Indian Agriculture : वारा, पाऊस, पिके वारी अन् पांडुरंग

Crop Management : ‘तुझ्या येण्याची चाहूल, लागे पानापानामंधी, देवा तुझं येनंजानं, वारा सांगे कानामंधी’, शेतकरी पिकांना जोजवतो म्हणूनच त्याला अगोदर पांडुरंग कळतो.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture Update : काळीभोर माती आणि तसाच पांडुरंग आवडू लागले, रानात आजही प्रत्यक्ष राबत असल्यामुळे मातीशी आणि पांडुरंगाशी आत्मिक नाते अबाधित आहे. मी चौथीत असताना माझ्या आजोबांनी मला-आईला आणि सगळ्या गणागोताला पंढरपूरच्या विठुराया आणि रुक्मिणी माउलीच्या दर्शनासाठी नेले होते.

तेव्हापासून आपला ‘सखा’ पांडुरंग वाटू लागला. त्याचे ‘रूप’ मला जमिनीत दिसायचे. आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वाऱ्या मी स्वतः केलेल्या आहेत. यावर्षी दोन्ही मिळून २६ वर्षे ‘अनुभववारीचे’ होत आहेत. मानसिक आधार आणि शाश्वत विचार समजून घेऊन माझ्या विचारांच्या दिसत्या पारंब्यांना लोंबकळून एकटेच झुलत राहायचे होते.

‘ज्ञानेश्वरी’, ‘गाथा’ आणि ‘भागवत धर्म’ वाचून पुन्हा-पुन्हा आकलन केल्यामुळे माझी मानसिकता प्रबळ केली ती, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई यांच्यासह सर्वच संत साहित्याने. समानता, एकता, साम्यपणा, स्वातंत्र्य, बंधुता, जिव्हाळा, श्रद्धा, व्यापकता आणि व्यासंग आणि पर्यायाने स्वातंत्र्याचा झेंडा एकहाती घेऊन विचारभावाने जगण्यासाठी मला संतांच्या विचारांची पर्वणी सदोदित राहते.

पंढरपुरला चारदा पायी वारी केली. संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज आणि संत गजाननबाबांचा पालखी वारी सोहळा मी एकट्याने चालून अनुभवला. शारीरिक स्थित्यंतरे आणि मानसिक आंदोलने माझ्या वाट्याला आली.

महाराष्ट्राच्या विविध भागातून दिंड्या जात असल्यामुळे मला सतत आवडणारी काळी-तांबडी-मुरमाड-चिकण-पांढरी-लाल माती, माळं, माळावरच्या शिळा, झाडे, पाखरे, प्राणी, गवत, पिके, रानफुले, नद्या, तळे, तुरळक ठिकाणी दिसणाऱ्या झोपड्या आणि एवढेच काय, तर विविध प्रकारची कारखाने आणि माणसं जवळून पाहता आली. त्यांचे अनुभव समृद्ध करून गेले.

Indian Agriculture
Indian Economy : सभोवतीची अर्थव्यवस्था वाचायला कधी शिकणार?

‘ग्यानबा-तुकाराम’ आणि ‘गण गण गणात बोते’, या गजरांच्या नादमयतेमुळे मेंदूत तरंग उठतात. क्षणभर वाटायचे, गजरांच्या शब्दलहरींमुळे आपण तरंगत राहतो. पंढरपुरात मी पांडुरंगाबरोबरच चंद्रभागा, गोपाळपुरा आणि गजाननबाबा मंदिराचे मन लावून निरीक्षण करीत असतो. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भक्त भेटतात. चंद्रभागे वाळवंटी माणसांची दाटी असते. पाण्याच्या बाजूला वाळूत बसले की, भक्तांसारखेच कीर्तनकार आणि माकडवाले, घोंगडीवाले, मळ काढणारे, अनेक सेवाधारी भेटतात.

‘माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी,’ संत ज्ञानेश्वर माउलींच्या वचनाला अनुरूप परभणी जिल्ह्याचे अध्यात्म संचित संत मोतिराम महाराज-संत रंगनाथ महाराज-संत मारुतीराव महाराज आणि संत नथू महाराज यांच्या शतकाच्या वारी परंपरेचे वारकरी माझ्यासोबत वारीला असतात.

वारीचा अनुभव व आनंदाची बचत प्रत्येकाचे आयुष्य सुसंस्कृत करते, हा आपला दाखला आहे. अनेक राज्यातील एवढेच काय देश विदेशातील वारकरी आता पंढरपुरात भेटतात. यापूर्वी मला जर्मनीचा जॉन्सन आणि जेनीला भेटलेले आहेत. यावर्षी आता फलटणच्या पुढे अमेरिकेत स्थायिक अब्राहम आणि जेनेलिया भेटले.

भाषिक भावबंध कमी-अधिक राहिले पण आत्मिकभाव आठवणींचा भाग झाले. माझीही मुलगी श्वेता परदेशात एमबीबीएस करत आहे, हे ऐकून तेही सुखावले. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांच्या ‘सर्व सुख तेथे असे सर्वकाळ, ब्रह्म ते केवळ नांदतसे’, या अनुभूतीचे आम्ही सांगाती झालो. जशी तुळशी माळ मण्यांची गुंफण असते,

तशीच वारी विविध प्रकृतीच्या आणि प्रतिमांच्या माणसांची सचेतन बांधणी असते. देहू-आळंदी-पंढरपूर असा वारीचा पायी प्रवास हा वारकऱ्यांचा श्वास असतो.

महाराष्ट्राच्या किंवा राज्याच्या बाहेरून येणाऱ्या अनेक दिंड्या पायी चालतच पंढरपुरात येतात. सर्वात्मकता यालाच म्हणतात. ‘मी विठ्ठलाचा आहे आणि विठ्ठल माझा आहे’ या समान पातळीवर एकरूप होऊनच आम्ही नित्यनेमाने दिंडीत चालत असतो. काळजाच्या आतील आवाज ‘ग्यानबा-तुकाराम’ गजर करीत, भक्तीच्या जिव्हाळ्याने सर्वांसोबत ‘माउली’चा आचार प्रत्यक्ष असतो.

घरी ‘आई’ उच्चारणारा माणूस वारीत माणसाला आणि धर्मपत्नीलाही ‘माउली’ संबोधतो आणि मानतो. माणसा-माणसाला ‘माउली’ उपाधी जगातल्या कोणत्याही विद्यापीठात साध्य होणार नाही, ती वारीतच सफल होते. दर्शनाच्या अगोदर चंद्रभागेत अंघोळ करावी, असा एक परिपाठ आहे.

जीवनातील पापं धुण्यासाठी नव्हे, तर मनात कोणतेही पाप येणारच नाही; त्यासाठी त्या जीवनदायी पाण्यात डुंबावे; हा त्याचा सार आहे. जो तो विचाराने आणि भावनेने चंद्रभागेच्या डुबकीकडे पाहतो. मत मतांतरे असू शकतात. पण पाणी निर्मळच आहे.

वारीला येणारी माणसं सामान्य असतात. पण ती कष्टाचं आणि इमानदारीचं असामान्य जीवन जगत असतात. काही लोकांचा प्रश्न असतो किंवा काही लोक मला म्हणतात, देव तुम्हा लोकांना कळला का? काय सांगाल त्याबद्दल? खरं तर, त्यांचा हा प्रश्न चिकित्सेचा की टीकाटिप्पणीचा हेच त्यांना कळत नाही.

बहिणाबाई वाचत असताना देवाबद्दल सांगितलेले मी त्यांना बहिणाबाईंच्या शब्दांत सांगत आहे, ‘सदा जगाच्या कारणी, चंदनापरी घसला, अरे, सोतामंधी त्याले, देव दिसला दिसला’, आपण जर चांगल्या लोकांसाठी जाऊ द्या; स्वतःसाठी जरी झिजलो तरी देव आपल्यात दिसतो. यावर मग विद्वान थंडगार होतात. दुसरी गोष्ट, समस्त शेतकऱ्यांसाठी वारा, पाऊस, पिके आणि पांडुरंग हे एक नातं आहे.

‘तुझ्या येण्याची चाहूल, लागे पानापानामंधी, देवा तुझं येनंजानं, वारा सांगे कानामंधी’, शेतकरी पिकांना जोजवतो म्हणूनच त्याला अगोदर पांडुरंग कळतो. सगळ्यात महत्त्वाचे, सगळेच कष्ट करतात. पण त्यातही खरे-खोटेपणा असतो. आपण आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे.

म्हणूनच बहिणाबाईंचे म्हणणे आहे, ‘ज्याच्या हाताला घट्टे, त्याला देव भेटे’, ही खूण पटल्यावर पुन्हा देवाविषयी काहीही बोलायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या हाताला घट्टे असतात म्हणून तो देवाच्या अधिक जवळ आहे. तो भूदेव आहे. देव इथेच आहे. आता नीट कळलं ना!

Indian Agriculture
Indian Politics : एकी होतेय, नेकीने लढतील का?

वारीच्या वाटेने निसर्गाची विविध रूपं, बदलत्या शेतीची साक्ष, सुखदुःखापेक्षाही समाधानासाठी आणि सात्त्विकता अंगी मुरवण्यासाठी आपली तत्त्वं जपत वैष्णव शिस्तीने आणि संयमाने एकात्मता जपतात. राहुट्यात विसावणारी माणसं पंगतीला एकत्रच भोजन करतात. समभाव इथे नांदतो.

वारकरी भगव्या पताकांतून आशावाद जिवंत ठेवतात. माउलींच्या डोक्यावरील तुळशीचे घट शुद्ध ऑक्सिजन पुरवतात. ऑक्सिजनच्या सिलिंडरपेक्षा हे तुळशीचे घट अधिक महत्त्वाचे आहेत. वारकऱ्यांचा वेश आणि कपाळावरील टिळा सोज्वळपणाचा भाव दाखवतो. टाळ-वीणा-मृदंग वाद्यं संवेदनशीलता जपतात. एकूणच वारी उज्ज्वल जीवनाचा हरिपाठ आहे.

संत तुकाराम महाराज बजावतात, ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी... काय करावी साधनें, फळ अवघेचि तेणें’, पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले की, मोक्षाची इतर साधने कशाला लागतात? आपणांस सर्व फळ मिळते. म्हणूनच वारी व वारकरी अभंग आहेत.

(लेखक रानमेवा शेती-साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com