Soil Depth Map: मातीच्या खोलीनुसार नकाशे केले तयार

Soil analysis: शेतीच्या नियोजनासाठी आता मातीच्या फक्त रंगावर नाही, तर तिच्या खोलीवरून निर्णय घेतले जाणार! ‘डेप्थ मॅप ऑफ इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील मातीचा खोल अभ्यास करण्यात आला असून, महाराष्ट्रात या अभ्यासाला अधिक सूक्ष्म रूप दिले गेले आहे.
Smart Farming
Smart FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology: सुपीक आणि खोल माती असलेल्या जमिनीमध्ये पिकांची वाढ जोमदार होते. मुळांच्या वाढीमध्ये मातीच्या खोलीचे महत्त्व जाणत राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्थेने देशभरातील मातीच्या खोलीचा नकाशा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी देशभरातून २७ हजार नमुने घेतले आहे. या पहिल्या ‘डेप्थ मॅप ऑफ इंडिया’च्या आधारे कोणत्या भागातील जमीन कोणत्या पिकांना व जलसंधारण विषयक उपचारासाठी प्रतिसाद देईल याचे निर्णय सोपे होणार आहेत.

राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील व या प्रकल्पाचे समन्वयक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निर्मल कुमार यांनी आपल्या ‘डेप्थ मॅप ऑफ इंडिया’ विषयी माहिती देताना सांगितले की, जमिनीचे वर्गीकरण भौतिक, रासायनिक गुणधर्माप्रमाणे केले जाते. त्यामध्ये अचूकता येण्यासाठी मातीच्या खोलीचा अंदाज महत्त्वाचा ठरतो. हे लक्षात घेत संस्थेने देशभरात खोलीनुसार मातीच्या विविध थरांचा अभ्यास केला. त्याकरिता प्रत्येकी ९० मीटर असे अंतर निर्धारीत करीत २७ हजार नमुने घेतले.

विविध थरातील मातीचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी पाच फुटाचा खड्डा करून, त्यात किती खोलीपर्यंत माती, मुरूम व अन्य घटक आहेत, याचे मापन केले. त्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांच्या नोंदी घेण्यात आल्या. यावरून त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि ही माती कोणत्या पिकाला पोषक असू शकेल, याचे अनुमान बांधणे शक्य होते.

Smart Farming
Post Harvest Technology : फळे-भाज्या धुण्यातील तंत्रज्ञान

महाराष्ट्रात मातीचा होणार अधिक सूक्ष्म अभ्यास

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून येत्या काळात महाराष्ट्रातील जमिनीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्थेच्या संनियंत्रणात राबविला जात आहे. देशभरात मातीचे नमुने घेण्यासाठी ९० मीटर अंतर निश्‍चित केले होते. अचूकता वाढविण्यासाठी नमुने घेण्याचे हे अंतर महाराष्ट्रात ३० मी. बाय ३० मी. केले आहे. पोकरा अंतर्गंत २१ जिल्ह्यातील १५ हजारावर गावांत जमिनीत पाच फूट खोलीचे करून त्या आधारे मातीचा अभ्यास होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पाच हजार गावातील काम पूर्ण झाले आहे. दहा हजारावर गावातील सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या वर्षभरात हा अभ्यास पूर्णत्वास जाणार असल्याचे डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले. प्रत्येक भागातील मातीची खोली व मातीचे ९ गुणधर्म स्पष्ट होतील. त्याआधारे या गावातील भागनिहाय पीकनिवड, खतांचा निवड व प्रमाण ठरवता येईल. जमीन संरचनेनुसार जलधारणक्षमताही समजलेली असल्याने पाण्याच्या पाळ्यांची संख्या ठरविण्यामध्ये सुसूत्रता आणता येईल. bhoomigeoportal वर हे नकाशे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.

Smart Farming
Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेसाठी गाळ लाभदायक

(Mati Kholi Nakasha)‘डेप्थ मॅप’ चे फायदे

दुष्काळाचा आधीच अंदाज

मातीची खोलीवर व खोलीच्या विविध टप्प्यांवर कोणत्या गुणधर्माची माती आहे, हे समजेल. त्याला जमिनीची प्रतवारी जोड दिल्यास पहिल्या टप्प्यात कोणत्या भागात दुष्काळ पडेल, याचा अंदाज मिळू शकेल. त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटापासून वाचवता येतील.

अशा शेतकऱ्यांना संभाव्य दुष्काळाचा आधीच अंदाज असल्याने दुसऱ्या अवस्थेत पाणी बचत आणि आच्छादनासह विविध उपाययोजना आधीपासूनच राबविता येतील. तिसऱ्या अवस्थेत म्हणजेच पीक काढणीच्यावेळी पावसाने खंड दिल्याने होणारी दुष्काळीस्थिती. अंतिम टप्प्यात असलेले पीक पाणी न मिळाल्यामुळे लवकर परिपक्‍व होते. त्याची काढणी, मळणी लवकर होऊन ते बाजारातही लवकर दाखल होईल. अशावेळी शासनाला हमीभाव केंद्रे सुरू करण्याचे निर्णय याआधारे घेणे शक्य होईल.

सरकारला निर्णय घेण्यास मदत

ज्या भागात माती जास्त खोल नाही, त्या भागात दुष्काळ लवकर पडेल हे सर्वश्रुत आहे. अशा भागात कोणत्या उपाययोजना राबवायच्या, या दृष्टीने अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. मात्र, मातीची खोली कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते, याचा अंदाज आधीच मिळू शकतो.

चारा पिकातून समृद्धी

‘इन डेप्थ सॉईल’ अहवालाच्या आधारे समजलेल्या मातीची खोली कमी असलेल्या भागात चारा पिकांची लागवड हा चांगला पर्याय ठरेल. दुष्काळाने हातचे पीक गेले तरी त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनोत्तर व अवकाळी पावसाच्या काळात चारा बियाणांची पेरणी केल्यास पुढील दीड महिन्यांपर्यंत. बऱ्यापैकी चारा उपलब्ध होईल.

Smart Farming
Spray Drying Technology: ‘स्प्रे ड्रायिंग’ तंत्रज्ञान; अन्नप्रक्रिया उद्योगातील सुवर्णसंधी!

मृद्‌ व जलसंधारण होईल सोपे

मातीची खोली हा घटक पीक व्यवस्थापनाप्रमाणेच मृद्‌ व जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठीही महत्त्वाचा असतो. माती किती खोल आहे, मुरूम किती खोलीवर लागतो, या नुसार योग्य ते भूजल उपचार करता येतील. विविध पीक व फळबागा लागवड, शेततळ्यांची निर्मितीसाठी सध्या सरसकट अनुदान दिले जाते. क्षेत्रानुसार फळझाडांसाठी घ्यावयाचे खड्डे, सुपीक माती, खतांचा वापर व त्याचा खर्च वेगवेगळा असू शकतो.

शेततळे खोदतानाही जमिनीच्या खोली व प्रकारानुसार अनुदानाचे प्रमाण ठरवता येईल. पॉलिथिनची गरज व त्याची जाडीही निश्चित करता येईल. उदा. ज्या जमिनीत मुरूम असेल, त्याला शेततळे खोदण्यासाठी अधिक खर्च लागतो. उलट काळ्या मातीच्या जमिनीत खर्च कमी येतो. या मातीतून पाणी मुरून जाण्याची क्रिया अत्यंत सावकाश होते. त्यामुळे प्लॅस्टिक आच्छादनाचा खर्चही कमी होऊ शकतो, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

...अशी आहे पिकाची संरचना

पिकांची मुळे जास्तीत जास्त पाच फुटांपर्यंत खोल जातात. पहिल्या स्तरात केवळ माती व त्यानंतर मुरूम असल्यास त्याच ३० मीटरवरील भागातील पोषक घटक आणि तितक्‍याच भागात साचलेले पाणी झाडांच्या मुळांना मिळू शकते. मात्र तिथे पोषक घटक उपलब्ध असतीलच असे नाही. संत्रा, आंबा व काही फळपिकांच्या मुळ्या दीड मीटरपर्यंतच राहतात, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

भूभाग आणि जमीन प्रकारानुसार पिकाची शिफारस करता येईल. शिफारशीचा अवलंब न करता पेरणी केल्यास ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या स्थितीत मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. उदा. काळी माती असलेल्या जमिनीत पाणी साचून राहिल्यात ती चिबडते. अशा मातीत बीबीएफ वापरल्यास अधिक फायदा होतो. मातीतील चिकणमाती (क्‍ले) प्रमाण ४५ टक्‍के असल्यास ती माती विविध पिकांसाठी सुपीक व पोषक असते.

डॉ. निर्मल कुमार (वरिष्ठ शास्त्रज्ञ), ८८३०५३१९९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com