Human Psychology : निर्णयाची जबाबदारी माझीच

Article by Anand Nadkarni : कृतीच्या पातळीवरून मनाने हा निर्णय स्वीकारणं ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया असते. काही वेळा समस्येचे स्वरूप असे असते, की बाह्यरूप कृतीचे फार पर्याय आपल्याकडे असत नाहीत. मात्र कितीही कठीण प्रसंगात अंतर्गत पर्याय हा असतोच. अंतर्गत पर्याय म्हणजे समोर असलेल्या परिस्थितीकडे कसे पहायचे, त्यावर कसा विचार करायचा याचे स्वातंत्र्य.
Decision Making
Decision MakingAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

मागील आठवड्यात आपण योग्य निर्णय कसा घ्यायचा हे विस्ताराने पाहिलं, त्या निर्णयाची जबाबदारी घेणं महत्त्वाचं. काही वेळा मात्र आपण निर्णय घेत आहोत तो पर्याय आपल्याला पटलेला नसतो, मान्य नसतो; पण नाइलाजाने आपण तो स्वीकारतो. पण हा निर्णय स्वीकारताना त्यासोबत येणारे परिणाम आपल्याला आवडत नसतात. मनाने तो निर्णय मान्य केलेला नसतो, मात्र कृतीच्या पातळीवर आपण तो निर्णय स्वीकारलेला असतो. कृतीच्या पातळीवरून मनाने हा निर्णय स्वीकारणं ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया असते. या प्रक्रियेचे टप्पे कुठले ते बघूया.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • तडजोड (compromise) ः सुरुवातीला मनाने अजिबात न स्वीकारलेला निर्णय केवळ तडजोड म्हणून आपण मान्य करतो. त्याप्रमाणे वागायला शिकतो.

  • जुळवून घेणे (adjustment) ः पुढच्या जुळवून घेण्याच्या टप्प्यात, आपण त्या निर्णयातील काही भाग मनानेही स्वीकारतो. सगळ्या नाही तरी काही गोष्टी चांगल्या आहेत असे मत बनायला लागते.

  • स्वीकार (adaptability) ः ‘आता ह्याच पद्धतीने पुढे जाणार आहोत’ हे मन मान्य करते आणि त्या निर्णयाचा स्वीकार होतो.

  • आत्मसात होणे (internalization) ः हा स्वीकाराचा सगळ्यात शेवटचा टप्पा. त्या निर्णयाबद्दल आपल्या मनात असणारे किंतु एव्हाना गळून पडतात आणि आपण पूर्णत: त्या नव्या पद्धतीत, नव्या मार्गाने गोष्टी करण्यात रुळून जातो. हा माझ्या मर्जीचा निर्णय नाही हे देखील आता आपण विसरून जातो.

Decision Making
Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्यात सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

एक उदाहरण पाहूया. लग्न होऊन नवी नवरी घरी येते तेव्हा नव्या घरच्या काही पद्धती तिला फारशा रुचत नसतात. समजा, कोकणातली मुलगी देशावर सासरी आली. कोकणातल्या आणि देशावरच्या खाण्यापिण्याच्या, स्वयंपाकाच्या सवयी खूपच वेगळ्या. तिला सवय असते भरपूर ओले खोबरे वापरून स्वयंपाक करायची.

सासरी मात्र सगळ्यांना सवय शेंगदाणे आणि सुकं खोबरं वापरायची. पण आपण घरात नव्या आहोत, आपल्यालाच जुळवून घ्यायचं आहे हा विचार करून तिला त्या घरच्या स्वयंपाकाची पद्धत स्वीकारावी लागते. सुरुवातीला काही महिने ती भले स्वयंपाकात शेंगदाणा कूट वापरेल पण मनात येतच राहील की “छे! ओल्या खोबऱ्याची चव नाही ह्या पदार्थांना!” हा झाला तडजोडीचा टप्पा.

मग जरा त्या नव्या घरात स्थिरावली आणि सरावली की ती बराचसा स्वयंपाक कूट वापरून करेल आणि कधीतरी एखादा पदार्थ खोबरं घालून. आता हळूहळू तिलाही वाटायला लागेल की कूट घातलेले पदार्थही चांगले खमंग लागतात. म्हणजे आता ती आली जुळवून घेण्याच्या टप्प्यावर.

त्यापुढे अगदी सरावाने ती कूट वापरायला लागते. त्याबद्दल विचार येणं, ते टोचणं जवळ जवळ नाहीसं होतं. म्हणजे आता तिने स्वीकार केला की हीच आपल्या घराची पद्धत. आणि त्या सगळ्या पद्धती तिच्याच होऊन जातात. आधी आपल्याला ही गोष्ट पटत नव्हती, खटकत होती हे सुद्धा तिला आठवत नाही.

आमच्या घरी कुटाचेच पदार्थ आवडतात असं ती जिव्हाळ्याने म्हणायला लागते. म्हणजे हा निर्णय आता पूर्णपणे आत्मसात केला की तिने. सुरुवातीला फारसा न रुचणारा पर्याय, आपण आपला निर्णय म्हणून स्वीकारला की या टप्प्यांतून जाऊन जितक्या लवकर ‘आत्मसात करणे’ या टप्प्यावर येऊ, आपल्याला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

  • निर्णय घेण्याची प्रक्रिया, निर्णयाच्या स्वीकाराचे टप्पे हे आपण पाहिलं. आपण घेतलेल्या आणि स्वीकारलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना काय लक्षात ठेवायला हवे ते बघूया.

  • निर्णय घेताना तो यशस्वी होणार की नाही हे आपल्याला नक्की माहीत नसते. पण घेतलेल्या निर्णयाची आणि त्यासोबत येणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपल्याला घ्यायला हवी.

  • घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे म्हणजे त्या दिशेने प्रयत्न करणे आणि त्यात सातत्य ठेवणे फार गरजेचे आहे.

  • निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करताना आपण १०० टक्के प्रयत्न केले, समरस झालो तर या प्रवासात सौंदर्य, सकारात्मक भावना निर्माण होईल. निर्णय आणि त्यासाठीचे प्रयत्न हे वास्तवाला धरून असायला हवेत.

Decision Making
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यात ५५ हजार शेतकऱ्यांना परतावे

परफेक्ट चॉइस किंवा आदर्श निर्णय अस्तित्वात असत नाही. कुठल्याही निर्णयात थोडी का होईना, किंमत द्यावीच लागते. त्यामुळे असा हट्ट करणे वास्तववादी नाही. आपण आदर्श निर्णय घेणार किंवा घेतला आहे असं वाटत असेल आणि त्या निर्णयाचे नकोसे वाटणारे परिणाम झाले तर नैराश्य वाटते आणि हवे ते परिणाम मिळाले तर अहंकार.आदर्श निर्णय घेण्याच्या हट्टापेक्षा आपण अनुरूप निर्णय घेण्यावर भर द्यायला हवा. अनुरूप निर्णय म्हणजे सारासार विचार करून, वास्तवाचा विचार करून घेतलेले यथायोग्य निर्णय.

अनुरूप निर्णय घेताना आपण हे जाणून असतो की कदाचित हा निर्णय चुकूही शकेल. काही गोष्टी मनाप्रमाणे होतील आणि काही मनाविरुद्ध. मात्र मी माझ्या क्षमता आणि प्रयत्न १०० टक्के वापरेन. अनुरूप निर्णय घेणाऱ्याच्या मनात ही स्पष्टता असते, त्यामुळे निर्णय योग्य ठरला तरी त्याचे पाय जमिनीवर राहतात आणि विरोधात गेला तरी निराश, हताश न होता, तो नवे मार्ग आणि पर्याय शोधत राहतो! आपल्या क्षमता आणि कमतरता यांचे भान ठेवून आपला पर्याय निवडतो आणि त्यात १०० टक्के कस लावतो. मग अंतिम परिणाम कडू-गोड झाला तरी तो स्वीकारू शकतो.

आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना, इतरांच्या निर्णयाची / कृतींची नक्कल करावी का? आंधळे अनुकरण करत असू, तर आपण त्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घेणार नाही, इतरांना दोष देत राहू. मात्र इतरांच्या निर्णयांचे, परिणामांचे विश्‍लेषण करून, आपल्या अनुभवांशी ताडून पहावे, त्यातून आपल्याला योग्य अशी माहिती, ज्ञान जरूर मिळवावे! गौरव दत्ता हे एक निवृत्त लष्कर अधिकारी.

काश्मीरमध्ये ड्यूटीवर असताना, एका अपघातात त्यांनी पाय गमावले. मुळात खेळाडू असणाऱ्या दत्ता यांनी कृत्रिम पाय वापरुन परत एकदा धावायला सुरुवात केली. आज ते स्वत: एक अॅथलिट आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशातील स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवली आहेत. पॅराऑलिंपिक्ससाठी (दिव्यांग व्यक्तींसाठीचे ऑलिंपिक) भारतीय अॅथलिट टीमसाठी प्रशिक्षक झाले. आपल्या क्षमता आणि कमतरता यांचे भान ठेवून आपला पर्याय गौरव दत्ता यांनी निवडला.

काही वेळा समस्येचे स्वरूप असे असते, की बाह्यरूप कृतीचे फार पर्याय आपल्याकडे असत नाहीत. मात्र कितीही कठीण प्रसंगात अंतर्गत पर्याय हा असतोच. अंतर्गत पर्याय म्हणजे समोर असलेल्या परिस्थितीकडे कसे पहायचे, त्यावर कसा विचार करायचा याचे स्वातंत्र्य. असाध्य रोगाचे निदान झाले आणि मोजके दिवस हातात आहेत असे जेव्हा कळते, तेव्हा उपचार किंवा मनाप्रमाणे वागणे याचे फारसे पर्याय कदाचित त्या रुग्ण व्यक्तीकडे उरत नाहीत.

मात्र अशा परिस्थितीत हातात उरलेल्या वेळात कशा पद्धतीने विचार करायचा? निराशा, नशिबाला दोष लावणे, कुढत राहणे हा एक पर्याय. दुसरा पर्याय असा, की आपल्या क्षमता आणि कमतरता लक्षात घेऊन काय करता येईल? क्षण न् क्षण अर्थपूर्ण आणि संस्मरणीय कसा बनवू? यावर विचार करण्याचा पर्याय अंतर्गत आहे. असा विचार करणे, अशा पद्धतीने त्या परिस्थितीकडे बघायचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतेच. आजाराचे गांभीर्य, पैसा, वैद्यकीय उपचार लागू पडणे किंवा न पडणे यातील कशानेही बदलत नाही!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com