
Pune News : जागतिक अन्न सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात कृषी निविष्ठा क्षेत्राचा वाटा सर्वांत मोलाचा राहील. तसेच या वाटचालीत भारत यापुढे महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सूतोवाच भारतीय कीडनाशके उत्पादक व घटक मिश्रण उत्पादने संघटनेने (पीएमएफएआय) केले आहे.
देशाच्या कीडनाशके उद्योगाची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘पीएमएफएआय’ने अलीकडेच दुबईत घेतलेल्या आंतरराष्ट्रीय पीक शास्त्र परिषद व प्रदर्शनाला (आयसीएससीई दुबई - २०२५) प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वेळी नामांकित तज्ज्ञांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. या दोनदिवसीय परिषदेत जगभरातील नामांकित १०९ कंपन्या सहभागी झाल्या. तसेच पीक संरक्षण क्षेत्रातील विविध देशांमधील शास्त्रज्ञ, संशोधक, जैव उत्पादक निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे तज्ज्ञ असे एक हजाराहून अधिक प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
‘पीएमएफएआय’चे अध्यक्ष प्रदीप दवे यांनी उद्घाटनपर भाषणात भारतीय पीक संरक्षण क्षेत्राचे महत्त्व विषद केले. ‘‘जागतिक अन्नधान्याच्या उत्पादनाच्या भारताची भूमिका यापुढेही मोलाची असेल. तसेच फलोत्पादन व कृषी उत्पादनात पीक संरक्षण उत्पादनांचे स्थान मोठे राहील. भारतीय कृषी निर्यातीमधील वाढ आणि भारतीय कृषी रसायने क्षेत्राच्या विकास गौरवास्पद आहे. त्यात ‘पीएमएफएआय’चे योगदान मोठे आहे,’’ असेही ते म्हणाले.
इंडो-आफ्रिकन फायटो सॅनिटरी कौन्सिलचे समन्वयक डॉ. सॅलिओ निस्से यांनी, आफ्रिका खंडासहित अनेक देशांच्या आर्थिक विकासात व परकीय चलन प्राप्तीत नगदी पिके आणि फलोत्पादनाचा वाटा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. ‘‘जगाने निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयांची प्राप्ती तसेच भूक, दारिद्र्य यावर मात करीत जागतिक व्यापार वाढीसाठी कृषी क्षेत्राला मजबूत करण्याशिवाय तरणोपाय नाही,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत जगातील नामांकित कंपन्यांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. जागतिक व्यापारात चीनने आणलेल्या ‘चायना प्लस वन’ या धोरणाबाबत नेमका आभास आणि सत्य काय आहे, याविषयावर परिषदेत चर्चा झाली.
‘उर्वरित कीडनाशक अंशमुक्त एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावरदेखील विविध देशांमधील नामांकित अभ्यासकांनी मते मांडली. या परिषदेनंतर ‘पीएमएफएआय’च्या ‘अॅग्रीकेम अॅवॉर्ड - २०२५’चे दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. या वेळी कीडनाशके उद्योगातील ९०० प्रतिनिधी उपस्थित होते.
‘पीएमएफएआय’चे यंदाचे पारितोषिक मिळालेल्या कंपन्यांची नावे अशी :
टाग्रोस केमिकल्स इंडिया, इंडोफिल, अॅग्रो अलाइड व्हेंचर, जनरल क्रॉप सायन्स, संध्या ऑर्गेनिक केमिकल्स, बीट्रस्ट इंडस्ट्रीज, रत्नाकर इंडिया, धानेशा क्रॉप सायन्स, सनशिव बोटॅनिक्स, इन्सेक्टिसाइड्स इंडिया, पंजाब केमिकल्स अॅण्ड क्रॉप प्रोटेक्शन, सुप्रिम सरफेक्टन्ट्स, जीवन केमिकल्स, एकोपाक इंडिया, सफेक्स केमिकल्स, बेस्ट अॅग्रो लाइफ.
विशेष नावीन्यपूर्ण कामकाजाबद्दल पारितोषिक मिळालेल्या कंपन्या :
बायोफिज अॅग्रीटेक, सुप्रिम सरफेक्टन्ट्स, जेनक्रिस्ट बायो, टाग्रोस केमिकल्स, इंडिया पेस्टिसाइड्स.
सामाजिक दायित्व क्षेत्रातील विशेष पारितोषिके मिळालेल्या कंपन्या :
एचपीएम केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स, परिजित इंडस्ट्रीज, जिओ लाइफ अॅग्रीटेक.
दोन दशकांपासून यशस्वी उद्योग चालविल्याबद्दल पारितोषिके मिळालेल्या कंपन्या :
भगिराधा केमिकल्स, एचपीएम केमिकल्स, इंडोफिल, वर्षा बायोसायन्स, परिजित इंडस्ट्रीज यांना, तसेच टाग्रोस केमिकल्स यांना ग्लोबल कंपनी वीर अॅवॉर्ड देण्यात आला.
सत नरियन गुप्ता यांना जीवन गौरव पुरस्कार
‘पीएमएफएआय’चा जीवन गौरव पुरस्कार यंदा भारत रसायन लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष सत नरियन गुप्ता यांना बहाल करण्यात आला. तसेच घरडा केमिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक नीलेश कुलकर्णी यांना ‘लीडर ऑफ द इयर’ तर परिजित इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज आनंद यांना ‘इमर्जिंग लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.