Indian Politics : एकी होतेय, नेकीने लढतील का?

Opposition Party Meeting Patna : विरोधक एकसंघ होत असले, तरी सतरा विरोधी पक्षांतील लोकसभेतील सदस्यांची आकडेवारी भाजपच्या ५० टक्केही नाही. त्यामुळे भाजपच्या चक्रव्यूहाला ही महाआघाडी भेदणार का, असा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र ऐक्याच्या प्रयत्नांची दखल भाजपला घ्यावी लागते आहे, हेही अर्थपूर्ण आहे.
Opposition Party Meeting Patna
Opposition Party Meeting PatnaAgrowon

Politics Update : शुक्रवारी पाटणा येथे भाजपविरोधी सतरा पक्ष नेत्यांची बैठक झाली. २०१९ मध्ये एकीचे बळ नसलेल्या या विरोधकांना भाजपने चारही मुंड्या चीत केले होते. एकी नसली तरी प्रमुख विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात चार वर्षांपासून ‘संविधान खतरे में है’ असा टाहो फोडला आहे. ‘‘भाजपला रोखले नाही तर पुढे निवडणुकाही होणार नाहीत’’, असे भाकित ते व्यक्त करीत आहेत.

विचारधारा वेगळी असली तरी सगळ्यांचा आजार केवळ ‘भाजप’ असल्याने विरोधकांनी अंतर्गत रुसवेफुगवे दूर सारत एकीचे पहिले पाऊल उचलले. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीश कुमार यांच्या हालचाली सुरू होत्या. सध्या १७ राजकीय पक्ष एकत्रित आलेले दिसतात.

या सगळ्या पक्षांची ताकद पाहिली तर देशातील राजकीय पटलावर चमत्कार घडविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रश्‍न हा आहे, की त्यासाठी सगळ्यांना निष्ठेने लढावे लागेल. हे घडेल? सामूहिकरीत्या ठरवले गेले तरी मोदीविरोधातील चेहऱ्याला स्वीकारण्याइतके अनुकूल वातावरण देशात सध्या दिसत नाही.

त्यामुळे विरोधकांना पैलतीर गाठायचे असेल, तर कर्नाटकाप्रमाणे मुद्यांवरच लढावे लागेल. विरोधकांनी वापरलेले हेच सूत्र डबल इंजिन सरकारची पोलखोल करीत आली आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या मुख्य राष्ट्रीय पक्षासह लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, नितीश कुमारांचा जनता दल (संयुक्त), ममता बॅनर्जींची तृणमूल कॉंग्रेस, स्टॅलिन यांचा द्रमुक, केजरीवालांचा ‘आप’, अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी, हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, सीताराम येचुरी यांचा माकप, डी. राजांचा भाकप, ओमर अब्दुलांची नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्तींची पीडीपी, दीपंकर भट्टाचार्यांचा सीपीआय-एमएल आदींचा वज्रमुठीत समावेश आहे.

Opposition Party Meeting Patna
Politics News : पाटण्यात पंतप्रधान मोदींच्या विरोधात विरोधक एकवटले

३४ प्रमुख नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली. पहिल्या बैठकीत सगळे मुक्तपणे बोलले. काहींनी पोटातले मळभ ओठांत आणले. मात्र सगळ्यांनी एकसुरात मान्य केले, ते म्हणजे भाजपविरोधात एकीने लढायचे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’नंतर अडगळीत जाण्याची चिन्हे दिसणाऱ्या कॉंग्रेसला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

हिमाचल प्रदेश आणि अलीकडे कर्नाटक भाजपच्या हातून हिसकावला. देशातील विविध भागांतून कॉंग्रेसच्या बाजूने कौल यायला लागले आहेत. अशाही स्थितीत राहुल गांधी हे आपसांतील मतभेदांमध्ये गुरफटून न राहता लवचिक राहण्याचे धोरण मांडत भाजप विरोधातील एकजुटीला महत्त्व देत आहेत.

त्यामुळे विरोधकांचा पाटण्यातील ‘जोड’ मजबूत असेल. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सतत थयथयाट असतो. त्यांचे कोणासोबत सख्य होत नाही. प. बंगालमध्ये कॉंग्रेस हे आपले गणित बिघडवत असल्याचा दीदींचा आरोप असतो. आता त्यांच्यातील बदलही लाक्षणिक आहे. प्रत्येकाने मोठ्या मनाने एकत्र आले नाही तर त्याचा फायदा भाजपला होईल, असे सांगताना त्यांना प.बंगालमध्ये कॉंग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

विरोधकांच्या एकोप्यामध्ये प्रादेशिक पक्षांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे पाठबळ असल्याशिवाय या पक्षांना भाजपला धोबीपछाड देता येणार नाही, हे वास्तव आहे. येत्या १२ जुलैला महाआघाडीची सिमल्यात दुसरी बैठक होत आहे.

तेव्हा चित्र स्पष्ट होईल. जागांच्या वाटाघाटी करताना या पक्षांचा कस लागणार आहे. किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल. आपल्याला कमीअधिक जागा मिळतात, याचे दु:ख न करता भाजप विरोधात एकच उमेदवार लढविण्याची यशस्वी रणनीती आखण्याचे कौशल्य साध्य करावे लागेल. मतदारांच्या मनाचा ठाव घेणारे नावही या आघाडीला द्यावे लागेल.

सगळे प्रश्‍न निस्तरतील; परंतु केजरीवालांना कसे सांभाळायचे? हा प्रश्‍न विशेषत: कॉंग्रेसपुढे राहील. ते स्वभावाने दीदींपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या मनासारखे झाले नाही. तर त्यांची मुलूखमैदानी तोफ सुरू होते. संयमाचा त्यांच्यात अभाव आहे.

पत्रकार परिषदेला ते थांबले नाहीत. दिल्लीतील वटहुकमाच्या मुद्यावरून कॉंग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने केजरीवाल नाराज आहेत. केजरीवालांच्या पक्षाला अलीकडेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, तेव्हापासून त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. पंजाब आणि दिल्लीतून कॉंग्रेसला पळवून लावलेल्या केजरीवालांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आकड्यांचे गणित!

विरोधक एकसंघ होत असले, तरी सतरा पक्षातील लोकसभेतील सदस्यांची आकडेवारी भाजपच्या ५० टक्केही नाही. त्यामुळे भाजपच्या चक्रव्यूहाला ही महाआघाडी भेदणार का, असा प्रश्‍न निर्माण होतो. महाआघाडी पक्षांचे ११ राज्यांमध्ये सरकार आहे. २०१९ मध्ये या पक्षातील १४२ खासदार लोकसभेत गेलेत. तर एकट्या भाजपचे ३०३ होते.

राज्यसभेत या पक्षाचे ९४ खासदार आहेत. विरोधकांच्या उमेदवारांना लोकसभेत २२.३ कोटी मते मिळाली होती, त्यात ११.९४ कोटी मते एकट्या कॉंग्रेसची आहेत. भाजपला २२.९ कोटी मते होती. मतांच्या आकड्यात पाहिले तर सामना बरोबरीचा आहे. भाजपच्या विरोधात एकास एक हे विरोधकांचे सूत्र जुळून आले, तर भाजपसाठी धोक्याची घंटा असेल.

२०१९ मध्ये १४१ जागा कॉंग्रेसने थेट लढतीत हरल्या. तेव्हा अन्य पक्षांनी मते घेतल्याने भाजपला मदत झाली. वज्रमुठीच्या समीकरणात कॉंग्रेसला यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा आपल्याकडे ओढता येतील. कॉंग्रेस वगळता जवळपास ९५ जागा अशा होत्या, की विरोधकांनी आघाडी नसल्याने गमावल्या होत्या.

त्या भाजपकडे जाण्यापासून थोपविण्याचे विरोेधकांना नियोजन करता येणार आहे. या बैठकीत असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पं. बंगाल या राज्यांत लोकसभेच्या १८६ जागा आहेत. त्यातील भाजपकडे ११३ आहेत. आघाडीमुळे आकड्यांची बरीच उलथापालथ होईल. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हरयाना, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे भाजपचा थेट सामना कॉंग्रेससोबत होतो.

Opposition Party Meeting Patna
News Parliament Inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्‍घाटनावरून विरोधक आक्रमक

पाटण्यातील हा मजबूत जोड सिमल्याच्या बैठकीत मतभेद विसरत ठोस निर्णयाप्रती आला, तर या राज्यांतील चित्रही बदललेले दिसेल. त्यामुळेच पुढच्या बैठकीची जबाबदारी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सतरा पक्ष एक येत असले, तरी नवीन पटनायक, ओवेसी, चंद्राबाबू नायडू, मायावती, केसीआर, जगन रेड्डी यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट नाहीत. यातील भाजपकडे कोण जातात, तेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एक मात्र झाले, विरोधकांच्या बैठकीने भाजपची चिंता वाढवली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना जम्मू- काश्‍मीरमध्ये व्यग्र असतानाही हे ‘फोटोसेशन’ होते अशी प्रतिक्रिया द्यावी लागली. एकूणच २०२४ ची लोकसभा निवडणूक ही चुरशीची ठरणार आहे. भाजपसाठी आणि विरोधकांसाठीही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com