
Farmer Turmeric Crop Management :
शेतकरी नियोजन ः हळद
....................
शेतकरी ः अप्पासाहेब जंबू खोत
गाव ः कारंदवाडी, ता. वाळवा, जि. सांगली
एकूण शेती ः ७ एकर
हळद क्षेत्र ः दोन एकर १० गुंठे
वाण ः सेलम
..................................
कारंदवादी (ता. वाळवा) येथील अप्पासाहेब जंबू खोत हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. दरवर्षी एक एकरापासून ते अडीच एकरांपर्यंत हळद लागवड ते करतात. काटेकोर व्यवस्थापन आणि अनुभवाच्या जोरावर दर्जेदार हळद उत्पादनात त्यांनी सातत्य राखले आहे. काढणीनंतर प्रतवारी करून बाजारपेठेतील आवक आणि दर यांचा ताळमेळ साधत खात्रीशीर उत्पन्न मिळविण्यात ते माहीर झाले आहेत. अनुभव, अभ्यास आणि कष्टाला प्राधान्य देणाऱ्या आप्पासाहेब यांनी प्रगतिशील शेतकरी अशी ओळख निर्माण केली आहे. फेरपालट पद्धतीने ऊस, हळद, आणि हळद पिकात स्वीट कॉर्न अशी पीक पद्धती घेण्यावर भर दिला जातो.
पीक फेरपालटीवर भर ः
अप्पासाहेब यांच्याकडे तीन प्रकारची जमीन आहे. त्यात हळद लागवडीस प्राधान्य दिले जाते. वडिलांपासून मिळालेला हळद लागवडीचा वारसा त्यांनी पुढे कायम राखले आहे. आप्पासाहेब यांनी शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केल्यापासून अनेक बदल केले. प्रयोगशीलतेला प्राधान्य देत पीक फेरपालटीवर भर दिला. दरवर्षी हळद पिकामध्ये आंतरपीक म्हणून स्वीटकॉर्नची लागवड केली जाते. कमी कालावधीत हे पीक निघून जात असल्यामुळे त्यापासून चांगले अतिरिक्त उत्पन्न हाती येते. त्या माध्यमातून मुख्य पिकाच्या व्यवस्थापनासाठी पैसे उपलब्ध होत असल्याचे अप्पासाहेब सांगतात.
काटेकोर सिंचनावर भर ः
हळद पिकामध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. कारण जास्त पाण्यामुळे मूळकुज, कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता अधिक असते. या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाल्यामुळे पिकामध्ये मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. रोगाच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना केल्यामुळे आगामी नुकसान टाळणे शक्य झाल्याचे अप्पासाहेब सांगतात.
व्यवस्थापनातील बाबी ः
- हळद लागवडीसाठी मागील हंगामातील घरचे बेणे वापरावर भर दिला जातो. त्यासाठी मातृकंद बाजूला काढून सावली ठेवले जातात. त्यावर हळदीचा पाला टाकला जातो.
- दर चार वर्षांनी बेणे बदल केला जातो. प्रामुख्याने सेलम वाणाचे एकरी १६ क्विंटल बेणे वापरले जाते.
- लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया केली जाते. लागवडीसाठी निवडलेले बेणे पुन्हा एकदा निवडून घेतले जाते. खराब बेणे बाजूला काढून टाकले जाते. खराब बेणे लागवड होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे उगवणक्षमता ९० टक्क्यांपर्यंत मिळत असल्याचे अप्पासाहेब सांगतात.
- लागवडीपूर्वी मशागत करून जमीन लागवडीसाठी तयार केली जाते. शेतामध्ये साधारणपणे एक महिना शेतामध्ये मेंढ्या बसविल्या जातात. याशिवाय शेणखताचा वापर केला.
- लागवडीसाठी साडेचार व साडेतीन फुटांच्या सऱ्या काढल्या जातात. त्यानंतर दोन गड्ड्यांत प्रत्येकी ९ इंच इतके अंतर राखत झिगझॅग पद्धतीने लागवड केली.
- दरवर्षी हळद लागवडीमध्ये स्वीट कॉर्नचे आंतरपीक घेतले जाते. हे पीक साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत निघून जाते. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
- संपूर्ण हळद लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. पिकाची गरज पाहून आणि वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन केले जाते.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन ः
- लागवडीनंतर १२ः६१ः०, ००ः०ः५०, १३ः००ः१४
यांच्या ठिबक सिंचनामधून मात्रा दिल्या.
- साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरणी केली. भरणीवेळी डीएपी, मिश्र खते, कॅल्शिअम, सल्फर, करंजी पेड, निंबोळी पेंड यांचा वापर केला.
- त्यानंतर पंधरा दिवसांनंतर ट्रायकोडर्मा, जिवाणू खतांच्या मात्रा दिल्या.
- प्रत्येक महिन्यात पीक वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
- मूळकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव हळद पिकामध्ये दिसून येतो. त्यासाठी शिफारशीत घटकांची नियमितपणे फवारणी घेतली.
- पिकाचे सातत्याने निरिक्षण करून आवश्यकतेनुसार उपाय करण्यावर भर दिला जातो.
काढणी कामकाज ः
- साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटी पिकास पाणी देणे टप्प्याटप्प्याने बंद केले.
- नियोजनानुसार लागवडीनंतर साडेआठ महिन्यानी हळद काढणीला सुरुवात होते. त्यानुसार १५ जानेवारीच्या दरम्यान मजुरांद्वारे काढणीस सुरुवात केली. साधारण २ दिवसांत काढणीचे काम पूर्ण झाले.
- काढणी केल्यानंतर यंत्राद्वारे हळद शिजवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
- सध्या शिजवलेली हळद वाळविण्याचे काम सुरू आहे. शिजवल्यानंतर २० दिवस हळद उन्हात वाळविली जाते.
- यावर्षी कच्च्या हळदीचे एकरी १४ ट्रेलर उत्पादन मिळाले आहे.
- आगामी काळात हळद चांगली वाळल्यानंतर पॉलिश आणि प्रतवारीची कामे केली जातील.
- यंदा वाळलेल्या हळदीचे ३२ ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. वाळविल्यानंतर मार्केटमध्ये विक्रीचे नियोजन केले जाईल, असे आप्पासाहेब सांगतात.
- अप्पासाहेब खोत, ८६६८९२२४५०, ९४०४३६२५४३
(शब्दांकन ः अभिजित डाके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.