
Pune News: संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रांत आपला भारत देश पुढे राहील हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ४) केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी श्री. शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, ‘एनडीए’चे कमांडंट व्हाइस ॲडमिरल गुरुचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.
श्री. शहा म्हणाले, की थोरले बाजीरावांनी तंजावर ते अफगाणिस्तानपर्यंत आणि अफगाणिस्तान ते बंगालमार्गे कटकपर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते. बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रूपांतरित केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल.
गुलामीचे निशाण आहे तिथे उद्ध्वस्त करून स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश-विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, धनाजी- संताजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ आणि नंतर थोरले बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या मदतीने जनतेला एक करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी फुलविलेल्या स्वराज्याच्या अंगारामुळे अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे.
त्यांनी लढलेल्या ४१ लढायांपैकी एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की हे स्मारक पराक्रमाचे, पराक्रमातून निर्माण होणाऱ्या प्रतिरोधाचे स्मारक आहे. या वेळी एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी प्रास्ताविक केले.
एकनाथ शिंदेंचे ‘जय गुजरात’
दरम्यान, कोंढवा येथील श्री पुणे गुजराती समाज द्वारा आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोंडभरून कौतुक केले. भाषणाचा समारोप करताना त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशा घोषणा दिल्या. शिंदेंनी दिलेल्या या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शनिवारी (ता. ५) उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्यात ठाकरी बाण्याने उत्तर मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.