Soybean Crop Damage : सोयाबीन, भाजीपाल्यावर गोगलगायींचा प्रादुर्भाव, पाचशेपेक्षा अधिक वनस्पतींचा फडशा

Infestation Of Snails : शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील भाजीपाला पिकासह सोयाबीनवर गोगलगाय व शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Soybean Crop Damage
Soybean Crop Damageagrowon
Published on
Updated on

Infestation Snails Shirol : शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील भाजीपाला पिकासह सोयाबीनवर गोगलगाय व शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाकडून उपाययोजनेच्या सूचना दिलेल्या असल्या तरी गोगलगायीचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित होईना असे दिसून येत आहे.

सततचे ढगाळ, दमट आणि पावसाळी वातावरण गोगलगायींच्या पैदासीसाठी अनुकूल असल्याने त्यांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. पंधरा दिवसांत पूर ओसरल्यानंतर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढत आहे.

गोगलगाय ही बहुभक्षी आहे. ती पाचशेपेक्षा अधिक वनस्पतींचा फडशा पाडते. त्याने केलेले नुकसान लवकर कळूनही येत नाही. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, पपई, वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या, फळझाडे आदी वनस्पतींची पाने, फुलांना छिद्र पाडून पाने-फुलांच्या कडा खातात. गोगलगायींचा प्रादुर्भाव केवळ पिकांनाच हानीकारक ठरत नाही तर मानवी शरीरालाही धोकादायक असतो.

सद्य:स्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, भाजीपाला व विविध फळबागांमध्ये गोगलगाय व शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संपूर्ण रोपेच नष्ट होत आहेत. तसेच पूर्ण वाढ झालेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे.

शिरोळ तालुक्यातील दानोळी गावचे शेतकरी सुहास नेजकर म्हणाले की, आम्ही पंधरा दिवसांपूर्वी वांग्यांची रोपे लावली होती. त्यावेळी गोगलगायीचा हल्ला झाला. त्यावेळी आता आहे तेवढा प्रादुर्भाव नसला तरी आम्हाला सातशेपैकी दीडशे रोपांची पुन्हा लागण करावी लागली.

Soybean Crop Damage
Sugarcane Production Kolhapur : उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची भिती

फ्लॉवर उत्पादक शेतकरी स्वप्निल रुकडे म्हणाले की, आमच्या फ्लॉवर पिकात गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. पान, खोड व फ्लॉवरचे गड्डेसुद्धा खात आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. उपाययोजना सुरू आहेत. मात्र, पुन्हा प्रादुर्भाव होतच आहे.

कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भाजीपाल्यावर वाढता प्रादुर्भाव नुकसानकारक असून, कृषी सहायकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या जात आहेत. प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या उपाययोजना कराव्यात. गोगलगायीपासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com