Jalkot News : गेली आठ दिवसांपासून तालुक्यात तीन वेळा मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे तालुक्यातील चौदा पैकी नऊ साठवण तलाव शंभर टक्के भरले असल्याने आगामी काळात पाणीटंचाई दूर होणार असली तरी शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात यावर्षी खरिपाची सोयाबीन, मूग, तूर, कपाशी आदी पिके चांगली आली होती. मध्यंतरीच्या काळात पंधरा दिवस पावसाने हुलकावणी दिल्याने पिके वाळू लागली होती. शेतकरी पावसाची वाट पाहत असताना १५ ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. नदी, नाल्यांबरोबरच शेतीत पाणी साचले. यात मूग काढणीत असतानाच ते पावसात वाहू लागले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला.
वांजरवाडा, धालणगाब, होकर्णा, वडगाव, सिंदगी, रावणकोळा, जाळदावाढवणा, मरसांगवी, कुणकी, धामणगाव या भागांतील पिके मुसळधार पावसामुळे पाण्यात गेली. पाच हजार हेक्टवरील पिकांचे प्रशासनाकडून पंचानामे केले आहेत. त्यात (ता. २३) पुन्हा धामणगाव परिसराला पावसाने झोडपले. त्यामुळे या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, तालुक्यात ता. १५ ऑगस्टपासून तीन वेळा मुसळधार पाऊस झाल्याने नऊ साठवण तलाव भरले असून बाकीच्या पाच साठवण तलावांत पन्नास टक्के पाणी पातळी वाढली आहे. पावसाळ्यात पहिल्यांदाच तिरू नदी वाहू लागली आहे.
कहीं खुशी, कहीं गम
धामणगाव, मरसांगवी, वाजरवाडा परिसरातील गावांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतातील माती खरडून गेली आहे. सोयाबीन, मूग धोक्यात आले आहे. एकीकडे खरीप पिके पाण्याखाली गेली असून दुसरीकडे तालुक्यात चौदा पैकी नऊ साठवण तलाव शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे.
तलावातील सध्याचा पाणीसाठा (टक्के)
सोनवळा १००
हाळदवाढवणा १००
जंगमवाडी १००
डोंगरगाव १००
माळहिप्परगा १००
रावणकोळा १००
केकतसिंदगी ४५
चेरा एक ५६
चेरा दोन १००
हावरगा, धोडवाडी १५
गुत्ती एक २१.१५
गुत्ती दोन ११.४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.