Agriculture Story : कृतज्ञता म्हणून पठ्ठ्याने चक्क ट्रॅक्टरच ठेवला बंगल्यावर

Tractor On Bungalow : खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर हीच आपली लक्ष्मी आहे, असे त्यांचे मत आहे. याच प्रेमातून त्यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्यावर चक्क ट्रॅक्टर ठेवून ट्रॅक्टरप्रती आपले अनोखे प्रेम व्यक्त केले आहे.
Tractor On Bungalow
Tractor On Bungalow Agrowon

Agriculture News : अनाळा (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांचे जीवन ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायाने पूर्णपणे बदलून गेले आहे. खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर हीच आपली लक्ष्मी आहे, असे त्यांचे मत आहे. याच प्रेमातून त्यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्यावर चक्क ट्रॅक्टर ठेवून ट्रॅक्टरप्रती आपले अनोखे प्रेम व्यक्त केले आहे.

अशोक यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट, वडील सदाशिव सालगडी म्हणून काम करत. जेमतेम चार एकर जिरायती शेती. त्यातूनही वडिलांनी कसेबसे अशोक यांना आयटीआयचे मोटार मेकॅनिकचे शिक्षण दिले. त्यानंतर स्वतः अशोक यांनी धडपड करून पुणे गाठत एका कंपनीत नोकरी मिळवली. पण अगदी काही दिवसांतच नोकरी सोडून ते पुन्हा गावी परतले. त्यानंतर जेऊर (ता. करमाळा) येथे एका ट्रॅक्टर गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले.

Tractor On Bungalow
Agriculture Success Story : अडीच हजार झाडांची समृद्धी

तिथे वर्षभर काम करत ट्रॅक्टरची सर्व कामे शिकले आणि पुढे स्वतःचे गॅरेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भांडवलाचा प्रश्‍न होता, पण वडिलांच्या पाठबळाने त्यांचा उत्साह वाढला. परिस्थिती बदलण्यासाठी जिवाचे रान केले. सुरुवातीला गावोगाव फिरून ते ट्रॅक्टरची दुरुस्ती करू लागले. त्यानंतर अनाळ्यात दोन गुंठे जागा घेऊन स्वतःचे गॅरेज सुरू केले. दिवसरात्र मेहनत करत शेकडो ट्रॅक्टरची दुरुस्ती केली.

त्यातून त्यांची कौटुंबिक परिस्थिती बदलली. जवळपास १० एकर शेती त्यांनी खरेदी केली. सुसज्ज घर बांधले, आई शकुंतला, पत्नी सौ. कविता यांची साथ यात मोलाची ठरली. मुलगा अमर पदवीचे शिक्षण घेत त्यांना मदत करतो, तर मुलगी आरती बीफार्मसीचे शिक्षण घेत आहे. ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायामुळेच आपली भरभराट झाली, ट्रॅक्टरच आपली लक्ष्मी आहे, ही त्यांची भावना झाली. याच भावनेने त्यांनी चालू स्थितीतील ट्रॅक्टर चक्क बंगल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला.

Tractor On Bungalow
Agriculture Success Story : ‘संघर्ष आहे! पण शेतीतच आयुष्य आहे...’

रोज ट्रॅक्टर स्टार्ट करून दर्शन, मगच होते कामाची सुरुवात

सुरुवातीला सिमेंटचा ट्रॅक्टर बनवून आणण्याची योजना होती. मात्र खराखुरा ट्रॅक्टर असावा, असे वाटल्यामुळे पोलार येथून सव्वा लाखाचा जुना ट्रॅक्टर आणला. त्याची किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सजावट केली. सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च करून ट्रॅक्टर सुस्थितीत आणला.

त्यानंतर पुढे हा ट्रॅक्टर बंगल्यावर ठेवणेही जिकिरीचे होते, त्यासाठी ११ हजार रुपये खर्चून बार्शीवरून क्रेन मागवले. क्रेनच्या साह्याने बंगल्यावर ट्रॅक्टर ठेवला, आता रात्री अंधारातही ट्रॅक्टरचे समोरील दिवे, टप, इंडिकेटर सुरू असते. दररोज सकाळी १०-१५ मिनिटे ट्रॅक्टर स्टार्ट केला जातो, ट्रॅक्टरचे दर्शन घेतले जाते आणि मगच ते कामाला सुरुवात करतात, असे अशोक भिलारे यांनी सांगितले.

...जणू ट्रॅक्टरचा ‘डॉक्टर’

अशोक भिलारे यांनी गेल्या २०-२५ वर्षांत हजारो ट्रॅक्टर दुरुस्ती केले आहेत. कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर असो ते अगदी सहजगत्या आणि नेमकेपणाने काम करतात. दुरुस्तीसाठी ट्रॅक्टर त्यांच्याकडे आल्यानंतर काही क्षणात ते त्याचे कारण आणि त्यावरचे नेमके उत्तर सांगतात.

जणू एखाद्या डॉक्टरप्रमाणे त्यांना त्याचा ‘उपचार’ समजतो. आजही महिन्याकाठी किमान २०० ट्रॅक्टरची ते दुरुस्ती करतात, जवळपास १६ तरुण मुले त्यांच्याकडे काम करतात. त्यांच्या कामाची पद्धती, अनुभवामुळे परंडाच नव्हे, भूम, बार्शी, करमाळा यासह अनेक भागांतून शेतकरी आणि ट्रॅक्टरमालक त्यांच्याकडे आवर्जून येतात.

ट्रॅक्टर हेच माझे सर्वस्व आहे, त्यामुळेच मी घडलो, त्यांच्याप्रति माझी ही कृतज्ञता मला महत्त्वाची वाटते आणि त्याचे खूप समाधानही वाटते.
- अशोक भिलारे, ट्रॅक्टर मेकॅनिक, अनाळा, जि. धाराशिव. ९६८९२६२५०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com