अॅग्रोवन वृत्तसेवा
Papaya Crop : जळगाव ः खानदेशात यंदा कमी दर, नैसर्गिक फटका आदी कारणांमुळे पपई लागवडीसंबंधी शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. रोपांच्या बुकिंगला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लागवड कमी होईल, असेही संकेत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात पपईची लागवड दरवर्षी वाढत आहे. यंदा तेथे ५२०० हेक्टरवर पपई लागवड झाली होती. खानदेशात मिळून सुमारे सात हजार हेक्टरवर पपई पीक होते. यंदाही लागवड वाढेल, असे संकेत होते. परंतु कमी पाऊसमान, पपई दराबाबत सतत तयार होणारा तिढा, कमी उत्पादन यामुळे शेतकरी यंदा लागवडीसंबंधी नाराज आहेत.
पपई लागवडीसंबंधी रोपांची बुकिंग सुरू आहे. विविध कंपन्या, रोपवाटिकाचालक त्याबाबत प्रचार, प्रसिद्धी करीत आहेत. ‘१५ नंबर’ व ‘तैवान ७८६’ या पपईच्या रोपांच्या वाणांची नोंदणी पुरवठादार करीत आहेत. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही त्यासंबंधी काही रोपवाटिकाचालक नंदुरबार, धुळ्यात कार्यवाही करीत आहेत.
तसेच जळगावातही स्थानिक रोपवाटिकाचालक रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. या महिन्यात नोंदणी केल्यास फेब्रुवारीत रोपांचा पुरवठा केला जाईल. तर पुढील महिन्यात आगाऊ नोंदणी केल्यास रोपांचा पुरवठा मार्चअखेरीस केला जाईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, यंदा कमी पाऊसमान राहिल्याने नंदुरबार, शहादा, जळगावमधील जळगाव, चोपडा भागातील पपईची लागवड कमी होणार आहे. परिणामी रोपांचे दर यंदा घसरले आहेत किंवा त्यात वाढ झालेली नाही. खानदेशातील अनेक पपई उत्पादकांनी बीड, धाराशिव, सोलापूर, जालना भागातही पपई रोपांची आगाऊ नोंदणी केली आहे.
पपई रोपांचे दर १० ते १२ रुपये ‘१५ नंबर’च्या एका रोपासाठी आहेत. तर ७८६ वाणासंबंधीचे दर १३ ते १६ रुपये प्रतिरोप आहेत.
शेतकरी दोन्ही प्रकारच्या वाणांची आगाऊ नोंदणी करीत आहेत, परंतु त्यास यंदा कमी प्रतिसाद आहे. पपईचे दर यंदा सुरवातीला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो होते. नोव्हेंबरमध्ये सरासरी दर २५ रुपये प्रतिकिलो जागेवर मिळाला. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिकिलो सरासरी नऊ रुपये दर मिळाला. मागील १० दिवसांत सरासरी दर जागेवर चार रुपये प्रतिकिलो मिळाला आहे. दरात मोठी घसरण झाली आहे.
खरेदीदारांच्या मनमानीमुळे दराला फटका
दिवाळीच्या काळात दर ३५ रुपये प्रतिकिलो होते. तर काही शेतकऱ्यांना ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाले होते. परंतु खरेदीदार खानदेशात मनमानी करीत आहेत. दर पाडण्याचे काम खरेदीदारांची लॉबी करीत आहे.
त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय, प्रशासन, बाजार समित्या आदी कुणाचेही नियंत्रण नाही. यामुळे पपई उत्पादकांचे नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.