने काय दिले आहे, हेच आपल्याला समजले नाही; त्याचे मोल कळणे ही तर दूरचीच गोष्ट! याबाबत सारासार विचार केला तर आपल्यापाशी काय आहे, याची नेमकी कल्पना येईल. मग कोणत्याही माध्यमांना, त्यांच्या जाहिरातबाजीला बळी पडण्याचे आणि शरीर, आरोग्याबाबत कोणताही न्यूनगंड बाळगण्याचे कारणच उरणार नाही.

abhighorpade@gmail.com

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com