भारतात ३ नोव्हेंबर २००६ या दिवशी राष्ट्रीय पर्जन्याधारीत प्रदेश किंवा क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. हे प्राधिकरण स्थापण्यामागील उद्देश साधारणपणे पुढील प्रमाणे होते.
देशामध्ये असणारे अवर्षण किंवा दुष्काळप्रवण क्षेत्र अधोरेखित करून या ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाद्वारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे.
शेती उत्पादकतेस चालना देणे.
त्याद्वारे शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणे.
अवर्षण /दुष्काळप्रवण क्षेत्रातील पीक जैवविविधतेचे संरक्षण करणे.
संपूर्ण देशामध्ये हे प्राधिकरण काम करत असले तरी राजस्थान आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये या कामासाठी निधी मंजूर व खर्च करण्यामध्ये आघाडीवर आहेत. इतके असूनही दुष्काळाची तीव्रता दूर करण्यामध्ये आपणास कुठेतरी अपयश येत आहे. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांमध्ये पिकांच्या सरासरी उत्पादकता ( crop yield) वाढीचा विचार आपल्या लेखामध्ये करणार आहोत.
मुळातच पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्यक्रम हे दुष्काळप्रवण किंवा अवर्षणप्रवण क्षेत्रात घेतले जातात. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांमध्ये जल उत्पादकता वाढल्यानंतर त्याचा उपयोग शेती पिकांसाठी करण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट्ये अधोरेखित केली जातात. जल संकल्प तयार केल्यानंतर उपलब्ध झालेला अपधाव हा सिंचनाद्वारे पिकांसाठी वापरला जातो. किंवा संरक्षित सिंचनासाठी या जलसाठ्यांचा वापर केला जातो.
या प्रदेशातील पर्जन्यमान मुळातच कमी असते. त्यातच आणखी कमी पाऊस झाला तर त्यातून उपलब्ध होणारा जलसाठा पाणलोट विकास कार्यक्रमांतून जपला जाईल. त्या माध्यमातून खरीप अथवा काही अंशी रब्बी पिके घेण्याचा उद्देश साध्य होईल. हा उद्देश किती साध्य झाला, याबाबत पीक उत्पादकता वाढीचा निर्देशांक (Crop Productivity Index, CPI) आपल्याला नेमकी माहिती देतो. हा निर्देशांक काढण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.
n पीक उत्पादकता वाढीचा निर्देशांक ( CPI) = १ (yi/ Yi)
n i =१
n = एकूण घेतलेल्या पिकांची संख्या, yi= i नंबरच्या पिकाचे उत्पादन
Yi= i नंबरच्या पिकाचे मानक ( Crop Yield with standard package of practices)
उदा. एका पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाच प्रकारची पिके घेतली जातात. त्याबाबतचे त्या पिकांचे उत्पादनाचे मानक खालील प्रमाणे.
पीक बाजरी ज्वारी गहू तांदूळ तूर
yi उत्पादन (क्विंटल) १० ८ ११ ५ ३
Yi पीक प्रमाणित मानक (क्विंटल) १२ ९ १२ ७ ५
प्रमाण (yi/ Yi) ०.८३ ०.८८ ०. ९१ ०.७१ ०.६
पीक उत्पादकता
वाढीचा निर्देशांक (CPI) =
CPI = १/५× ( १०/१२ + ८/९ + ११/१२ + ५/७+ ३/५)
= ०.२ = ( ०.८३ + ०.८८ + ०. ९१ + ०.७१ + ०.६)
= ०.२× ( ३. ९३)
=०.७८
या गणितीय सूत्रानुसार एकूण पिकांची उत्पादकता वाढीचा निर्देशांक ० पेक्षा कितीही अधिकचा येऊ शकतो. जेवढी मोठी संख्या तेवढा अधिक उत्पादन वाढीचा निर्देशांक. खरे तर भारतामध्ये सर्वच ठिकाणी कृषी हवामान आधारित संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. त्यात स्थानिक परिस्थितीनुसार पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध असणाऱ्या पिकांच्या प्रमाणित प्रक्रिया पद्धतीनुसार, किती उत्पादन निघते याबाबत आकडेवारी उपलब्ध आहे. अशा संशोधनाचा निश्चित उपयोग क्षेत्रामधील आपल्या पाणलोट परिसरातील उत्पादकता तपासण्यासाठी होतो.
काकडदराची वाढली उत्पादकता
काकडदरा (ता. सेलू, जि. वर्धा) या गावामध्ये सर्वप्रथम या गावच्या २ नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. जलसाठा उपलब्ध झाल्यानंतर काही अंशी संरक्षित सिंचनाद्वारे उत्पादकता वाढल्याचे दिसून आले आहे. काकडदरा गावातील कपाशी उत्पादन एकरी सरासरी ९ ते १० क्विंटल होते, ते सरासरी दोन ते अडीच क्विंटलने वाढले.
गावातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकामध्ये ५ः१ या प्रमाणात तुरीचे आंतरपीकही घेतात. कपाशीसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनातही चांगली वाढ झाली. ५ः१ प्रमाणात तूर घेणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी सरासरी ७० ते ८० किलो तूर उत्पादन मिळत असे, त्यात वाढ होऊन तूर उत्पादन १३० ते १४० किलो या दरम्यान पोचले आहे.
अर्थात, पीकओळीच्या प्रमाणातील भिन्नतेमुळे तूर उत्पादनाचे योग्य मापन करता आले नाही. या ठिकाणी ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने पाण्याच्या योग्य वापरातून पीक उत्पादन वाढीसाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न सुरू आहेत. त्याचे फायदे नजीकच्या काळात दिसतील, अशी अपेक्षा.
उत्पादकता वाढीसोबत शाश्वत पाणी उपलब्धता
हिवरेबाजार (जि. नगर) आणि कडवंची (ता. जि. जालना) या जलसंधारण आणि पुढील नियोजनामध्ये यशस्वी मानल्या जाणाऱ्या गावांची गोष्ट पाहू. या गावांमध्ये जलसंधारणातून पाण्याची उपलब्धता झाली तरी गावाची एकी, शहाणपणा जपल्यामुळे आपल्या पारंपारिक आणि कमी पाण्यावरील पीक पद्धतीमध्ये बदल होऊ दिला नाही.
आहे त्या पिकातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे पडेल, या दृष्टीने विचार करण्यात आला. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येण्यास मदत झाली. शिवाय या जलक्षेत्रातील पाणीसाठादेखील टिकून राहिला आहे.
(हा लेख लिहिण्यासाठी प्रा. रामदास बोळगे, इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे; निखिल आंबुलकर, भूषण कडू, दौलत घोरणाडे, पाणी फाउंडेशन, जि. वर्धा यांची मोलाची मदत झाली आहे.)
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.)
डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.