Soybean : गुणवत्तापूर्ण सोयाबीन उत्पादन तंत्र

Soybean Production Techniques : सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मशगत, वाणांची निवड, बीजप्रक्रिया, तणनियंत्रण, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीक संरक्षण आदी बाबींचा समावेश आहे
Soybean
Soybean Agrowon

-जितेंद्र दुर्गे

सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी व्यवस्थापनातील विविध बाबींचा अवलंब करणे गरजेचे आहे. यामध्ये मशगत, वाणांची निवड, बीजप्रक्रिया, तणनियंत्रण, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीक संरक्षण आदी बाबींचा समावेश आहे. त्यादृष्टीने लेखात दिलेल्या टिप्स शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील. शेतात पावसाचे अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी साचून नुकसान होणाऱ्याजमिनीसाठी पुढील कृती करावी. जमीन पेरणीसाठी तयार झाल्यानंतर ३.५ ते ४ फूट अंतरावर ट्रॅक्टरचलित चालवावा. त्या आधारे जमिनीखाली १.५ ते २ फूट खोलीवर भूमिगतचर काढून घ्यावेत.    

...असे आहेत वाण 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

    पीडीकेव्ही सुवर्ण सोया (एएमएस-एमबी-५-१८)

    पीडीकेव्ही अंबा (एमएस-१००-३९)

    पीडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस-१००१)

    पीडीकेव्ही पूर्वा (एएमएस -२०१५-१)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    एमएयूएस -१५८,   एमएयूस -१६२

    एमएयूएस -६१२,   एमएसूयएस -७२५ (चार दाण्यांची शेंग)     एमएयूएस -११८८

    एमएयूएस -१२८१

Soybean
Soybean Processing : सोयाबीन प्रक्रियेतील संधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

    फुले संगम (केडीएस -७२६)

    फुले किमया (केडीएस -७५३)

    फुले दूर्वा (केडीएस-९९२)

राष्ट्रीय संशोधन केंद्र, इंदूर 

    जेएस -२०-२९,      जेएस -२०-६९

    जेएस -२०-११६,  जेएस -२०-३४

    जेएस -२०-९८

सोयाबीन संशोधन केंद्र, ग्वाल्हेर 

    आरव्हीएसएम-११३५,  आरव्हीएसएम-१४०७

    आरव्हीएसएम-१४६०

लागवडपूर्व नियोजन 

घरचेच बियाणे वापरावयाचे झाल्यास मूठभर सोयाबीन घेऊन १०० बिया पाण्यात ५ ते १० मिनिटे भिजवाव्यात. टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करून मोजावे. शंभर बियांपैकी साधारणतः ७० बियांना सुरकुत्या पडलेल्या असल्यास बी पेरणीयोग्य आहे असे समजावे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच तापमान कमी झाल्यानंतर बियाण्याची अंकुरण क्षमता घरी तपासून घ्यावी. त्यासाठी ओल्या केलेल्या गोणपाटाच्या तुकड्यात १०० बी रेषेत ठेवावे. त्याची पुंगळी करून दोन्ही टोके बांधून घ्यावेत. साधारण ४ ते ५ दिवस त्यावर सकाळ, दुपार, संध्याकाळ पाणी शिंपडावे. पाच ते सहा दिवसांत अंकुर फुटलेले बियाणे मोजून घ्यावे. शंभर पैकी साधरणतः ७० बी अंकुरलेले असल्यास बियाणे पेरणीयोग्य आहे असे समजावे.

लागवडीखाली असलेले सोयाबीनचे सर्वच वाण सुधारित प्रकारात मोडतात. त्यामुळे दरवर्षी बियाण्याच्या बॅग विकत घेण्याची गरज नाही. घरचेच सोयाबीन पेरणीसाठी वापरल्यास प्रति एकर प्रति बॅग २७०० ते ४१०० रुपयांची बचत जागेवरच होते. जुन्या शिफारशीनुसार सलग सोयाबीनसाठी ३०किलो प्रति एकर बियाणे वापरण्यासाठीच्या शिफारशीत बदल झाला आहे. आता प्रति एकर २४ किलो बियाणे वापरण्याची शिफारस आली आहे. नावीन्यपूर्ण सुधारित जोडओळ अथवा पट्टापेर पद्धतीचा अवलंब केल्यास बियाणे व खत खर्चात मोठी बचत शक्य होते.

Soybean
Soybean Farming : काटेकोर नियोजनातून उत्पादनात राखले सातत्य

खोडमाशीची अळी व चक्रीभुंगा तसेच मूळकुज व मानकुज यांच्यापासून पिकाचे प्राथमिकअवस्थेत रक्षण करण्यासाठी शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करावी. जिवाणूसंघाची व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया पेरणीच्या एक तास पूर्वी १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावी.

वरील दोन्ही बीजप्रक्रिया करताना जेवढी निविष्ठा घेतली आहे त्यापेक्षा अर्ध्या किंवा तेवढ्याच मात्रेत पाण्याचा वापर करावा. दोन्ही प्रक्रिया करण्यासाठी गोणपाट अथवा जुन्या चादरीवर बियाणे घेऊन त्याचा पसरट ढीग करावा, त्यावर समप्रमाणात निविष्ठांचा वापर करावा. दोन व्यक्तींच्या साह्याने बियाणे केवळ ढवळून घ्यावे. बियाणे हाताने रगडणे अथवा चोळण्याची गरज नाही. थोड्यावेळेत बियाणे सुकल्यानंतर पेरणीसाठी वापरता येईल. रासायनिक निविष्ठांची व त्यानंतर जिवाणूसंघ व ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.  

लागवडीवेळचे नियोजन 

मध्यम ते भारी जमीन, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणारी व जमिनीचा सामू उदासीन असलेली जमीन निवडावी. पेरणी खूप लवकर अथवा खूप उशिरा न करता परिसरात तीन मोठे पाऊस झाल्यानंतर, तापमानात घट झाल्यानंतर ७० ते १०० मिलि पाऊस पडल्यानंतर करावी, जमिनीतील ओल साधारणतः नऊ इंचांपेक्षा जास्त खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर पेरणी करावी.

ट्रॅक्टरचलित अथवा बैलजोडीचलित पेरणीयंत्राने पेरणीसाठीनावीन्यपूर्ण सुधारित जोड ओळ पद्धत किंवा पट्टापेर पद्धत वापरावी. मानवचलित टोकणयंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पध्दतीचा अवलंब करण्यासाठी गादीवाफा पद्धत वापरावी.बीबीएफ यंत्राची उपलब्धता असल्यास गादीवाफ्यावर पेरणी करावी. 

प्रचलित पद्धतीने पेरणी करताना टोकण पद्धतीचा वापर करून जोड ओळ पद्धतीत पेरणी करण्यासाठी बैलजोडी अथवा ट्रॅक्टरचलित यंत्राने काकऱ्या पाडून घ्याव्यात. त्यानंतर मजुरांच्या साह्याने टोकण पद्धतीने पेरणी करावी. दोन झाडांतील अंतर सहा इंच याप्रमाणे प्रत्येक दोन ओळीनंतर तिसरी ओळ खाली ठेवावी.

ट्रॅक्टरचलित अथवा बैलजोडी चलित पेरणीयंत्राचा वापर करताना पेरणीची खोली साधारणतः ३ ते ४ सेंमीच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा, अंकुर जमिनीच्यावर येण्यासाठी लागणारी ताकद कमी पडून उगवणीवर विपरीत परिणाम संभवू शकतो. एकरी ३० किलो बियाणे वापरण्याच्या शिफारशीनुसार प्रति एकर १ लाख ७७ हजार ७७७ एवढी झाडांची संख्या राखावी लागते. एकरी २४ किलो बियाणे वापरावयाचे झाल्यास १ लाख ४२ हजार १४२ एवढी झाडांची संख्या राखली गेली पाहिजे.  जोडओळ पद्धतीत अथवा मजुरांद्वारे टोकण करताना दोन झाडांतील अंतर ६ ते ९ इंच राखावे. एका ठिकाणी २ ते ३ बी लावावे. 

झाडांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने गादीवाफ्यावर जोडओळीसाठी ‘झिगझॅग’ पद्धतीचा अवलंब करावा.जोडओळ, पट्टापेर पद्धतीत खाली सोडलेल्या ओळीच्या ठिकाणी डवरणीचे वेळी, डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजे कमी पावसाच्या स्थितीत पावसाचे मूलस्थानी संवर्धन होईल. तसेच पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा ही बाब शक्य होऊ शकेल. उभी - आडवी पेरणी करून तणनियंत्रणासाठी केवळ तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास अर्धे बियाणे शेताच्या एका बाजूने तर अर्धे बियाणे शेताच्या दुसऱ्या बाजूने पेरावे. म्हणजेच पिकाची चौकोनात पेरणी होईल.

अधिक उत्पादनक्षम नव्या वाणांची निवड करताना प्रचलित पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास दोन ओळींतील अंतरात भरीव वाढ करावी. म्हणजेच दोन ओळींतील अंतर ४५ सेंमीऐवजी दोन ते सव्वादोन फूट ठेवावे लागेल.

अन्नद्रव्ये, तण व कीड नियंत्रण व्यवस्थापन 

पाऊस झाल्यानंतर शेवटच्या वखरवाहीआधी किंवा रोटाव्हेटर वा पट्टीपासचा वापर करण्यापूर्वी प्रति एकर तीन बॅग्ज सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. रासायनिक खतांची मात्रा पेरणीवेळी देताना ५० किलो ते एक क्विंटल शेणखतात मिसळून अर्धी बँग युरिया व अर्धी बॅग पोटॅश द्यावा. म्हणजे रासायनिक खताची उपयुक्तता व कार्यक्षमता वाढेल.

 पेरणीवेळी झिंक सल्फेट ८ ते १० किलो, फेरस सल्फेट ४ ते ५ किलो, बोरॅक्स २ किलो प्रति एकर द्यावे.

 रोप २ ते ३ पानांवर असताना उगवणपश्चात तणनाशकाची फवारणी शिफारशीनुसार करावी.

 उगवण ते डवऱ्याचे फेर या दरम्यान शेत तणमुक्त ठेवावे. त्यासाठी उगवणपूर्व तणनाशक पेंडिमिथॅलिनची फवारणी ३५ ते ५० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पेरणीपासून ४८ तासांच्या आत जमिनीत पुरेशी ओल असताना करावी.

    वाणनिहाय कालावधीनुसार पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी ५ ते ७ दिवस आधी खोडमाशी व अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा. 

    मूळसड व मानकुज नियंत्रणासाठी शिफारसीत बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच १२- ६१-० अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य खताची फवारणी करावी.

-जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

सहयोगी प्राध्यापक (कृषिविद्या)

श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com