
Agriculture Market :
शेतीमालाचा वायदेबाजार
फ्यूचर्स किमती :
सप्ताह १३ ते १९ जानेवारी २०२४
ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे कापूस, मका, मूग, सोयाबीन व कांदा यांच्या आवकेचे मुख्य महिने. उत्पादनाचे अंदाज येण्यास उशीर लागतो. मात्र आवकेवरून त्याचा अंदाज करता येतो.
तुरीचा आवक हंगाम आता सुरू झाला आहे. १२ जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात एकूण १४ राज्यांतील बाजार समित्यांत आवक झाली. त्यात महाराष्ट्र (४८ टक्के) व कर्नाटक (२५ टक्के) ही राज्ये आघाडीवर होती.
त्याखालोखाल तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश ही राज्ये महत्त्वाची होती. महाराष्ट्रात लातूर, जालना, सोलापूर, वाशीम, औरंगाबाद व बुलडाणा या जिल्ह्यांतील आवक सर्वाधिक होती. यंदा काहीशी लवकर आवक सुरू झाली आहे.
तुरीच्या किमती नोव्हेंबर महिन्यापासून कमी होत असल्या तरीही त्या रु. ८,२०० च्या खाली गेल्या नाहीत. आवकेचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर त्या वाढत आहेत. या सप्ताहाअखेर त्या रु. ८,७८४ वर आल्या आहेत.
तुरीच्या संभाव्य कमी उत्पादनाची भीती या पाठीमागे आहे. किमती अधिक वाढू नयेत म्हणून शासनाने इतर देशांकडून आयातीचे करार केले आहेत. त्यात मोझांबिक (२ लाख टन), मालावी (०.५ लाख टन) व म्यानमार (१ लाख टन) यांचा समावेश आहे. तसेच सरकारचे देशांतर्गत बाजारात हमीभावाने तूर खरेदीचे नियोजन आहे.
या सप्ताहात मका, सोयाबीन व कांदा यांचे भाव घसरले. हळदीचे फ्यूचर्समधील भाव लक्षणीय वाढले. १९ जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात रु. ५५,२८० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ०.१ टक्क्याने वाढून रु. ५७,४४० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,३७८ वर आले आहेत.
फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६० वर कायम आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १३.२ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव आणि फेब्रुवारी व एप्रिल भाव यापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात २.२ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,२३९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,२६५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती १.१ टक्क्याने वाढून रु. १३,०२३ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १३.७ टक्क्यांनी वाढून रु. १४,७१६ वर आल्या आहेत. जून किमती रु. १४,७९२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १३.६ टक्क्यांनी जास्त आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात रु. ५,५०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.३ टक्क्याने वाढून रु. ८,८७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात २.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,८१० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. ८,४३३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ८,७८४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,६८२ होती; या सप्ताहात येथील किंमत रु. १,४२० वर आली आहे. आवक वाढती आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,५०० वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,५२० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.