Team Agrowon
सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. बहर धरण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले असून बागायतदारांनी नियमितपणे बहराची तयारी सुरू करावी.
नैसर्गिक बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरवातीस पावसाच्या अंदाजानुसार आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेनुसार छाटणीची कामे सुरु करावीत.
अवकाळी पावसामुळे बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झाली आहे. बागेची छाटणी करताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाकावी.
छाटणी करताना जुन्या, वाळलेल्या फांद्या, अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे याच्याशी संबंधित असल्याने झाडाचा मध्यभाग मोकळा राहील अशा पद्धतीने छाटणी करावी. झाडास कमी सूर्यप्रकाश मिळाल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते,.
छाटणीनंतर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर एक टक्का बोर्डोमिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) तातडीने फवारणी करावी.
झाडाची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी.
छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते. झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते. फळे आकाराने मोठी होतात, फळांची गुणवत्ता सुधारते.