
Chh. Sambhajinagar News : येथील तापडिया नाट्यमंदिर येथे पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन, २०२४-२५ च्या माध्यमातून जिल्ह्यात निवडलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३७ हजार ५४७ जणांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील बालेवाडीतील पंतप्रधान आवास योजना कार्यक्रमात रविवारी (ता. २४) छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरातून शेकडो लाभार्थ्यांनी दृकश्राव्य माध्यमातून बघितला.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, जिल्ह्याचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख, लाभार्थी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री. शिरसाट म्हणाले, की या योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रत्येकाला स्वत:चे घर असावे यासाठी शासन पुढाकार घेत आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. सुलभ शौचालय योजनांचा लाभ घेऊन त्याचा वापर होणे आवश्यक आहे. घरकुल योजनेअंतर्गत आपले स्वप्नातील घर बांधण्याची ही सुरुवात असून भविष्यात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत जाते.
त्यानुसार वाढत्या गरजेनुसार घराचीही नियोजन घर बांधताना करणे आवश्यक असल्याचेही या वेळी शिरसाट यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ॲपमुळे घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे सादरीकरण आणि विविध टप्पे याचे आकलन लाभार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने करून दिले आहे.
या तयार केलेल्या ॲपबद्दल जिल्हा परिषदेचे विशेष कौतुकही पालकमंत्र्यांनी केले. मंत्री सावे म्हणाले, की इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत विविध घरकुल योजनेतून वर्षभरात १५००० घर मंजूर करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र, गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून काम करत आहे.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकुलाबरोबरच शौचालय बांधकाम याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास मीना यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.