Pune News : कापूस भावातील सुधारणा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत.
पण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती भावाला आधार देणारी असल्याचे बाजारातील अभ्यासक, उद्योग आणि स्टाॅकीस्ट्नी स्पष्ट केलं. त्यामुळं देशातील भावही आणखी वाढू शकतात, असा अंदाज आहे.
सुरुवात करुया कापूस भावापासून. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा क्विंटलमागं १०० रुपयांनी वाढले आहेत. देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा भाव सरासरी ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान पोचला. तर ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या पातळीदरम्यान बाजार राहीला.
तर देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कमाल भाव ७५०० रुपयांच्या पुढे गेला. तर सरासरी भाव ७४०० रुपये देखील मिळतोय. सध्याच्या सरासरी भावात पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच सरासरी भाव ७५०० रुपयांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
मग बाजारातील आवक किती झाली होती? तर आज म्हणजेच शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी बाजारातील आवक होती १ लाख १२ हजार ६०० गाठी. म्हणजेच कालच्या तुलनेत आवक स्थिर होती. आजही महाराष्ट्रातील बाजारातील आवक सर्वाधिक होती. राज्यात ३८ हजार ७०० गाठी कापूस आज शेतकऱ्यांनी विकला.
म्हणजेच देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी महाराष्ट्रातील आवक जवळपास ३५ टक्के होती. गुजरातमध्येही ३६ हजार ४०० गाठी कापसाची आवक झाली होती. म्हणजेच देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी या दोन्ही राज्यांमध्येच ६७ टक्के कापूस विकला गेला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज पुन्हा ९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. रुपयात हा भाव १६ हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल होतो. तर देशातील वायदे ६० हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते.
हे भाव खंडीचे होते. क्विंटलमध्ये हा भाव १६ हजार ९०० रुपये होतो. म्हणजेच वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात कापसाचे भाव समान पातळीवर आले.
तर काॅटलूक ए इंडेक्स म्हणजेच जागतिक बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भाव १००.५० सेंटवर पोचला होता. म्हणजेच १ डाॅलरवर. ए इंडेक्समधील हा भाव कालचा आहे. म्हणजेच गुरुवार २२ फेब्रुवारीचा. कारण ए इंडेक्समधील भाव रात्री येत असतात. आज वायद्यांमध्ये भाव वाढल्यामुळे ए इंडेक्सही वाढला होता, असे अभ्यासकांनी सांगितले.
पण भाव काय राहीला हे रात्रीच कळेल. रुपयात हा भाव होतो १८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल. तर देशातील बाजारात प्रत्यक्ष रुईचे भाव ५७ हजार ते ५८ हजार प्रतिखंडीवर होते. आपण सरासरी ५७ हजार ५०० रुपये भाव गृहीत धरला तर क्विंटलचा भाव होतो १६ हजार १५० रुपये.
जागतिक बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव आणि देशातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव याची तुलना केली तर आजही भारताचा कापूस स्वस्त आहे. किती स्वस्त आहे तर क्विंटलमागं आपला कापूस २ हजार २५० रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे भारताच्या कापसाला असलेली मागणी टिकून आहे. परिणामी भावात सुधारणा दिसून येत आहे.
कापसाच्या भाव सध्याच्या परिस्थितीत आणखी वाढू शकतात. मार्च महिन्यात कापूस ७५०० हजारांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची विक्री बाजाराचा आढावा घेऊन व दोन किंवा तीन टप्प्यात केली तर फायदेशीर ठरेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.