.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : अतिवृष्टीमध्ये महाड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. पुराबरोबरच सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवते. शहरी व ग्रामीण भागात दळणवळणाचे साधन असलेल्या रस्त्यांवरील महत्त्वाचे चार पूल दरवर्षी अतिवृष्टीमध्ये पाण्याखाली जात असल्याने या भागातील जनजीवन सातत्याने विस्कळित होत आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये रस्ते, पूल अधिक महत्त्वाचे असतानाही आपद्ग्रस्त असलेल्या महाड तालुक्यात अशा पुलांची समस्या अद्यापही कायम आहे.
महाड तालुक्यात सावित्री, गांधारी, काळ व नागेश्वरी या मुख्य नद्या आहेत. या नद्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आले आहेत. पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढले की या पुलावरून पाणी जाते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडते. महाड शहर हे सावित्री, गांधारी नद्यांच्या किनारी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी शहरात पुराचे पाणी येते, शिवाय नैसर्गिक आपत्तीचाही धोका बळावतो. अशा आपत्ती परिस्थितीमध्ये मदत कार्यांसाठी रस्ते व पूल सुस्थितीत असणे व बारमाही वापरात असणे महत्त्वाचे आहे, मात्र आपत्कालीन व्यवस्थापनात या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सावित्री नदीवर शहरात असलेला दादली पूल शहराला इतर भागाशी जोडतो. महाड दापोली व मंडणगड, खाडिपट्टा, विन्हेरे या भागांना जोडणारा सावित्रीवरील दादली पूल अतिवृष्टीत पाण्याखाली जात असल्याने शहरातील संपर्क तुटतो. या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने शहरात पूर आला की या वाहतूक कोलमडते. पुलाजवळ नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
महाड शहरातून महामार्गाला जोडणारा व कायम वर्दळीचा असलेला गांधारी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल नेहमीच पाण्याखाली जातो. गतवर्षी हा पूल अवजड वाहतुकीला बंद करण्यात आला होता. शहरात येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. केवळ शहरच नाही तर तालुक्यातील स्थितीही अशीच बिकट आहे. महाड-म्हाप्रळ मार्गावरील नागेश्वरी नदीवरील रावढळ पुलाची स्थितीही अनेक वर्षे तशीच आहे. या पुलावरूनही सातत्याने पाणी जात असते. त्यामुळे खाडीपट्टा, दापोली व मंडणगड या दोन तालुक्यामधील वाहतूक व्यवस्थेबरोबरच स्थानिक वाहतूक कोलमडते. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. हा रस्ता आता महामार्ग झाल्याने पूलही नव्याने बांधला जाणार आहे.
दुर्गम भागातील मांघरुण-पंदेरी या प्रधानमंत्री सडक योजनेमधील मार्गावर पंदेरीचा कमी उंचीचा पूलही दरवर्षी पाण्याखाली जातो. पावसाळ्यात अशा मार्गावर वारंवर वाहतूक ठप्प होत असते. चार महिने ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांना दूर अंतरावरून पायपीट करत शाळेत व गावात यावे लागते. शेतकऱ्यांची ही गैरसोय होते. आता पुलाजवळ नवीन पूल बांधकाम पूर्णत्वास आले आहे, परंतु हे काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांची ससेहोलपट सुरूच आहे.
दापोलीकडे जाताना रेवतळे येथे अतिशय कमी उंचीचा पूल नव्याने बांधला गेल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलासाठी पावसाळ्यात अडकावे लागत नाही. परंतु उर्वरित पुलांचा प्रश्न या वर्षाही कायम आहे.
या पुलांची कामे प्रस्तावित
सावित्री नदीवरील महाड शहरातील दादली पूल - निविदा प्रक्रियेत
गांधारी नदीवरील शंभरी वर्षे पूर्ण झालेला शहराजवळील ब्रिटिशकालीन पूल - निविदा प्रक्रियेत
नागेश्वरी नदीवरील रावढळ पूल - काम सुरू नाही
काळ नदीवरील पंदेरी पूल - काम पूर्णत्वाकडे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.