Soil Health: जमिनीचे आरोग्य, पीक पोषण सुधारण्यासाठी सूक्ष्मजीव मोलाचे

Use of Microorganisms in Agriculture: रासायनिक शेतीच्या अतिरेकामुळे शेती परिसरातील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. हे सूक्ष्मजीव पिकांना अन्नद्रव्याच्या शोषणापासून ते कीड-रोगांपासून संरक्षणात मोठी मदत करतात. त्यामुळे शेती शाश्‍वत आणि सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

डॉ. हर्षवर्धन मारकड, डॉ. रवींद्र जाधव

Importance of Microorganisms: जमिनीचे जैविक आरोग्य हे त्यातील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रमाणावर अवलंबून असते. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, ॲसिटोबॅक्टर, निळे हरित शेवाळ, ॲझोला असे घटक महत्त्वाची भूमिका निभावतात. तर पिकाच्या वाढीदरम्यात येणाऱ्या विविध कीड-रोगापासून बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, बॅसिलस सबटिलस, मायकोरायझा, मेटारायझिम ॲनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टिसिलिअम लेकॅनी यांसारखे सूक्ष्मजीव मोलाची भूमिका निभावतात. या सारख्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर शेतीमध्ये वाढवणे गरजेचे असून, त्यातून शेती पर्यावरणपूरक होण्यासोबत उत्पादनात सातत्य मिळू शकेल.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे सूक्ष्मजीव

नत्र स्थिर करणारे जिवाणू

रायझोबिअम : रायझोबिअम हे तुलनेने अधिक प्रभावी आणि व्यापकपणे वापरले जाणारे जिवाणू खत आहे. हे शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांवर गाठी करून राहून सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करते. त्यांना लागणारे अन्न वनस्पतीकडून मिळते, त्याबदल्यात ते वनस्पतीला मुळांद्वारे नत्र उपलब्ध करून देतात. वेगवेगळ्या शेंगवर्गीय गटातील पिकांना ठरावीक रायझोबिअम गटाचे जिवाणू खत वापरावे. शेंगवर्गीय वनस्पतीसोबत हे प्रति हेक्टरी ५० ते १०० किलो नत्र स्थिर करतात.

अझोटोबॅक्टर : ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे राहून असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. यांचा वापर एकदल आणि तृणधान्य, फूल आणि फळ पिकांसाठी करतात. नत्र स्थिर करण्याव्यतिरिक्त हे जिवाणू पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेली संप्रेरके उदा. जिबरेलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि इंडॉल ॲसिटिक ॲसिड जमिनीत सोडतात. त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते. ॲझोटोबॅक्टर जिवाणूखतांचा वापर केल्यामुळे हेक्टरी २० ते २५ किलो नत्र उपलब्ध होऊन उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

Soil Health
Soil Health : माती हेच शेतीतील खरे भांडवल ; तिचे आरोग्य जपा

अझोस्पिरिलम : अझोस्पिरिलम जिवाणू ज्वारी, मका, भात, बाजरी, गहू या तृणधान्य पिकांमध्ये, पालेभाज्या, फळपिके यांच्या मुळांमध्ये व मुळाभोवती राहून सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. अझोस्पिरिलम मुळे प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र मिळते.

निळे- हरित शेवाळ: ही सूक्ष्म एकपेशीय, तंतुमय, स्वयंपोषी पाणवनस्पती असून, भातशेतीत उपयुक्त आहे. ते असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवतात. या शेवाळामुळे प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो नत्र मिळते. उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. उदा. नॉस्टॉक, ॲनाबेना, अलोसिरा व टॉलीपोट्रिक्स.

अझोला : भारतात अझोलाची ‘अझोला पिनाटा’ ही जात सर्वत्र आढळते. अझोला व अनाबिना अझोला सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. ही वनस्पती प्रकाश संश्‍लेषण पद्धतीने अन्न तयार करते. अझोलाच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे भातशेतामध्ये पुनर्लागवड करण्यापूर्वी अझोला एकत्र मातीत मिसळला जातो किंवा भाताबरोबर दुहेरी पीक म्हणून घेतले जाते. हेक्टरी १० टन अझोला वापरल्यास भात पिकास २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळते.

Soil Health
Soil Slit: शेतामध्ये गाळमातीचा वापर

असेटोबॅक्टर : ग्लुकोनो असेटोबॅक्टर डायझोट्रॉफीक्स हे आंतरप्रवाही सहजीवी जिवाणू आहे. ऊस व इतर शर्करायुक्त पिकांच्या संपूर्ण शरीरात (उदा. खोड, पाने व मुळे) यामध्ये ते असतात. या जिवाणूमुळे स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होतो. ऊस लागवडीसाठी ग्लुकोनो असेटोबॅक्टर डायझोट्रॉफीक्स जिवाणू खत उपयुक्त ठरते.

बेजरिंकिया : हे जिवाणू आम्लधर्मीय जमिनीत असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. एकदल व तृणधान्य पिकांसाठी या जिवाणू खताचा वापर केला जातो.

स्फुरद विरघळवणारे सूक्ष्मजीव

काही जिवाणू मातीतील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य आणि वनस्पतींना उपलब्ध स्वरूपात रूपांतर करतात. त्यामुळे जमिनीमध्ये बद्ध झालेले स्फुरद पिकांना उपलब्ध होते. स्फुरदयुक्त रासायनिक खताची बचत होऊन उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. स्फुरद हे अन्नद्रव्य वनस्पतीत कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया जोमाने करते. त्यामुळे पिकांच्या मुळाची जोमदार वाढ होते. पिके सामान्यतः फॉस्फरिक ॲसिडच्या रूपात स्फुरद घेतात. स्फुरद विरघळणारे जिवाणू सेंद्रिय आम्ल अथवा फोस्फटेज नावाचे विकर स्राव तयार करून फॉस्फेटचे द्रवात रूपांतर करतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनास, पेनिसिलियम, अस्पेरजिलस.

पालाश विरघळवणारे जिवाणू :

नत्र आणि स्फुरदाप्रमाणे पालाश सुद्धा वनस्पतीच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी महत्वपूर्ण अन्नद्रव्य आहे. पालाशमुळे प्रकाश संश्‍लेषण, संत्प्रेरके सक्रिय करणे, प्रथिने निर्मिती, पोषक द्रव्यांचे वहन करणे आणि वनस्पतींचे कीड व रोगांपासून संरक्षण ही महत्त्वपूर्ण कार्ये पाडली जातात. मातीमध्ये पालाशचा साठा अधिक असला तरी त्यातील बहुतांश भाग अविद्राव्य सिलिकेट क्षारांच्या स्वरूपात (उदा. फेल्डस्पार, मायका व चिकन माती) अडकलेला असतो. जमिनीमध्ये असलेले पालाश विरघळवणारे जिवाणू (उदा. फ्रॅचुरिया ऑरेंशिया, बॅसिलस, पेनीबॅसिलस, असिडोथायोबॅसिलस) सेंद्रिय आणि असेंद्रिय आम्ले उत्सर्जित करून अविद्राव्य खनिज स्वरूपातील पालाश विद्राव्य करतात. त्यामुळे त्याची पिकांना उपलब्धता होते.

- डॉ. हर्षवर्धन मारकड, ९६६५६१७८०४, ( सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकूल, काष्टी, मालेगाव),

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com