Urad Farming : व्यवस्थापनातून वाढविली उडदाची उत्पादकता

Urad Cultivation : निमगाव गांगर्डा (ता. कर्जत, जि. नगर) येथील दीपक ढगे पाच वर्षांपासून साधारण दोन एकरांवर उडदाचे पीक घेतात. जमिनीची पूर्वमशागत, चांगले उत्पादन देणारा वाण, दोन रोपांत पुरेसे अंतर, बीजप्रक्रिया, खत व अन्य व्यवस्थापनातून त्यांनी उडीद उत्पादन वाढ मिळविली आहे.
Urad Production
Urad ProductionAgrowon

Urad Production Management :

शेतकरी नियोजन

पीक : उडीद

शेतकरी : दीपक ढगे

गाव : निमगाव गांगर्डा, ता. कर्जत, जि. नगर

एकूण क्षेत्र : १२ एकर

उडीद क्षेत्र : २ एकर

निमगाव गांगर्डा (ता. कर्जत, जि. नगर) येथील दीपक ढगे पाच वर्षांपासून साधारण दोन एकरांवर उडदाचे पीक घेतात. जमिनीची पूर्वमशागत, चांगले उत्पादन देणारा वाण, दोन रोपांत पुरेसे अंतर, बीजप्रक्रिया, खत व अन्य व्यवस्थापनातून त्यांनी उडीद उत्पादन वाढ मिळविली आहे. कृषी विभागाने घेतलेल्या उडीद पीक उत्पादन स्पर्धेत ढगे यांनी एकरी ३२ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेत २०२३-२४ या वर्षात राज्यात पहिला क्रमांकाचे बक्षिस मिळविले आहे.

लवकर पेरणी ठरली फायदेशीर

दीपक ढगे सांगतात की, मूग अथवा उडीद हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार १५ जुलैपर्यत पेरणी करता येत असले तरी लवकर म्हणजे १५ जूनपर्यंत पेरणी झाली तर उत्पादन अधिक मिळते, शिवाय रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो असा अनुभव आहे.

मागील काही वर्षांपासून जूनमध्ये पुरेसा पाऊस होत नसल्याने उडदाची पेरणी उशिराने होत आहे. दोन वर्षांपूर्वी पाणी उपलब्ध असल्याने पाऊस लांबला तरी १५ जूनच्या आत पेरणी करून पाणी दिले होते. त्यावेळी लवकर पेरणी केल्याचा फायदा झाला.

Urad Production
Urad Production : पावसाच्या खंडामुळे उडदाच्या उत्पादकतेत घट

पेरणीपूर्व नियोजन

जमीन काळी-मुरमाड प्रतीची आहे. खरिपात उडीद आणि त्यावर उन्हाळ कांदा लागवडीचे सूत्र त्यांनी अनेक वर्षांपासून ठेवले आहे.

उन्हाळ कांद्याची मार्चमध्ये काढणी झाल्यानंतर लगेच नांगरट करून शेत दीड महिना चांगले तापू दिली जाते.

जुन्या पिकांचे शेतातील अवशेष, काडी-कचरा वेचून झाल्यानंतर पाळी, काखऱ्या मारून जमीन भुसभुसीत केली जाते.

पेरणीयोग्य चांगला पाऊस झाल्यानंतर उडीद पेरणी करतात.

Urad Production
Urad Production : एका एकरात यंदा उडदाचे केवळ एक क्विंटल उत्पन्न

लागवड नियोजन

काढणीपर्यंत पिकाची साधारण दीड फुटांपर्यत वाढ होते. त्यासाठी पिकांत हवा खेळती राहणे गरजेचे असते. त्यासाठी पेरणी करताना दोन ओळींत १५ ते १८ इंच व दोन रोपांत ५ ते ६ इंच अंतर ठेवले जाते.

पेरणीसाठी एकरी चार किलोपर्यंत बियाणे लागते. पेरणीसाठी बागायती आणि जिरायती अशा दोन्हींसाठी फायदेशीर असलेले दर्जेदार बियाणे वापरले जाते.

उशिराने पाऊस झाल्यावर उशिरा पेरणी केली तर भुरी रोगाचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पुढे शेंगा आल्यावरही पुरेसे दाणे भरत नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष काळजी घेतो.

पेरणीपूर्वी बियाणास स्फुरद विरळविणारे जिवाणू संवर्धक, ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया केली जाते.

कांद्याचे पीक काढून त्यावर उडदाची पेरणी केली तर एकरी ५० किलो व दुसरे पीक घेतलेले असेल तर एकरी १०० किलो प्रमाणे रासायनिक खते पेरणीवेळी दिली जातात. अधूनमधून शेणखताचा वापर करतात. यंदापासून गोमूत्रापासून बनवलेल्या स्लरीचा वापर करण्याचे नियोजित आहे.

पीक व्यवस्थापन

पीक १० ते १२ दिवसांचे असताना पाने कुरतडणारी पांढरी, तपकिरी माशी, पीक फुलोऱ्यात आल्यावर पाने, फुले कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि शेंगा आल्यानंतर पांढऱ्या भुरीचा प्रादुर्भाव होतो.

उशिराने पेरणी झाल्यावर हा प्रादुर्भाव अधिक असतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. एकूण पीक कालावधीत साधारण ४ फवारण्या घेतल्या जातात.

हेक्टरी बत्तीस क्विंटल उत्पादन

मागील खरिप हंगामात दीपक ढगे यांनी कृषी विभागाच्या पीक उत्पादन स्पर्धेत सहभाग घेतला होता. उडदाचे सर्वसाधारण ८ क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन निघते. मात्र दीपक यांनी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, मंडळ कृषी अधिकारी अमरचंद्र अडसूळ, कृषी सहाय्यक सागर जवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर व्यवस्थापन करत हेक्टरी सुमारे ३२ क्विंटलपर्यंत (एकरी १६ क्विंटल) उत्पादन मिळविले. आणि राज्यस्तरीय पीक स्पर्धेत राज्यात पहिला क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.

दीपक ढगे ९२८४२६९७६५

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com