
भीमाशंकर बेरुळे
Islamic Personal Law: मुस्लिम कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो भारतातील मुस्लिम धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्यान्वये स्त्रियांना वारसाधिकार मिळतो. मात्र नात्याच्या दृष्टीने एकाच स्तरावरील स्त्री-पुरुषाला स्त्रीच्या दुप्पट हिस्सा मिळतो. मुस्लीम धर्मामध्ये अनैतिकता आणि व्यभिचाराला थारा नाही म्हणून अनौरस संततीला वडिलांच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळत नाही. मनुष्यवध (खून) करणाऱ्या व्यक्तीस वारसाधिकार मिळकतीमध्ये हिस्सा मिळत नाही.
हनाफी (सुन्नी) वारसा नियम
हनाफी नियमानुसार वारसांचे सात वर्ग आहेत. त्यापैकी तीन वर्ग प्रमुख असून चार दुय्यम वर्ग आहेत.
प्रमुख वर्ग : (१) हिस्सेदार (२) अवशिष्टग्राही (३) दूरचे नातेवाईक.
या तीन प्रमुख वर्गामध्ये गोत्रज असीत किंवा भिन्नगोत्रज असे मृताचे सर्व रक्तासंबंधी समाविष्ट आहेत. त्यांच्याशिवाय नवरा किंवा बायको ही विवाहाने नातेवाईक झालेली व्यक्तीही येते. वरील तीन वर्गातील कोणीही वारस नसल्यास अपवाद म्हणून दुय्यम वारसदार उत्तराधिकारी होतात.
दुय्यम वर्ग : (४) संविदानिर्मित उतराधिकारी (५) अभिस्वीकृत नातेवाईक (६) एकमेव उत्तरदानग्राही (७) वरील (४) ते (६) यांच्या अभावी सरकार.
प्रमुख वर्ग
१) हिस्सेदार :
या वर्गामध्ये मृताचे काही निकटचे नातेवाईक येतात. त्यांना पवित्र कुरणान्वये विनिर्दिष्ट हिस्सा देण्यात आलेला आहे. म्हणून त्यांना प्रमुख वारसदार म्हणतात. नवरा आणि बायको हे विवाहासंबंधाने झालेले नातेवाईक धरून हिस्सेदारांची संख्या बारा आहे.या हिस्सेदारांपेक्षा अवशिष्टग्राही या दुसऱ्या वर्गातील वारसदारांचे स्थान अधिक किफायतशीर आहे. अवशिष्टग्राही अस्तित्वात असतील तर या हिस्सेदारांना त्यांच्या ठरावीक हिश्शापलीकडे मृताच्या संपत्तीत काहीही मिळत नाही. एकाच वेळी अनेक हिस्सेदार अस्तित्वात असण्याचा संभव कमी असतो. या एकूण बारा हिस्सेदारांपैकी आठ हिस्सेदार स्त्रिया आहेत. अनेकदा संपदेचा अधिकांश हिस्सा अवशिष्टयाहींसाठी शिल्लक राहतो. उदाहरणार्थ एक मुसलमान व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या मागे एक विधवा आणि एक मुलगा असे वारसदार असले तर विधवा हिस्सेदार असल्यामुळे तिला १/८, आणि मुलगा अवशिष्टग्राही असल्यामुळे त्याला उर्वरित ७/८ हिस्सा मिळतो.
२) अवशिष्टग्राही :
या वर्गात चार अपवाद सोडल्यास, फक्त गोत्रज पुरुष येतात. उदाहरणार्थ, बाप, बापाचा बाप, त्याचा बाप इत्यादी पुरुष पूर्वज, पुत्र, त्याचा पुत्र, त्याच्या पुत्राचा पुत्र असे स्वतःचे, बापाचे वगैरे पुरुष वंशज, कन्या आणि बहीण वगैरे. मयताची सर्व संपदा हिस्सेदारांचे हिस्से देण्यात संपली तर अवशिष्टग्राही या दुसऱ्या वर्गातील वारसदारांना काहीही मिळणार नाही. हिस्सेदार नसतील तर मृताची सर्व संपदा आणि ते असतील तर विनिर्दिष्ट हिस्सा वजा जाता उरलेली संपदा अवशिष्टयाहींमध्ये विभागली जाते. हिस्सेदार अस्तित्वात असून कोणीही अवशिष्टग्राही नसतील तर सर्व संपदा प्रत्यावर्तनाच्या तत्त्वाने हिस्सेदाराकडे जाते.
दूरचे नातेवाईक
जो हिस्सेदारही नाही आणि अवशिष्टग्राहीही नाही असा नातेवाईक म्हणजे दूरचा नातेवाईक होय. या वर्गात सर्व भिन्न गोत्रज आणि हिस्सेदारांच्या वर्गात येणाऱ्या स्त्रिया सोडून बाकीच्या गोत्रज स्त्रिया यांचा समावेश होतो. हिस्सेदार आणि अवशिष्टयाही नसतील तरच संपत्ती दूरच्या नातेवाइकांकडे जाते.
दुय्यम वर्ग (वारसदार)
यांचे चार प्रकार आहेत. वर उल्लेखलेल्या तीन वर्गातील वारसदार नसतील तर मृताची संपदा दुय्यम वारसदारांकडे जाते. त्यापैकी वरच्या वर्गाचा वारसदार खालच्या वर्गाच्या वारसदाराला अपवर्जित करतो.
४) संविदानिर्मित वारसदारः
हनाफी कायद्याद्वारे संविदेमुळेसुद्धा वारसाधिकार प्राप्त होत होते. मालकाकडून देय असलेला द्रव्यदंड किंवा खंडणी मालकाऐवजी तिऱ्हाईत इसमाने दिल्यास मालकाच्या मृत्यूनंतर तो तिऱ्हाईत इसम त्या संपदेचा मालक होईल अशी संविदा तिऱ्हाईत इसम आणि मालक यांच्यामध्ये झाली तर अशा संविदेखाली वारसाधिकार उत्पन्न होत असे. परंतु आता या प्रकाराला केवळ ऐतिहासिक महत्त्वच राहिले आहे.
५) अभिस्वीकृत नातेवाईक
मुस्लिम व्यक्ती, त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याच्या हयातीत कोणत्याही अज्ञात कुळातील व्यक्तीला आपला वारसदार म्हणून अभिस्वीकृत करू शकतो. त्याला अभिस्वीकृत नातेवाईक म्हणतात. पण ते नाते दुसऱ्याच्याद्वारे असावे लागते, स्वतःच्याद्वारे असता कामा नये. तो तिऱ्हाइताला भाऊ किंवा पुतण्या म्हणून, म्हणजे अनुक्रमे बापाचा मुलगा आणि चुलत्याचा मुलगा म्हणून अभिस्वीकृत करु शकतो, पण तो त्याला स्वतःचा मुलगा म्हणून अभिस्वीकृत करु शकत नाही. अशी अभिस्वीकृत व्यक्ती पाचव्या वर्गाची वारसदार होते.
६) एकमेव उत्तरदानग्राही :
वरच्या वर्गापैकी कोणीही अस्तित्वात नसल्यास, मृत्युपत्रकर्ता आपली सर्व संपत्ती कोणाही व्यक्तीला मृत्युपत्राने दान करू शकतो. अशा व्यक्तीला एकमेव उत्तरदानग्राही असे म्हणतात. मुस्लिम मृत्युपत्रकर्ता व्यक्तीला जर वारसदार असतील तर आपल्या संपतीपैकी १/३ पेक्षा अधिक संपत्तीदानाचे मृत्युपत्र तो करु शकत नाही. त्याला वारसदार नसतील तर तो आपली सर्व संपती मृत्युपत्राने देऊ शकतो.
७) सरकार :
मृत मुस्लिम व्यक्तीला कोणीही वारसदार किंवा उत्तरदानग्राही नसल्यास त्याची संपत्ती सरकार जमा होते. मूळ मुस्लिम विधीखाली अशा परिस्थितीत सदर संपत्ती मुस्लिम समाजाच्या लाभासाठी सार्वजनिक खजिन्यात जमा होते.
मुस्लिम विधवा
मुस्लिम धर्मात विधवेला वारस म्हणून डावलता येत नाही, आपत्यहीन विधवेलाही मयत नवऱ्याच्या मिळकतीत, अंत्यविधी, कर्ज आणि इतर कायदेशीर खर्च भागविल्यानंतर १/४ हिस्सा मिळतो. तथापि, अपत्ये किंवा नातवंडे असलेल्या विधवेला मयत नवऱ्याच्या मिळकतीत, अंत्यविधी, कर्ज आणि इतर कायदेशीर खर्च भागविल्यानंतर १/८ हिस्सा मिळतो. जर एखाद्या मुस्लिम आजारपणात बायकोला घटस्फोट दिला आणि नंतर तो त्या आजारपणात मयत झाला तर त्याच्या बायकोला नवऱ्याच्या मिळकतीत वारस म्हणून हिस्सा मिळतो आणि तिचा हा वारसाधिकार, ती पुनर्विवाह करीत नाही तोपर्यंत चालू राहतो.
वितरणाची आणि अपवर्जनाची तत्त्वे
नियम १ : हिस्सेदार आणि अवशिष्टयाही या दोन वर्गातील कोणीही नातेवाईक नसतील तरच दूरच्या नातेवाइकांकडे वारसा जातो.
नियम २ : दूरच्या वारसदारांत, वंशज, पूर्वज, आणि सांपार्श्विक असे तीन गट आहेत. त्यांच्यापैकी वंशज पूर्वजांना अपवर्जित करतात, आणि पूर्वज सांपार्श्विकांना अपवर्जित करतात.
नियम ३ : वंशजांमध्ये अग्रक्रम खालील दोन नियमांनी ठरविला जातो.
अधिक नजीकचा नातेवाईक अधिक दूरच्या नातेवाईकाला अपवर्जित करतो. कन्येचा पुत्र किंवा कन्येची कन्या यांना पुत्राच्या कन्येच्या कन्येपेक्षा वरचा क्रम मिळतो. कन्येचा पुत्र किंवा कन्येची कन्या हे सर्वांत नजीकचे असे दूरचे नातेवाईक असल्यामुळे ते इतर सर्व दूरच्या नातेवाइकांना अपवर्जित करतात.
एकाच श्रेणीतील अनेक नातेवाईक असतील तर हिस्सेदार आणि अवशिष्टाग्राही यांच्या अपत्यांना दूरच्या नातेवाइकांच्या अपत्यापेक्षा वरचा क्रम मिळतो. उदाहरणार्थ, पुत्राच्या कन्येची कन्या आणि कन्येच्या कन्येचा पुत्र यांच्यामध्ये पुत्राच्या कन्येची कन्येला वरचा क्रम मिळतो. याचे कारण तिची आई म्हणजे पुत्राची कन्याही हिस्सेदार आहे, तर दुसऱ्याची आई असणारी कन्येची कन्या ही त्यानंतरची नातेवाईक आहे.
सावत्र अपत्ये : सावत्र अपत्ये आणि सावत्र आईबाप हे एकमेकांचे वारसदार होत नाहीत.
अनौरस अपत्य मुस्लिम धर्मामध्ये अनैतिकता आणि व्यभिचाराला थारा नाही म्हणून विवाहबाह्य अपत्य हे फक्त त्याच्या आईचे अपत्य आहे असे मानण्यात येते. अपत्याला आईचा आणि आईकडूनच्या नातेवाइकांचा वारसा मिळतो आणि आई आणि तिचे नातेवाईक यांना अनौरस अपत्यांचा वारसा मिळतो. त्यात पिता आणि त्याचे नातेवाईक आणि अनौरस पुत्र यांच्यामध्ये परस्पर वारसाधिकार मिळत नाही. एका स्त्रीला औरस आणि अनौरस पुत्र असतील तर अनौरस पुत्र औरस पुत्राचा वारस होऊ शकत नाही असे अलाहाबाद (प्रयागराज)उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुस्लिम धर्मामध्ये स्त्रीला महत्त्वपूर्ण स्थान असल्याने पित्याप्रमाणे आईलाही काही झाले तरी हिस्सा मिळतोच. तसेच मुलगी देखील वारसदार होते व तिला देखील हिस्सा मिळतो. एकच कन्या असेल तर तिला १/२ हिस्सा मिळतो. पण दोन किंवा अधिक कन्या असल्यास त्यांना सर्वांना मिळून २/३ हिस्सा मिळतो.
बहीण
बहिणीच्या अस्तित्वामुळे कन्या अपवर्जित होत नाही. मृत मुस्लिम व्यक्तीस एक कन्या आणि एक बहीण असल्यास कन्येला हिस्सेदार म्हणून तिचा १/२ हिस्सा आणि बहिणीला उत्तरदानयाही म्हणून १/२ हिस्सा मिळतो. त्याचप्रमाणे दोन कन्या आणि दोन बहिणी असल्यास, दोन कन्यांना मिळून २/३ हिस्सा, हिस्सेदार म्हणून मिळतो.
पुत्राची कन्या
पुत्र किंवा कन्या यांच्यापैकी कोणीही नसेल तर पुत्राच्या कन्येला १/२ हिस्सा, आणि पुत्राच्या दोनपेक्षा अधिक कन्या असतील तर त्यांना २/३ हिस्सा मिळतो. मात्र काही परिस्थितीत पुत्राच्या कन्येचा हिस्सा १/६ होतो आणि समान पुत्राचा पुत्र असल्यास ती अवशिष्ट्याही होते. पण पुत्राची कन्या आणि पुत्राची कन्येची कन्या असल्यास त्यांना मिळून २/३ हिस्सा मिळतो.
सहोदर भाऊ किंवा सहोदर बहीण
हे प्राथमिक वारसदार नव्हेत. त्या दोघांनाही प्रत्येकी १/६ हिस्सा मिळतो. दोन सहोदर भाऊ किंवा सहोदर बहिणी असल्यास सहोदर भावाचा १/३ आणि सहोदर बहिणीचा १/३ हिस्सा असतो. दोन सहोदर भावांमध्ये वारसाधिकार उत्पन्न होण्यासाठी ते दोघेही औरस असावे लागतात. एका स्त्रीला एक औरस आणि एक अनौरस असे दोन पुत्र झाले तर ते दोघे सहोदर भाऊ होत नाहीत आणि ते एकमेकांचे वारसदार होत नाहीत.
पती, पत्नी, बाप, आई आणि कन्या हे प्राथमिक वारसदार असून ते कधीही संपूर्णतः अपवर्जित होत नाहीत. काही बाबतीत त्यांचा हिस्सा वाढतो किंवा ते अवशिष्टग्राही होतात.
हिस्सेदार किंवा अवशिष्टग्राही यांच्यापैकी कोणीही वारस असल्यास दूरचे वारसदार अपवर्जित होतात. याला अपवाद पती आणि पत्नी. ते असले आणि हिस्सेदार आणि अवशिष्टग्राही यांच्यापैकी दुसरे कोणीही वारस नसले तरी पतिपत्नीचे हिस्से वजा जाता बाकी संपदा दूरच्या वारसदारांकडे जाते.
: bvberule@gmail.com (लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.