Unseasonal Rain : जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिके झाली आडवी

Crop Damage Update : जालना शहरासह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागात मंगळवारी (ता.९) झालेल्‍या बेमोसमी पावसामुळे रब्‍बी पिकांसह फळबागांना प्रचंड तडाखा बसलेला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalna News : जालना शहरासह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागात मंगळवारी (ता.९) झालेल्‍या बेमोसमी पावसामुळे रब्‍बी पिकांसह फळबागांना प्रचंड तडाखा बसलेला आहे. द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहिल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे शेती कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. यंदा दर अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. विशेषत: लागवड केलेला उन्हाळी कांदा बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य आजाराने बाधीत होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : ‘स्वाक्षरी’ नसल्यावरून भरपाई रेंगाळली

मंगळवारी सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने ज्वारी, हरभरा, मका, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणात पसरत असलेली रोगराई शेतकर्‍यांची चिंता वाढविणारी ठरत आहे.

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पसरलेले आहे. मंगळवारी सायंकाळी कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. यात जालना तालुका १२.३, अंबड १३.४, बदनापूर ३०.९ मि.मी. याप्रमाणे सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील कपाशी, ज्वारी, हरभरा, मका, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. बहुतांशी ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतजमिनी चिभडत आहेत. आगामी उन्हाळ्यातील हंगाम डोळ्यासमोर ठेवून जगवलेल्या द्राक्ष फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : जिल्ह्यात अवेळी पावसाने शेतकऱ्यांना धडकी

तसेच जनावरांच्या चाऱ्याची सोय म्हणून पेरणी केलेल्या ज्वारी, मका ही पिके वादळी वाऱ्याने झोडपल्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. यंदा ऐन बहरात असलेली रब्बी पिके बेमोसमी पावसाने उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. दरवर्षीच्या अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस यासारख्या निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकरी कोलमडून गेले आहेत.

दरवर्षी बेभरवशाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा.
भाऊसाहेब गोरे, सरपंच, भिलपुरी खुर्द

बेमोसमीमुळे ज्वारी, गव्हाचे नुकसान

अंबड तालुक्यात मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे रात्री बेमोसमी पावसाने तालुक्यातील भालगाव, भाटखेडा, बोरी, ढालसखेडा, खडकेश्वर, ताडहादगावसह परिसरात हजेरी लावली. त्यामुळे शेतातील ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर भालगावातील शेतकरी काकासाहेब मुळे यांच्या शेतातील ज्वारीही पडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com