Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात एक जून ते २० ऑगस्ट दरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याबरोबरच ४८४ जनावरे या आपत्तीत दगावली असून ५२७ घरांची कमी-अधिक प्रमाणात पडझड झाली. तसेच ५५ गोठ्यांचेही नुकसान झाले.
मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण लहरी व कमीच आहे. असे असले तरी नैसर्गिक आपत्तीत बळी जाणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. यामध्ये अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ पुरात वाहून गेल्याने व अंगावर वादळात गोठा पडून मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या ३४ व्यक्तींमध्ये सर्वाधिक ८ व्यक्ती लातूर जिल्ह्यातील असून त्या पाठोपाठ नांदेड व परभणीतील प्रत्येकी सहा, बीडमधील चार, छत्रपती संभाजीनगर व हिंगोलीतील प्रत्येकी तीन, धाराशिव व जालन्यातील प्रत्येकी दोन व्यक्तींचा समावेश आहे.
या नैसर्गिक आपत्तीत १६ व्यक्ती जखमी झाल्या आहेत त्यामध्ये लातूरमधील चार, जालन्यातील सहा, छत्रपती संभाजीनगरमधील तीन तर परभणी, बीड व धाराशिव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जवळपास ५२७ कच्च्या पक्क्या घरांची कमी अधिक प्रमाणात पडझड झाली. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील पाच व लातूरमधील एका घराची पूर्णतः पडझड झाली. १४९ पक्या घरांची अंशतः पडझड झाली. त्यात धाराशिवमधील सर्वाधिक ९९, लातूरमधील १६, बीडमधील २, जालन्यातील ३ व छत्रपती संभाजीनगरमधील २९ पक्क्या घरांचा समावेश आहे.
३६० कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली. त्यात लातूरमधील २२६, धाराशिवमधील ६०, परभणीतील १० व छत्रपती संभाजीनगरमधील ५६ कच्च्या घरांचा समावेश आहे. ५५ गोठ्यांचीही हानी झाली असून त्यात धाराशिवमधील १३, छत्रपती संभाजीनगर व लातूरमधील प्रत्येकी एका गोठ्याचा समावेश आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.