Agriculture Success Story : अडीच हजार झाडांची समृद्धी

Agrowon Diwali Ank : सहज हाती आलेल्या ‘अॅग्रोवन’ने मला शेतीकडे ओढून नेले. खरेतर संपूर्ण शहरी, स्वतःच्या व्यवसायात रुळलेला मी वयाच्या साठीनंतर शेती विकत घेतो काय, त्यात नव्या नव्या कल्पना राबवतो काय, हे माझ्यासाठीही अकल्पितच आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

विजय कुडतरकर

सहज हाती आलेल्या ‘अॅग्रोवन’ने मला शेतीकडे ओढून नेले. खरेतर संपूर्ण शहरी, स्वतःच्या व्यवसायात रुळलेला मी वयाच्या साठीनंतर शेती विकत घेतो काय, त्यात नव्या नव्या कल्पना राबवतो काय, हे माझ्यासाठीही अकल्पितच आहे. २० पेक्षा अधिक प्रशिक्षणे घेतली असून, आज माझ्या शेतीमध्ये लाखी बाग, अडीच हजार झाडांची समृद्धी नांदत आहे.

माझे वडील बाबूराव कुडतरकर हे दिल्ली शहरातील एका मिलमध्ये नोकरीला होते. आई, वडील, एक भाऊ आणि तीन बहिणी असे आमचे कुटुंब दिल्लीतच राहत होतो. या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागावी असाच प्रकार मी पाचवीत असताना घडला. माझ्या आईचे अकाली निधन झाले. आम्हीतर लहानच होतो, पण वडिलांसह सर्वांसाठी मोठाच धक्का होता. या धक्क्यातून सावरण्यापूर्वी दुसऱ्याच वर्षी वडिलांचाही मृत्यू झाला आणि आम्ही पाच भावंडे अक्षरशः पोरकी झालो.

माझे वय अवघे बारा वर्षांचे, तर माझा भाऊ अवघ्या सहा महिन्यांचा होता. दिल्लीतून आम्ही थेट मूळ गाव डामरे (ता. कणकवली) गाठले. गावात आल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावर आली. सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण फोंडाघाट येथे आणि एस.एस.सी.चे शिक्षण कणकवलीत पूर्ण केले. हा चार, पाच वर्षांचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. सुट्टीच्या दिवशी मोलमजुरी करायची, मिळेल ते काम करायचे.पावलापावलांवर अडचणी आणि बिकट स्थिती असली, तरी डगमगलो नाही. चक्क हमालीदेखील केली. पण भावंडाना काही कमी पडू नये, यासाठी प्रयत्न सुरू होते.

Agriculture
PM Kisan : देशभरातल्या शेतकऱ्यांना दिवाळी भेट ! किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता जाहीर

एस.एस.सी. झाल्यानंतर गोवा येथे शिक्षकाची नोकरी करण्याची संधी आली होती. परंतु त्या नोकरीचा विचार न करता अजून शिक्षण घेतले पाहिजे असे कुठेतरी मला वाटत होते. शिक्षणासाठी म्हणून मुंबई येथे राहत असलेल्या चुलत बहिणीकडे गेलो. इंटर सायन्सला प्रवेश मिळाला. ग्रामीण जीवन आणि मुंबईचे शहरी जीवन यामध्ये खूप मोठे अंतर आहे. गावात चार, पाच वर्षे वावरत असल्यामुळे माका, तुका, खयसर अशी मालवणी भाषा अंगवळणी पडलेली. त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर शुद्ध मराठी भाषा शिकण्यापासून सरुवात झाली. तसेच इंग्रजीही यथातथाच होते. पण आपल्यालाही इंग्रजी बोलता आले पाहिजे, अशी जिद्द होती.

त्यामुळे मराठी लवकर शिकलो. परंतु इंग्रजीचा अडसर होता. शिक्षण सुरू असतानाच इंग्रजी भाषा शिकण्यावर भर देत होतो. ती भाषा तरी कानावर पडली पाहिजे असे ऐकल्यानंतर इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. खरे सांगायचे तर इंग्रजी सिनेमांचा नाद लागला होता. पण त्यातून इंग्रजी बोलणे कळू लागले. त्याची भीती कमी झाली. आपणही बोलू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला. शिक्षण सुरू असतानाच नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे जाणवत होते. त्यामुळे त्याबाबत चौकशी सुरू केली.

पण अठरा वर्षे पूर्ण झालेले नसल्याने कुणीही नोकरीला ठेवत नव्हते. एक, दोन वर्षे अशीच गेल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. प्रामाणिकपणे काम करत गेल्याने काही काळातच कंपनीने माझ्यावर एका विभागाची जबाबदारी टाकली. आता त्या विभागाचा प्रमुख झालो होतो. १९७४ मध्ये माझा विवाह झाला. आम्ही भाड्याचे एक घर घेतले होते. पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका होती. दोघांची नोकरी असल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागली होती. याच वेळी पत्नीचा स्वतःचे हक्काचे घर घेण्याविषयी आग्रह सुरू झाला.

बदलापूरला जागा खरेदी केली. तेथे घर बांधले. दरम्यान, दोन मुले झाली होती. दोघेही नोकरी करीत असल्यामुळे मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नाही, अशी स्थिती झाली. मग पत्नीने नोकरी सोडून पूर्णवेळ मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तिने नोकरीचा राजीनामा दिला. दुर्दैव असे की त्याच वेळी नेमकी माझीही नोकरी गेली. मग पत्नीचा दिलेला राजीनामा थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. प्रचंड धावपळीनंतर त्यात आम्हाला यश आले. ती नोकरीत पुन्हा रुजू झाली. या प्रकारानंतर मी नोकरीऐवजी स्वतःचा उद्योग, व्यवसाय करण्याचा निर्धार केला.

Agriculture
Sugarcane Intercropping : उसात कोणते आंतरपीक जास्त फायदेशीर?

बेकरी व्यवसायात बसला जम आता तुम्ही पाहत असलेले बदलापूर आणि त्या वेळचे बदलापूर यात खूप फरक आहे. त्या वेळी बदलापूरचा सगळा चेहरामोहरा ग्रामीणच होता. त्या भागात काय व्यवसाय करायचा, असा प्रश्‍न होता. त्यासंबंधी एका गुजराती व्यक्तीसोबत चर्चा करताना त्याने ‘तुम्ही मराठी माणसे धंदा करू शकत नाही’ अशी टिप्पणी केली. आम्ही कोकणी माणसे मनाने खूप हळवे असतो. त्यामुळेच ‘कोकणची माणसे साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी’, हे गीतही प्रसिद्ध आहे.

पण आम्ही साधी माणसे असलो तरी कुणी आमच्या स्वाभिमानाला धक्का लावला, तर आमच्या इतके ताठ कण्याचे कुणीच नाही. त्यामुळे त्या गुजराती व्यक्तीचे बोल मी आव्हान म्हणून स्वीकारले. पूर्वी नोकरी करत असताना सिनेमासोबत नाटके पाहण्याचे वेड लागले. नाटककार बाळकृष्ण कोल्हटकरांची ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘दुरिताचे तिमीर जावो’, ‘एखाद्याचे नशीब’, ‘मुंबईची माणसे’, ‘विद्या विनयेन शोभते’ अशी अनेक नाटके पाहिली होती.

मानसिक आणि वैचारिक पाया पक्का झाला असल्याने अशा टीकाटिप्पणीने कधी खचलो नाही. बदलापूरमध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत, कोणत्या व्यवसायाची आवश्यकता आहे, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या भागात मिठाई किवा बेकरी प्रॉडक्ट तयार होत नसल्याचे दिसून आले. हीच आपल्याला संधी आहे, असे समजत तो व्यवसाय करण्याचा निर्धार केला. मिठाई, केक यांसह विविध उत्पादने सुरू केली. ग्रामीण भाग असल्यामुळे सुरुवातीला चेष्टा वाट्याला आली.

मात्र माझा माझ्या कर्तृत्वावर आणि प्रामाणिकपणावर विश्‍वास होता. तेव्हा केवळ लहान मुलांचेच वाढदिवस साजरे होत. आतासारखे सर्वांचेच वाढदिवस साजरे केले जात नसत. लोकांमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी दरवर्षी शिक्षकदिनी त्या भागातील बहुतांशी शाळांना मोफत केक द्यायचो. त्या काळी जाहिरात करणे आजच्या इतके सर्रास नव्हते. तसेच सामाजिक माध्यमेही नव्हती.

त्यामुळे सहज साध्या पद्धतीने लोकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवावे लागे. त्याचा मोठा परिणाम झाला. हळूहळू केकची मागणी वाढू लागली. अल्पावधीत बदलापूर परिसरात मला ‘केककिंग’ म्हणून लोक ओळखू लागले. त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिले नाही. त्या सहा, सात वर्षांत या परिसरात आठ ते नऊ दुकाने माझ्या मालकीची सुरू केली. ग्राहकांच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला. एकीकडे व्यवसायात पाय घट्ट रोवले, तर दुसरीकडे मुलगा आणि मुलीचे शिक्षणदेखील पूर्ण झाले होते.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com