
Pune News: राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-२ ला मंजुरी दिली आहे. आता या घरकूल योजनेच्या अनुदानातही ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने शासन निर्णय काढून अनुदान वाढीला मंजुरी दिली आहे.
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला होता. महाराष्ट्रासाठी ४ हजार २६० कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता. या योजनेंतर्गत सपाट भागांसाठी प्रति घरकूल १ लाख २० हजार रुपये आणि डोंगराळ किंवा कठीण भागांसाठी १ लाख ३० हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली होती.
पण आता महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ (२०२४-२५ ते २०२८-२९) राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही वाढ झाली आहे. राज्याच्या हिस्स्यातून अतिरिक्त अनुदान ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःचे घर मिळविण्यास मोठी मदत होणार आहे
लाभार्थ्यांना मदत देण्याचा शासन निर्णयही जारी करण्यात आला. अनुदानात वाढ केलेल्या ५० हजार रुपयांपैकी ३५ हजार रुपये घरकूल बांधकामासाठी असतील. तर १५ हजार रुपये पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत सौरऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहेत. मात्र सौरऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना १५ हजारांचे हे अतिरिक्त अनुदान मिळणार नाही.
१९.६६ लाख घरकुलांचे उद्दिष्ट
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी १९.६६ लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गातील लाभार्थ्यांना या निर्णयाचा विशेष लाभ मिळणार आहे.
सर्वांसाठी घरे हे सरकारचे धोरण
"सर्वांसाठी घरे" हे केंद्र शासनाचे प्रमुख धोरण असून, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण, रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण व मोदी आवास योजना अशा विविध उपक्रमांद्वारे केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना मदत करत आहे. या योजना ग्रामविकास विभागामार्फत अंमलात आणल्या जात आहेत.
घर बांधणी आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना
घर बांधकामाचा वाढलेला खर्च आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळण्याबरोबरच सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज सुविधाही मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.