Sitaphal Orchard Management : सीताफळ बागेचे नियोजन, व्यवस्थापन

Sitaphal Farming : सीताफळ कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या जातीची, एकाच गुणधर्माची, दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. बागेत लवकर फलधारणा होते, उत्पादनही एकसारखे मिळते. लागवडीसाठी ‘फुले पुरंदर’ या जातीची निवड करावी.
Sitaphal Farming
Sitaphal FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, सुनील नाळे

Sitaphal Farming Planning : कोरडवाहू भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकांऐवजी कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सीताफळगराचा वापर आइस्क्रीम, मिल्कशेक, फ्रूट सॅलड, रबडी अशा पदार्थांमध्ये वाढत आहे.

सीताफळास उष्ण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे ३० ते ४० अंश सेल्सिअस तापमान आणि ५०० ते ६०० मि.मी. पर्जन्यमान फळांच्या वाढीसाठी पोषक असते.

फळधारणेवेळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेची गरज असते. फळे पिकताना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते. अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड असल्याने उथळ हलक्या मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन असावी.

रोपांची निवड

रोपे बियांपासून आणि शाखीय (कलम) पद्धतीने तयार केली जातात. बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची नसतात. तसेच फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखे नसते, त्यामध्ये प्रत्येक झाडांची फळांची गुणवत्ता, उत्पादनात फरक होतो.

कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या जातीची, एकाच गुणधर्माची, दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. बागेत लवकर फलधारणा होते व उत्पादनही एकसारखे मिळते. त्यामुळे कलमांची लागवडीसाठी निवड करावी.

लागवड

लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून उन्हामध्ये तापू द्यावी. पावसाळ्यापूर्वी हलक्या व मुरमाड जमिनीत ४ × ४ मीटर (हेक्टरी ६२५ झाडे) आणि मध्यम जमिनीत ५ × ५ मीटर (हेक्टरी ४०० झाडे) अंतरावर ४५ × ४५ × ४५ सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्डा एक ते दोन घमेले कुजलेले शेणखत, दोन ते तीन घमेले पोयटा माती, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने योग्य पद्धतीने भरावा.

पुरेसा पाऊस पडल्यानंतर खड्ड्यात मध्यभागी लहान खड्डा करून कलम लागवड करावी. लागवडीनंतर बाजूची माती खोडाभोवती हलक्या हाताने दाबावी. काठीचा आधार देऊन कलमे सुतळीने सैल बांधावीत. पुरेसा पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे.

Sitaphal Farming
Sitaphal Management : चांगल्या बहारासाठी अशी करा सिताफळाची छाटणी

वळण देणे

लागवड केल्यानंतर कलमास योग्य आकार येण्यासाठी मुख्य खोडावर कलमजोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकावेत. एक मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या चारही दिशांना एकसारख्या फांद्या विखुरल्या जातील असे वळण द्यावे.

एका ठिकाणी गर्दी झालेल्या, वेड्यावाकड्या व आडव्या वाढलेल्या व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. अशाप्रकारे वळण दिल्यास झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहते, झाडांची वाढ व फुले लागण्याचे प्रमाण वाढून भरपूर फळधारणा होते. चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.

आंतर पिके

लागवडीनंतर सुरवातीची दोन-तीन वर्षे खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, धैंचा तसेच विविध भाजीपाला यांसारखी आंतरपिके घ्यावीत.

आंतरपिकांमुळे जमीन संपूर्ण झाकली जाते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. तणांचे आपोआप नियंत्रण होते. जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.

बहर व्यवस्थापन

अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो याकरिता बाजरीचे आंतरपीक घेतल्यास आर्द्रता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक फलधारणा होते.

उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्टदरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून आर्थिक नफा वाढतो. ‘फुले पुरंदर’ ही जात या बहरास उत्तम प्रतिसाद देते.

पाणी व्यवस्थापन

हे कोरडवाहू फळझाड असल्याने गरजेइतकेच पाणी द्यावे. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन ५० ते ६० लिटर पाणी पुरेसे होते. झाडांमधील अंतर व स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते.

सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात बागेस हलक्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी, मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी आणि भारी जमिनीत १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.

ठिबक सिंचन पद्धतीने पाणी नियोजन करावे. खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्रेत २५ ते ३० टक्के बचत होते. खते निचऱ्याद्वारे अगर स्थिरीकरणामुळे वाया जात नाहीत. त्याचबरोबर जमिनीच्या चढ- उतारावरसुद्धा नियंत्रित पद्धतीने सारख्या प्रमाणात पाणी देता येते.

Sitaphal Farming
Sitaphal Management : सीताफळ बहराचे तंत्र

उत्पादन

लागवड केल्यानंतर पहिली तीन वर्षे झाडांचा शाखीय विकास होऊ द्यावा, चौथ्या वर्षापासून बहर व्यवस्थापन सुरु करावे. सुरुवातीची २ ते ३ वर्षे फळे कमी लागतात. जस जसे झाडाचे वय वाढते तसतसे फळांची संख्या वाढून उत्पादनही वाढते. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास साधारण पाच महिन्यांचा कालावधी लागतो. ‘फुले पुरंदर’ जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ४० ते ५० किलो फळांचे उत्पादन मिळते.

‘फुले पुरंदर’ जातीची वैशिष्ट्ये

फळे : आकर्षक आणि आकाराने मोठी.

वजन : ३६० ते ३८८ ग्रॅम.

झाडावरील फळांची संख्या : ११८ ते १५४

फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण : २२ ते २४ टक्के.

बियांचे कमी प्रमाण : ३७ ते ४०

गराचे अधिक प्रमाण : ४५ ते ४८ टक्के

पाकळ्यांची संख्या अधिक, घट्ट आणि रवाळदार गर, आल्हाददायक स्वाद.

पिठ्या ढेकूण कीड, फळसड रोगास मध्यम प्रतिकारक.

खत व्यवस्थापन

पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहर धरताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. नत्राची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद , पालाश ची माक्षा खोडापासून दूर फांद्याच्या परिघाखाली रिंग करून द्यावी. खते झाकून पहिले पाणी द्यावे. उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा एक महिन्याच्या अंतराने द्यावी.

प्रत्येक झाडास दरवर्षी लागवडीनंतर सुरुवातीला पाच वर्षांपर्यंत द्यावयाची खतमात्रा

वय (वर्ष) शेणखत / कंपोस्ट खत (किलो) नत्र (ग्रॅम) स्फुरद (ग्रॅम) पालाश (ग्रॅम)

१ १० ५० २५ २५

२ २० १०० ५० ५०

३ ३० १५० ७५ ७५

४ ४० २०० १०० १००

५ ५० २५० १२५ १२५

डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com